संपादकीय : निवडणुकीत ‘एआय’चा करिष्मा ?

वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात सिद्धता करत आहेत. त्यासाठी विविध आघाड्या उभारणे, विविध माध्यमांतून प्रचार करणे, जेणेकरून मोदी यांची लाट अल्प होईल. यात आता भर म्हणून कि काय ‘एआय’चा (कृत्रिम बुद्धीमत्तेचा) उपयोग चालू झाला आहे. अंतराळ आस्थापन ‘स्पेस एक्स’ आणि सामाजिक माध्यम संकेतस्थळ ‘एक्स’चे मालक इलॉन मस्क यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी त्यांच्या ‘एक्स’च्या खात्यावर सांगितले, ‘जेमिनी’ (‘गूगल’ची ‘एआय’ तंत्रज्ञानाची संगणकीय प्रणाली) ही वर्ष २०२४ च्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहे.’ ‘जेमिनी एआय’ प्रणालीचे इलॉन मस्क यांनी ‘वंशवादी आणि नागरिकताविरोधी’, असे वर्णन केले आहे. त्यासाठी त्यांनी एका वापरकर्त्याचे उदाहरण दिले आहे. एका वापरकर्त्याने ‘जेमिनी’ला विचारले, ‘‘मोदी फॅसिस्ट (हुकूमशाह) आहेत का ?’’ यावर ‘जेमिनी एआय’ने उत्तर दिले, ‘मोदी हे भाजपची अशी धोरणे लागू करण्यात प्रयत्नशील आहेत की, ज्यांचे काही तज्ञांनी ‘फॅसिस्ट’ असे वर्णन केले आहे.’

इलॉन मस्क यांनी अगदी नेमक्या सूत्रावर बोट ठेवून ‘जेमिनी’चे खरे स्वरूप एकप्रकारे उघड केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा जेव्हा वापर जगात चालू झाला. तेव्हा ‘चॅट जीपीटी’ ही काही संगणक अभियंत्यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून निर्मिलेली संगणकीय प्रणाली प्रसिद्धीस आली. अतिशय अचूक आणि वेगवान उत्तरे देण्याच्या या संगणकीय प्रणालीच्या क्षमतेमुळे तिने इंटरनेट क्षेत्रात धुमाकूळ घातला. ‘या प्रणालीमुळे जगप्रसिद्ध गूगलची माहिती क्षेत्रातील मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात येणार, गूगल जवळपास हद्दपार होणार’, अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. ‘चॅट जीपीटी’चा वापर अनेक आस्थापनांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार चालू केला. त्याची उपयुक्तता सर्वांनाच जाणवल्याने त्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झाली. या स्पर्धेत उतरण्यासाठी गूगलने प्रयत्न करून ‘जेमिनी’ ही प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीविषयी इलॉन मस्क यांनी उदाहरणासह विधाने केल्यामुळे तिच्याविषयी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कृत्रिम बुद्धीमत्ता : लाभ आणि हानी

‘चॅट जीपीटी’ जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट जगतात आले, तेव्हा त्याच्या अफाट आणि अती वेगवान कार्यक्षमतेविषयी तज्ञ अन् तरुण यांना कौतुक वाटले. कृत्रिम बुद्धीमत्तेचा एवढ्या चांगल्या प्रकारे उपयोग करून दैनंदिन जीवनात ते विविध ठिकाणी लागू करू शकतो, हे प्रथमच लक्षात आले. केवळ काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे दिली एवढ्यापुरता कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग नसून त्याद्वारे मनुष्य करू शकतो, अशी अनेक कामे अगदी अचूकतेने करू शकतो, हे लक्षात आले. त्यामुळे अनेक प्रसिद्ध उद्योगांमध्ये कर्मचारी कपातही करण्यात आली; कारण ‘एआय’ प्रणाली अनेक कामे एकाच वेळी पूर्ण कार्यक्षमतेने करू शकते, अनेक कठीण आकडेमोड, माहितीचे आदान-प्रदान काही सेकंदामध्ये करू शकते. असे असले, तरीही ‘एआय’च्या गैरवापराविषयीही चर्चा तेवढ्याच गांभीर्याने झाली आहे. काही तज्ञांनी ‘या प्रणालीचे लाभाऐवजी तोटेच अधिक आहेत’, असे सांगितले आहे. इंटरनेट जगतातील, तसेच जी माहिती मिळणे आवश्यक नाही, ती माहितीही ‘चॅट जीपीटी’द्वारे उपलब्ध होऊ लागली. परीक्षांमध्ये प्रश्नांची उत्तरे मिळवून कॉपी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला. ‘एआय’चे जनक जेफ्री हिंटन यांनी याविषयी सांगितले, ‘एआय’मुळे संपूर्ण मानवी जीवनाला धोका आहे, दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान अधिक भयानक होत चालले आहे आणि मानवाच्याही पुढे जाईल.’ स्वत:च सिद्ध केलेल्या तंत्रज्ञानाविषयी चिंता व्यक्त करत हिंटन यांनी गूगलची नोकरीही सोडली. इटलीने यावर बंदी घातली आहे आणि काही युरोपीय देश बंदी घालण्याच्या प्रयत्नात आहेत.

