तरुणांचे विदेशगमन ?

भारतात जन्मलेल्या अनेकांना सध्या अन्य देशांचे मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे. याचा परिणाम अनेक तरुण भारतापेक्षा अन्य देशांमध्ये स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत. काही जण ठराविक कालावधीपुरते विदेशात शिक्षण किंवा नोकरी यांसाठी जातात आणि कालांतराने भारतात परततात, तर काही जण भारत सोडून कायमस्वरूपीच विदेशात स्थायिक होण्यास प्राधान्य देतात. शिक्षणासाठी गेलेले ९० टक्के विद्यार्थी भारतात परत येऊ इच्छित नाहीत. काही अपरिहार्य कारणे सोडली, तर भारतियांचे विदेशात स्थायिक होण्याचे प्रमाण अधिक आहे. वर्ष २०२३ मध्ये ५९ सहस्र भारतीय नागरिकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारल्याचे वृत्त समोर आले. बहुतांश भारतियांना विदेशात जाणे उच्च दर्जाचे वाटते. याचे कारणही तसेच आहे; कारण विदेशातील स्वच्छता, शिक्षणाचा दर्जा, प्रशासनाची कार्य करण्याची पद्धत, अन्य सोयीसुविधा या भारतापेक्षा अधिक चांगल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून तरुणांना विदेशाचे आकर्षण वाटत आहे; परंतु यामागे धावतांना भारताला न्यून लेखण्याचा भागही वाढत आहे, तो गंभीर आहे.

असे असले, तरी अन्य देशांच्या तुलनेत भारत हा आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम आणि महान आहे. भारताची संस्कृती, हिंदु धर्म ज्याचे पालन केल्यास आपण आनंदी होतो, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. अन्य सुविधा आणि देशाचे आध्यात्मिक सामर्थ्य यांची तुलना केल्यास भारतच वरचढ आहे; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संस्कृती, धर्माचरण हे टिकवून ठेवण्यामध्ये सर्वपक्षीय शासनकर्ते अल्प पडल्यामुळे आज भारताची स्थिती दयनीय झालेली आहे. एकेकाळी महासत्ता असणारा भारत इंग्रजांच्या मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे मागास झालेला आहे. परिणामी मुलांमध्ये देशप्रेम, धर्मप्रेम नाही; कारण मुलांवर संस्कार करणार्‍या पालकांमध्येही नाही. सर्व सुविधा या आनंद मिळण्यासाठी हव्या असतात; परंतु केवळ सुविधांमुळे आनंद मिळत नाही, तर संस्कार महत्त्वाचे आहेत. संस्कार हे धर्माचरणामुळेच येतात.

आजच्या तरुणांनी बाह्य गोष्टींकडे पाहून हुरळून न जाता भारताचे आध्यात्मिक सामर्थ्य लक्षात घेऊन त्याच्या जोरावर देशाचा भौतिक विकास कसा करता येईल, हे पहाणे आवश्यक आहे. तरुणांमध्ये असलेले ज्ञान, कौशल्य याचा वापर भारतासाठी होण्याकरता प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच धर्मशिक्षण दिल्यास त्यांना योग्य-अयोग्य समजेल, निर्णयक्षमता आणि देशप्रेम वाढेल, याचा परिणाम मुलांमध्ये आपले जीवन स्वदेशासाठी समर्पित करायचे आहे, ही भावना वाढेल, हे नक्की !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.