इतिहास आणि धर्मशास्त्र !

प्रबोधन मालिका

‘अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सर्व स्थिती आणि लय यांचा अभ्यास करून ‘योगादिशास्यद्वास’ ही शास्त्रीयता लक्षात आणून देण्यासाठी ‘इतिहास’ हे एक शास्त्र बनवले. त्या वैदिक लोकांना इतिहास म्हणजे काय ? आणि त्याच्या अभ्यासाचे महत्त्व काय ? हे अलीकडे थोडे थोडे समजू लागले आहे’, असे पाश्चात्त्य पंडित अन् त्यांचे मानसपुत्र आमच्याकडील आंग्ल विद्याविभूषित पंडितही मोठेपणाचा आव आणून म्हणत असतात. संस्कृत विद्वान ए.एस्. मॅकडोनेल म्हणतात, ‘History is the one weak spot in Indian litereting. It is in fact, non existent.’ (भारतीय साहित्यात इतिहास हे एक कमकुवत स्थान आहे. हे खरे तर अस्तित्वात नसलेले आहे.) वरील उतार्‍यावरून पाश्चात्त्य लोकांची इतिहासाविषयीची कल्पना कळून येते. लढाया, तह, राज्ये इत्यादी घटनांची कालानुक्रमे लिहिलेली माहिती, म्हणजे यांच्या मताने इतिहास होय. या अर्थाने असा घटनांचा कालानुक्रमे इतिहास लिहिलेला नाही. ही गोष्ट खरी आहे; परंतु इतिहास याचा अर्थ जर इतकाच असेल, तर त्याला एवढे महत्त्व देणेही व्यर्थच आहे. या सर्व घटनांचा अभ्यास करून भूतकाळाचा अभ्यास करावयाचा आणि त्यातूनच भविष्यकाळ निघत असतो. यामुळे भूतकाळाच्या अभ्यासाने भविष्यकाळाविषयीचे ज्ञान करून घ्यायचे, हा इतिहासाचा खरोखर उद्देश होय.

१८ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सांस्कृतिक इतिहासावरूनच राष्ट्राचा भविष्यकाळ ठरणे, पाश्चात्त्य पंडितांची इतिहासाच्या अभ्यासाची हास्यास्पद संकल्पना, पाश्चात्त्यांच्या संशोधनाची पद्धत सदोषयुक्त आणि राष्ट्राचा इतिहास राष्ट्राविषयी जिव्हाळा असणार्‍या लोकांनी लिहिण्यामागील महत्त्व’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

५. पाश्चात्त्य पंडितांच्या संशोधनातील दोष

पाश्चात्य पंडितांचे संशोधनातील आणखी एक दोष म्हणजे ते परस्परांचा फारसा विचार करत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या विचारांच्या सांगाड्यात एखादी गोष्ट न बसली की, ती प्रक्षेप (चुकीची) म्हणून काढून टाकतात. आमच्या वाङ्मयात प्रक्षेप आहेत, ही गोष्ट खोटी नाही; परंतु ‘प्रक्षेप असूनही त्यात इतिहासदृष्ट्या सत्य नसतेच’, असे म्हणता येणार नाही. इतकेच काय, तर प्रत्यक्ष लिहिलेल्या इतिहासांत ज्या गोष्टी नमूद करणे शक्य नसते, अशा गोष्टी लोककथांच्या परंपरेने आजपर्यंत अविच्छिन्न चालत येतात आणि पुष्कळदा खरा सत्यांश त्यामध्येच असतो. तेव्हा संशोधकास वाङ्मयाचा कोणताही भाग त्या वेळच्या श्रद्धा, कल्पना लोककथा इत्यादी अनेक गोष्टींचा विचार करूनच स्वतःचा तर्क बसवावा लागेल. आज बाकी सगळ्या गोष्टी बाजूस राहून कालनिर्णयाचेच फार स्तोम माजले आहे. बर्‍याच गोष्टींचा कालनिर्णय करण्यासाठीच कित्येक विद्यापिठांच्या (युनिर्व्हसिटींच्या) ‘डॉक्टरेट्स’ खर्ची पडल्या आहेत, तसेच भाषाभेद ठरवण्यासाठी भाषाशास्त्र, वंशभेद समजण्यासाठी मानसवंशशास्त्र आणि तदनार्यत डोक्याचे माप, केसाचे रंग, चेहर्‍याची ठेवण, कातडीचा रंग, डोळ्यांचा रंग इत्यादींप्रमाणे अन् स्थलभेद समजण्यासाठी भूस्तरशास्त्र याप्रमाणे निरनिराळी शास्त्रे संशोधन झाल्यास वापरली जातात.

या शास्त्रांचा थोडाबहुत उपयोग जरी होत असला, तरीही शास्त्रे सर्वच अगदी बाल्यावस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर फारसा विश्वास ठेवून उपयोग नाही. त्या मानाने अधिक विश्वसनीय असे ज्योतिर्गणिताचे प्रमाण हेरमन याकोबी, लोकमान्य टिळक इत्यादी विद्वानांनी वापरले, ते केव्हाही कालनिर्णयात अधिक योग्य होय; परंतु आजचे संशोधक या प्रमाणाचा उपयोग अत्यल्प करतात. इतकेच नव्हे, तर संस्कृत विद्वान ए.एस्. मॅकडोनेल आणि कीथ यांच्या संस्कृत वाङ्मयाच्या इतिहासावरील पुस्तकांमध्ये लोकमान्य टिळक यांच्या ‘ओरायन’ वा ‘आर्टिक होम इन द वेदाज’ या पुस्तकाचे नाव सुद्धा नाही. खरे पाहिले, तर पूर्णपणे निःपक्षपाती असे आज उपलब्ध असलेल्या प्रमाणांत केवळ ज्योतिर्गणितच एक प्रमाण होय. याचाच मुख्यतः उपयोग करून लोकमान्यांनी ‘ओरायन’ हा ग्रंथ लिहिला. अर्थात् हे प्रमाण वापरणार्‍यांना ज्योतिर्गणिताची थोडी फार माहिती आणि त्याची महती काय, हे कळणे अशक्य आहे.

६. संस्कृती टिकवण्याचे कार्य ब्राह्मणवर्गाकडे असणे

आमच्या राष्ट्राचा इतिहास लिहितांना आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही की, आमची संस्कृती ही निर्गतावस्थेतील (उलगडणारी) आहे. यामुळेच इतर सर्व अनुभवावस्थेतील संस्कृतीहून विशिष्ट आहे. त्यामुळेच शतकानुशतके पालट न होता येथे राहू शकतात. एकाच काळी अनेक थर समान असू शकतात आणि वरच्या थरांत अत्यंत शुद्ध भाषा अन् खालच्या थरात अल्प संस्कृत भाषा असणे मुळीच अशक्य नाही. यामुळे यांचे भाषाशास्त्राचे आधुनिक नियम पुष्कळदा भारतीय संस्कृतीचे संशोधन करतांना केवळ निरुपयोगी नव्हे, तर दिशाभूल करणारे ठरतात. आपल्या पूर्वजांनी आमच्या राष्ट्राचा भूतकाळ पाहून असे ठरवले की, भारतीय संस्कृती ही अमर आणि परिपूर्ण आहे. ही अत्यंत उच्च आहे; म्हणूनच तिला उच्चस्थानी टिकवणे आवश्यक आहे. त्याकरताच त्यांनी ब्राह्मणवर्गाकडे संस्कृती टिकवण्याचे काम दिले; कारण त्यांना सृष्टीचा नियम ठाऊक होता की, कोणतीही उच्च अवस्था टिकवून धरण्यास फार ताण सहन करावा लागतो आणि हा ताण सर्वांना फार काळ सहन करणे शक्य नसते; म्हणून काही लोक काही काळानंतर ढिले पडणे साहजिक आहे.

७. ब्राह्मणवर्ग निर्माण होण्यामागील कारण आणि ब्राह्मणवर्गाचे महत्त्व

ज्या वेळी सर्वांनी ताण सहन करून उच्चतम अवस्थेत संस्कृती राखली तेच कृतयुग ! त्यानंतर जर काहींना ताण सहन न झाला, तर ते आपल्या उच्चावस्थेतून खाली येतात; परंतु ब्राह्मणाने मात्र स्वतःची उच्चावस्था सोडता कामा नये; कारण सर्व संस्कृतीचे बीज त्याला रक्षण करावयाचे असते, तसेच भारतीय संस्कृतीचे वैभव पाहून इतर संस्कृतीच्याही पुष्कळ लोकांच्या चित्तात या संस्कृतीत जन्म घेण्याची इच्छा उत्पन्न होऊन ती अगदी वासनारूपाने परिणीत होते. अशा लोकांची वासना केव्हा ना केव्हा भविष्यात पूर्ण होणे आवश्यकच आहे; म्हणून बरेच दिवस अशा लोकांना थोपवून कलियुगात सोडले जाते. यामुळे कलियुगात नाना संस्कृतीचे जीव येथे जमल्यामुळे दिसावयास भारतीय; पण मुळात परके असल्यामुळे ते या संस्कृतीविषयी जिव्हाळा बाळगतील, अशी अपेक्षाच नसते. यामुळे कलियुगात वैदिक धर्मास ग्लानी येणार, ही ठरलेली आहे आणि त्याची व्यवस्था करण्यासाठीच ब्राह्मणवर्ग निर्माण केला गेला आहे. अशा काळी इतर वर्गास लागेल तितकी सवलत दिली आहे आणि त्यांनी ब्राह्मणवर्गास केवळ साहाय्य करावे, निदान उपसर्ग पोचवू नये म्हणजे झाले.

केवळ ब्राह्मण या धर्माचे बीज राखून पुनः कृतयुग उत्पन्न करू शकतो, हे तत्त्व जाणूनच सर्वांत अधिक दायित्व, बंधने इत्यादी ब्राह्मणावर लादली गेली आणि म्हणूनच श्रीमद्शंकराचार्य ‘भगवद्गीते’त स्पष्ट म्हणतात की, ‘ब्राह्मणस्य हि रक्षणेन रक्षितो स्यात् वैदिको धर्म :।’, म्हणजे ‘ब्राह्मणाच्या रक्षणाने वैदिक धर्माचे रक्षण होईल.’ हे ब्राह्मणांचे कौतुक नसून ते ब्राह्मणांकरता सुळावरची पोळी आहे. अर्थात् जे ब्राह्मण त्याप्रमाणे वागतील, तेच धर्मधारक होत आणि मानास पात्र होत. इतर ब्राह्मणत्वापासून हीन झाले, म्हणजे त्यांना कष्टही नाहीत आणि मानही नाही. याप्रमाणे वैदिक संस्कृती वारंवार ग्लानी येणे साहजिक आहे हे जाणूनच श्रीभगवान म्हणतात,

‘‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।’’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ७

अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते (म्हणजे लोक धर्माचरण करत नाहीत) आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो.

८. चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण होण्यामागील कारण

प्लेग निवारणार्थ लस टोचून घेतांना ताप येईल, हे ठाऊक असतेच आणि म्हणून ताप आला असता न घाबरता मनुष्य स्वस्थ रहातो. अर्थात् हा ताप जाणारा आहे, हे ठाऊक असले, तरी ताप अंगात असतांना मुद्दाम कुपथ्य करावयाचे नाही इतका नियम पाळावा लागतो, तशीच हीसुद्धा गोष्ट आहे. नाही तरी हा ताप जाणाराच आहे, असे समजून ताप अंगात असतांना गार पाण्याने स्नान केले, तर त्या माणसाची हानीच होणार. याप्रमाणे कलियुगात ब्राह्मण्यरक्षण हे ब्राह्मणाने केले की, ही ग्लानी निघून जाईल आणि पुन्हा ही संस्कृती दिव्य होईल. हे वैदिक संस्कृतीच्या इतिहासाचे चतुर्युगात्मक सारेच भारतियांनी अनंत वर्षाच्या इतिहासावरून संशोधन केले आणि त्याप्रमाणेच चातुर्वर्ण्य व्यवस्थाही करून दिली, जेणेकरून पुढील भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल करता येईल. असे इतिहासाचे चतुर्युगात्मक चक्र असते आणि हे सृष्टी नियमाप्रमाणे चालते, हे ओळखून त्याचा अधिकाधिक लाभ कसा घेता येईल, हे भारतियांनीच विचार करून ठरवले आणि कार्यवाहीत आणले.

९. इतिहास म्हणजे ऋषिमुनींनी दिलेला बांधीव कार्यक्रम !

‘इतिहास ही शास्त्रीय गोष्ट आहे’, असे थोडे थोडे मार्क्सवादी आणि विद्वान ओसवाल्द स्पेंग्लर इत्यादींना वाटू लागले होते; परंतु त्यांनाही त्याच्या स्वरूपाचे पूर्णतया आकलन झालेले नाही. हा इतिहासाचा (कृतयुग) आलेख कळल्यामुळे कोणत्या काळी सृष्टीचा ओघ अनुकूल आहे ? कुठे प्रतिकूल आहे ? हे जाणून आपल्या ऋषिमुनींनी त्या त्या काळचे आचारविचार बसवून दिले आहेत. ऋषिमुनींनी या इतिहासाचे शास्त्र बनवून अगदी बांधीव कार्यक्रम (प्रोग्रॅम) आपल्या हाती दिला आहे. ते पालन करणे एवढेही आपल्याच्याने होत नसेल, तर ते बिचारे काय करणार ? अर्थात् हे इतिहासाचे अत्यंत विशाल रूप होय; परंतु पिंडी ते ब्रह्मांडी या आपल्या सिद्धांताप्रमाणे आपल्यापुढे विचारांत असलेल्या लहानशा कालखंडातही ही चतुर्युगाची भ्रमणे असतातच. आपल्या इतिहास संशोधनात हे विसरून चालायचे नाही.

वरील विवेचनावरून हे सहज लक्षात येईल की, आजही लगतचा भविष्यकाळ समजण्यात भूतकाळचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि तो पाश्चात्त्यांच्या चष्म्यातून न करता आपले संशोधनशास्त्र आपणच वरील गोष्टी लक्षात ठेवून बसवले पाहिजे. तद्नुसार संशोधन पाठवले, तरच आपल्या राष्ट्राचा आत्मा कायम ठेवण्याच्या दृष्टीने जो इतिहासाचा खरा उपयोग तो साध्य झाला, असे होईल.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कै. न.ना. भिडे, पुणे

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३)