नवी देहली – भारताच्या पुढील मंगळ ग्रह मोहिमेत हेलिकॉप्टरचाही समावेश असू शकतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. मंगळावर ‘लँडर’द्वारे ‘हेलिकॉप्टर’ पाठवण्याची इस्रोची योजना आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर लँडर ‘रोव्हर’ आणि ‘रोटोकॉप्टर’ (हेलिकॉप्टर) उतरवेल, असे सांगण्यात येत आहे.
१. भारतीय अंतराळ संस्था जे हेलिकॉप्टर मंगळावर पाठवणार आहे, ते अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘क्वाडकॉप्टर’सारखेच असेल. या ‘क्वाडकॉप्टर’ने मंगळावर १८ किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यासाठी ३ वर्षांत ७२ उड्डाणे केली होती.
२. इस्रोचे हेलिकॉप्टर मंगळाच्या वातावरणाची माहिती गोळा करण्यासाठी मंगळावर १०० मीटरपर्यंत उंच उड्डाण करील, अशी अपेक्षा आहे. ही माहिती भविष्यातील परिस्थिती आणि संभाव्य धोक्यांचा अंदाज घेण्यासाठी, तसेच आगामी शोध मोहिमांच्या धोरणात्मक नियोजनासाठी आवश्यक आहे.