‘ओटीटी’सारख्या आधुनिक माध्यमांतून भारताचे सांस्कृतिक अधःपतन रोखा !

आज ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांनी आयोजिलेल्या ‘संस्कृती वाचवा, भारत वाचवा !’ कार्यक्रमाच्या निमित्ताने…

(ओटीटी, म्हणजे ‘ओव्हर दी टॉप’. अशा प्रकारच्या ॲपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आदी कार्यक्रम पाहिले जातात.)

भारतात नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या ३ घटनांनी जनमानस हादरून गेले आहे; मात्र ही वेळ केवळ हादरून जाण्याची नसून देशासमोर वाढून ठेवलेल्या या गंभीर संकटांचा सामना करण्यासाठी वेळीच जागे होण्याची आहे. यातून लक्षात येते की, ‘अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या तुलनेत श्रीरामाची मर्यादा सांभाळणे अधिक कठीण आहे.’ बलात्काराच्या या भयंकर ३ घटना येथे देत आहे.

अ. उत्तरप्रदेशमधील कासगंज येथे एका १९ वर्षांच्या युवकाने स्वतःच्या बहिणीवर बलात्कार करून तिची हत्या केली.

आ. मागील आठवड्यात गोंडा, उत्तरप्रदेश येथील १० आणि ८ वर्षे वयाच्या दोन मुलांनी एका ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला.

इ. राजस्थानमधील डूंगरपूर जिल्ह्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी वर्षभरात त्यांच्याच शाळेतील ६ विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले आहे.

या घटनांतील आरोपींना अटक झाल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी सांगितले, ‘भ्रमणभाषवर लैंगिकदृष्ट्या विकृत आणि उत्तेजक चलत्‌चित्रे पाहिल्यामुळे हा गुन्हा करण्यास प्रवृत्त झालो.’ पोलिसांच्या मते बलात्काराच्या गुन्ह्यांत दोषी असलेले बहुतांश सर्वच आरोपी अशाच स्वरूपाचे कबुलीजबाब (संमती) देतात.

१. ‘अल्ट बालाजी’ आणि ‘उल्लू’ ॲपवरून दाखवण्यात येणारी चलत्‌चित्रे ‘अश्लील (पॉर्न)’ श्रेणीत मोडणारी !

श्री. उदय माहूरकर

या आरोपींना प्रोत्साहन देणारी ही चलत्‌चित्रे सर्वसामान्य अश्लील (पॉर्न) चलत्‌चित्रे नाहीत, तर आपल्या भारतातच बनवलेली ही चलत्‌चित्रे आहेत. ‘अल्ट बालाजी’ नावाचा ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ आणि ‘उल्लू (ULLU)’ नावाचे ‘ॲप’ काय प्रक्षेपित करत आहेत, हे पाहूया. ‘अल्ट बालाजी’वर दाखवण्यात येत असलेल्या एका मालिकेत कुटुंबातील एका पुरुष पात्राचे स्वतःची आजी, सावत्र आई, चुलत बहीण, वहिनी यांच्यासमवेत अनैतिक संबंध असल्याचे दाखवले आहे, तसेच दुसर्‍या एका मालिकेत सासू आणि जावई यांचे अनैतिक संबंध दाखवले आहेत. ही सर्व दृश्ये अत्यंत अश्लील असून ते ‘अश्लील (पॉर्न)’ या श्रेणीत मोडते.

‘उल्लू ॲप’वरून दाखवत असलेल्या काही चित्रपटांत सासरे-सून, सासू– नणंद, घराची मालकीण आणि नोकर, तसेच शिक्षक अन् विद्यार्थी यांच्यातील अनैतिक संबंध दाखवले जात आहेत. एका ‘ॲप’वर तर नैतिकतेच्या सर्व मर्यादा पार करून सख्ख्या बहीण-भावात असलेले अनैतिक संबंध दाखवले आहेत.

२. ‘बलात्कार करणार्‍या सर्व गुन्हेगारांना अश्लील साहित्यांतूनच प्रोत्साहन मिळते’, हे सर्वेक्षणातून सिद्ध

१९८० या वर्षी अमेरिकेत टेड बंडी नावाच्या एका विकृत वासनांधाने ३० महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती. मृत्यूदंडाच्या शिक्षेपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये टेडने स्पष्टपणे सांगितले, ‘बलात्कार करणार्‍या गुन्हेगारांना प्रोत्साहन आणि प्रेरणा अश्लील साहित्यांतूनच मिळते.’ मी स्थापन केलेल्या ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ या संस्थेने केलेल्या एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातही हेच सिद्ध झाले आहे.

३. सांस्कृतिक अधःपतन न रोखल्यास ‘विश्वगुरु भारत’ या ध्येयापासून देश दूर जाण्याची भीती

‘आर्थिक, लष्करी आणि वैज्ञानिक प्रगती करून महासत्ता होण्याच्या प्रयत्नांत असणार्‍या भारताने सांस्कृतिक दृष्टीने भिकारी राष्ट्र बनायचे का ?’, असा विचार करण्याची वेळ आता आली आहे. भारताने ‘गल्फ’ (आखात), सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या देशांप्रमाणे अश्लील, बीभत्स चित्रपट अन् साहित्य यांचे निर्माते, तसेच वितरक यांच्यावर निर्बंध न घातल्यास देशाचे सांस्कृतिक अधःपतन निश्चित आहे. यामुळे देश ‘विश्वगुरु भारत’ या ध्येयापासून निश्चितच दूर जाईल.

४. अश्लील आणि बीभत्स चित्रपटांची निर्मिती रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना

‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ या संस्थेने अश्लील आणि बीभत्स चित्रपटांची निर्मिती अन् वितरण करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कठोर कायदे असावेत’, अशी मागणी केली आहे. प्रत्येक चलत्‌चित्राची कल्पना, भाषा, वेशभूषा आणि दृश्ये यांविषयी कायद्याच्या दृष्टीने काही बंधने अन् मर्यादा असाव्यात. या मर्यादांचे उल्लंघन केल्यास निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, वितरक आणि प्रक्षेपण करणारे माध्यम या सर्वांवर बलात्काराला प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंद व्हावा. गुन्हा सिद्ध झाल्यास १० ते २० वर्षे कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान (तरतूद) असावे. अशा गुन्हेगारांना ३ वर्षांपर्यंत जामीन मिळू नये आणि या खटल्याची सुनावणी ४ मासांत पूर्ण व्हावी, तसेच त्यांनी समाजात वितरित केलेले साहित्य परत घेणे बंधनकारक करण्यात यावे.

हे कायदे अस्तित्वात येईपर्यंत भारताच्या माहिती-तंत्रज्ञान कायद्यात एक सुधारणा करावी. या सुधारणेनुसार अशा स्वरूपाचे सर्व चित्रपट अथवा चलत्‌चित्रे एकाच ‘ॲप’मध्ये असावीत. हे ‘ॲप’ उघडायचे झाल्यास बोटाचे ठसे आणि आधारकार्ड क्रमांक घालणे अनिवार्य करावे. तळागाळातील समाजापर्यंत हा विषय पोचवण्यासाठी आमच्या संस्थेने ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ या संस्थेच्या साहाय्याने वर्ष २०११ च्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाप्रमाणे एक व्यापक लोकजागरण अभियान राबवण्याचे ठरवले आहे.

अल्लाउद्दीन खिलजी आणि औरंगजेबाने जितकी हानी केली त्यापेक्षा असे साहित्य निर्मिती करणारे (कंटेंट मेकर्स) भारताची अधिक हानी करत आहेत; कारण या आक्रमकांनी मंदिरांवर घणाघात केले; परंतु हे ‘कंटेंट मेकर’ मंदिरसंस्कृतीचा पाया असलेले चारित्र्य आणि संस्कृती यांवर प्रहार करत आहेत.

थोडक्यात खर्‍या अर्थाने भारताच्या विश्वगुरु होण्याच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा हा यज्ञ आहे. श्रीरामाच्या मर्यादेच्या रक्षणासाठीची ही चळवळ आहे.

– श्री. उदय माहूरकर, संस्थापक, ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ आणि माजी केंद्रीय माहिती आयुक्त, भारत सरकार. (२०.२.२०२४)

 समाजाचा होणारा सांस्कृतिक र्‍हास रोखण्यासाठी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ अभियान !

डिसेंबर २०२२ मध्ये भोपाळ (मध्यप्रदेश) येथे मी ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ या अभियानाला आरंभ केला. देशाच्या सांस्कृतिक वारशाला अश्लील आणि बीभत्स साहित्यांच्या माध्यमातून हानी पोचवून भारताची महान राष्ट्राकडे होणारी वाटचाल रोखणार्‍या निर्मात्यांच्या विरुद्ध लोकमत सिद्ध करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. आमच्या या मोहिमेला सशक्त वैचारिक पार्श्वभूमी असणार्‍या अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ज्यांत ‘जेम्स् ऑफ बॉलीवूड’, ‘हिंदु जनजागृती समिती’, ‘स्वच्छ सायबर भारत’ आणि ‘पिपल अगेंस्ट रेप इन इंडिया (पारी)’ इत्यादी संघटनांचा समावेश आहे. ‘समाजाचा होणारा सांस्कृतिक र्‍हास’ हे या वाढत्या बलात्कारांच्या घटनांमागील मुख्य कारण आहे. हा र्‍हास रोखण्याच्या हेतूने आवश्यक ती कायदेशीर लढाई लढण्याची आमची पूर्ण सिद्धता आहे.

‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ या संस्थेला अनेक नामवंत नेते आणि संत यांनी पाठिंबा दिला आहे. ज्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, योगगुरु स्वामी रामदेवबाबा, —श्री श्री रविशंकर, जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरीजी, भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचा समावेश आहे.