पदार्थांमध्ये चीजला पर्यायी निकृष्ट दर्जाचे पदार्थ वापरल्याने कारवाई !
मुंबई – ‘बर्गर’ आणि ‘नगेट्स’मध्ये खर्या चीजऐवजी त्याला पर्याय असलेल्या निकृष्ट पदार्थ (एनालॉग्ज) वापरणे फास्ट फूड आस्थापन ‘मॅकडोनाल्ड’ला महागात पडले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने आस्थापनाला फटकारले असून अहिल्यानगरातील केडगाव शाखेचा (आऊटलेटचा) परवाना रहित केला आहे, असे वृत्त एन्.डी.टी.व्ही.ने दिले आहे.
१. प्रशासनाने आस्थापनाच्या एका आऊटलेटवर तपासणी केली आणि किमान ८ वस्तूंमध्ये खर्या चीजच्या जागी चीज नालॉग्स वापरले जात असल्याचे आढळून आले.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मॅकडोनाल्ड आऊटलेटच्या फूड लेबल किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले फलकावर माहिती न देता हे करत आहे, ही एक प्रकारची ग्राहकांची फसवणूक आहे. आस्थापनाने लोकांची दिशाभूल केली, त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.
२. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनान प्रसारित केलेल्या अंतिम आदेशानुसार, आस्थापनाच्या आउटलेटवर कारवाई ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रारंभ झाली, जेव्हा त्यांच्या महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील केडगाव शाखेची तपासणी करण्यात आली. चीझी नगेट्स, मॅचीज व्हेज बर्गर, मॅचीज नॉन-व्हेज बर्गर, कॉर्न आणि चीज बर्गर, चीझी इटालियन व्हेज आणि ब्लूबेरी चीजकेक यासह किमान ८ वस्तूंमध्ये चीजऐवजी चीज नालॉग्ज असल्याचे अन्न निरीक्षकांना आढळले.
३. या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर, मॅकडोनाल्डने स्पष्टीकरण दिले; परंतु प्रशासनाला हे स्पष्टीकरण असमाधानकारक वाटले. त्या पदार्थांची नावे पालटण्यात आल्याचे आस्थापनाने म्हटले आहे; परंतु प्रशासनाच्या म्हणण्यानुसार तपासणीच्या वेळी तसे झाले नव्हते. प्रशासनाने हे स्पष्टीकरण असमाधानकारक मानले आणि आऊटलेटचा परवाना रहित केला.
४. मॅकडोनाल्ड्सने डिसेंबरमध्ये महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला पत्र लिहून सांगितले होते की, आस्थापनाने त्या उत्पादनांची नावे पालटून त्यांच्यातील ‘चीज’ हा शब्द काढून टाकला आहे.
(सौजन्य : Zee Business)
संपादकीय भूमिकाअसा प्रकार अन्यत्रच्या दुकानांमध्येही होत असणार, त्यांची पडताळणी का केली जात नाही किंवा केली जात असेल, तर कारवाई केली जात नाही, अशी शंका उपस्थित होते ! |