‘जेमिनी’द्वारे मोदीविरोध !

कृत्रिम बुद्धीमत्तेचा हा धोका काही तज्ञांनी आधीच ओळखला होता. तरी त्याला थांबवण्यासाठी अथवा त्याचा नियंत्रित वापर होण्यासाठी तज्ञांनी पुढे येणेही आवश्यक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला ‘जेमिनी एआय’चे, म्हणजे जणू मोदी यांच्या विरोधकांनी दिलेले उत्तर आहे. ‘फॅसिस्ट’ ही स्वत:च ध्येय-धोरणे ठरवून ती देशावर लादण्याचा आणि त्याप्रमाणे कृती करण्यास भाग पाडणारी विचारसरणी आहे. इटलीत तिचा उगम झाला आणि जगात काहींनी ती विचारसरणी स्वीकारली. ‘जेमिनी’ने असे उत्तर देणे, हे नरेंद्र मोदी यांच्याविषयी इंटरनेटवर नकारात्मक माहिती मोठ्या प्रमाणात प्रसारित केली गेल्याचे लक्षण आहे. दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर ‘जेमिनी’ला नरेंद्र मोदी यांच्याविषयी नकारात्मक माहिती भरवली गेली आहे. या दोन्ही शक्यता असू शकतात.

काही वर्षांपूर्वी ‘केंब्रिज ॲनालिटिका’चे एक प्रकरण उघड झाले होते. या आस्थापनाने फेसबुक खाती असलेल्या भारतियांची माहिती चोरून तिचा उपयोग निवडणुका प्रभावित करण्यासाठी केल्याचा आरोप होता. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांच्या वेळी फेसबुक वापर करणार्‍या अनुमाने ५ कोटी नागरिकांच्या माहितीचा उपयोग या आस्थापनाने निवडणुकांवर प्रभाव पाडण्यासाठी केला होता, हेही उघड झाले. ‘फेसबुकने ही माहिती वापरकर्त्यांच्या अनुमतीविना कशी दिली ? फेसबुकही या कटाचा भाग आहे का ?’, असे प्रश्न त्याच्या विश्वासार्हतेवर उपस्थित करण्यात आले होते. भारतातही तोच प्रकार केल्याचा आरोप फेसबुकवर आहे. हे जाणीवपूर्वक केल्याचे भारतीय यंत्रणांना वाटते.

आताच्या म्हणजे वर्ष २०२४ च्या निवडणुका भारतियांचे आणि भारतीय पक्षांचे भवितव्य ठरवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रगतीचा आलेख चढता आहे. भारताच्या या प्रगतीच्या आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक पातळीवरील प्रसिद्धी आणि उदयोन्मुख नेतृत्व यांमुळे विकसित देशांना त्यांचा हेवा वाटला नाही तर नवल ! ऑस्ट्रेलियाच्या खासदाराने तसे मान्यही केले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धीमुळे ऑस्ट्रेलियातील अनेक लोकप्रतिनिधींना मत्सर वाटतो. अमेरिकेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात, हा नेहमीचा अनुभव आहे. भारत विरोधी आणि मोदी विरोधी या सर्वांकडून मोदी यांना निवडणुकांमध्ये हरवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते सर्वच माध्यमांतून निकराचा प्रयत्न करत आहेत. मस्क यांनी यातील एक कडी उघडली आहे. त्यामुळे भारतीय यंत्रणांनी सावध होणे आणि तंत्रज्ञानाच्या आडून होणार्‍या दुष्प्रचाराविषयी कारवाईसाठी सतर्क रहाणे आवश्यक आहे, तसेच ‘एआय’वर कठोर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करून भारत अन् मोदी यांच्या विरोधकांच्या कारवायांना पायबंद घालणे, हे भारताच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या आड भारत आणि मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे !