भारताचा वाढता आंतरराष्ट्रीय दबदबा !

कतारमधून ८ माजी भारतीय नौदल अधिकार्‍यांची केलेली सुटका हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय मुत्सद्देगिरीचा आणखी एक मोठा विजय आहे. यापूर्वी रशिया-युक्रेन युद्धामध्ये दोन्ही राष्ट्रांत जोरदार धुमश्चक्री चालू असतांना भारताने राजनैतिक मुत्सद्देगिरी आणि संबंध यांचा वापर करून आपल्या अडकलेल्या नागरिकांना युक्रेनमधून सुखरूपपणे बाहेर काढले होते. त्यासाठी रशिया-युक्रेन यांना काही काळ युद्ध थांबवावे लावले. त्यानंतर पुढे इस्रायल-हमास युद्धामध्येही इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना अशाच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र खाते यांनी योग्य ती व्यूहरचना करून आपल्या नागरिकांना सुखरूप आणले. ‘कतारमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या माजी नौदल अधिकार्‍यांनाही नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र खाते यांनी अशाच रितीने सुखरूप परत आणेल’, अशी समस्त भारतियांची धारणा होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् परराष्ट्र खाते अगदी खरे उतरले. जनतेचा विश्वास या अवघड मोहिमेतही त्यांनी सार्थ ठरवला आहे.

‘सेंगॉल’ (राजदंड) घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी

१. जगात भारताचा दबदबा निर्माण झाल्याचा लाभ

भाजपचे सरकार आल्यापासून देशामध्ये जसे सकारात्मक पालट घडू लागले, तसे आमचे परराष्ट्र खाते आणि त्यामध्ये अन् परराष्ट्र नीती यांमध्येही योग्य असे सकारात्मक पालट होणे चालू झाले. १० वर्षांपूर्वीपर्यंत ‘एक प्रचंड लोकसंख्येचा आर्थिकदृष्ट्या गरीब आणि सामरिकदृष्ट्या दुबळा असा अविकसिनशील देश’, अशा रितीने जगभरातील राष्ट्र भारताकडे बघत होती. कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रश्नावर भारताला स्वतःची काही अशी ठोस भूमिका नव्हती, ना कुणी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताच्या भूमिकेला विचारात होते; पण देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक नवीन तारा देहलीच्या सत्तास्थानी उगवला आणि त्यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याचा जगभरातील राष्ट्रांचा दृष्टीकोन अगदी पूर्णपणे पालटत गेला. अमेरिका किंवा काही युरोपीय राष्ट्रे विदेशात गेलेल्या त्यांच्या नागरिकांविषयी काळजी घेतात. आज जगभरामध्ये भारताचा जो काही दबदबा निर्माण झालेला आहे, त्यामुळे अगदी कतारसारख्या इस्लामी राष्ट्रालाही भारताला दुखावणे कठीण गेले आणि त्यामुळेच ८ माजी भारतीय नौदल अधिकार्‍यांची त्यांना सुखरूप सुटका करावी लागली.

२. ‘भारत सरकार आपल्यामागे आहे’, हा संदेश विदेशातील भारतीय वंशांपर्यंत गेला !

‘देश-विदेशामध्ये स्वतःचा उद्योग, व्यवसाय यांसाठी कार्यरत असलेल्या भारतीय नागरिकांची देशाला किती काळजी आहे आणि अडीअडचणीच्या, अवघड परिस्थितीच्या काळात आपल्या पाठीमागे भारत सरकार आणि भारतातील नागरिक खंबीरपणे उभे रहातात’, हा संदेशही या घटनेतून देशोदेशी गेलेला आहे आणि ‘मोदी है तो मुमकिन है’, (मोदी आहेत, तर सर्वकाही व्यवस्थित होईल.) हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !

श्री. अनिल दत्तात्रेय साखरे

३. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या मताला महत्त्व येणे

आज विकसित अशा अमेरिका, युरोपीय राष्ट्रांसमवेत पूर्वेकडील जपान, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना सामारिक भागीदारीसाठी, तर तेलसंपन्न मध्य आशियातील अरब देशांनाही ‘भारतासमवेत त्यांचे व्यापारी, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ अन् गुणवत्तेच्या आधारावर आधारलेले असावेत’, असे वाटू लागले आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर मग ते रशिया-युक्रेन युद्ध असो कि इस्रायल-हमास युद्ध किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संयुक्त राष्ट्रांसारख्या वेगवेगळ्या संघटना असो तेथे भारतीय मताला ‘किंमत’ आलेली आहे.

जागतिक स्तरावर सर्वांत विकसित अर्थव्यवस्था आणि प्रचंड लष्करी सामर्थ्य यांमुळे अमेरिकेचा बोलबाला आहे. त्यासमवेतच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे युरोप त्याचे महत्त्व टिकवून आहे, तर प्रचंड पसरलेला भौगोलिक प्रदेश विपुल खनिज संपत्ती आणि पुष्कळ मोठ्या आकाराचे सामारिक सामर्थ्य यांमुळे चीन त्याचे महत्त्व वाढवत आहे. या अशा वातावरणामध्ये नरेंद्र मोदींनी ‘एक कणखर, खंबीर, मुत्सद्देगिरी करणारा आणि राजनीतीनिपुण, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर सर्वसमावेशक अन् महत्त्वपूर्ण भूमिका घेणारा देश’, म्हणून भारताचा नावलौकिक वाढवला आहे. त्यामुळेच रशियासारख्या राष्ट्रालाही आपण ‘हा युद्धाचा काळ नव्हे’, असे स्पष्टपणे सुनावू शकलो.

४. आतापर्यंत युरोप-अमेरिकेपुढे गुडघे टेकणार्‍या भारतात पालट होणे ! 

युरोप, अमेरिका आदी राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातलेले असतांनाही, त्यांची तमा न बाळगता रशियासमवेतची आपली मैत्री आणि रशियाकडून येणार्‍या खनिज तेलाची आयात पूर्वापार चालू ठेवलेली आहे. यामध्ये युरोप-अमेरिकेलाही मध्ये काही बोलता आलेले नाही. नाहीतर आतापर्यंत युरोप-अमेरिका यांनी डोळे वाटरले की, गुडघे टेकणारे काँग्रेस नेतृत्व होते. त्यामुळे जगभरात होणार्‍या भारताच्या मानहानीमुळे समस्त नागरिक काँग्रेसच्या धोरणावर संताप व्यक्त करायचे.

५. कोरोना महामारीच्या काळात अनेक राष्ट्रांना कोरोनावरील औषधे पुरवणे !

कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्व जग जायबंदी असतांना आणि औषध पुरवठ्याची कमतरता असतांना भारताने याविषयीच्या संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन कोरोना लस विकसित केली. या वेळी कुठेही मागे-पुढे न पहाता जगभरातील राष्ट्रांना कोरोना महामारीवरील औषधांचा पुरवठा केला आणि देशा-देशांमधील जीव वाचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

६. ‘आत्मनिर्भर’ भारतासाठीचे प्रयत्न आणि अर्थव्यवस्थेची गती

आज सगळ्या जगभरातील अर्थव्यवस्था अगदी विकसित देश अमेरिका, जपान, चीन, युरोप या देशांमधील अर्थव्यवस्थांचा वाढीचा वेग २-३ टक्क्यांवर अडकलेला असतांना भारतीय अर्थव्यवस्था मात्र ७.४ टक्क्यांच्या वाढीने पुढे चाललेली आहे. जगभरातील ‘स्टार्टअप’ आणि ‘युनिकॉर्न’ची संख्या भारतामध्ये सगळ्यात अधिक आहे. तरुणांच्या प्रतिभेला सृजनशीलतेला, कल्पकतेला, गुणवत्तेला पुष्कळ मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत वाव दिला जात आहे. त्यासमवेतच कधीकाळी जगभरातील लष्करी साहित्य आयात करणारा सर्वांत मोठा देश असा भारताचा नावलौकिक झाला आहे. आज पुष्कळ मोठ्या प्रमाणावर लष्करी साहित्याची निर्मिती करून मागील वर्षी जवळपास २० सहस्र कोटी रुपयांची निर्यात भारताने केली. हीसुद्धा जमेचीच बाजू !

७. ‘जी २०’चे यशस्वी आयोजन आणि अविकसित राष्ट्रांना सभासद बनवणे

‘जी २०’सारख्या (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) आंतरराष्ट्रीय परिषदेचे मोठ्या यशस्वीपणे आयोजन करून भारताने सर्वांनाच अचंबित करायला लावले. आमच्या देशातीलच काँग्रेस आणि इतर विरोधक या परिषदेला अपशकुन करण्यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेले असतांना त्या परिषदेतील सर्व ठरावांवर एकमत घडवून परिषदेचे निवेदन प्रसिद्ध करून आपल्या चाणक्यनीतीची झलक जगाला दाखवली. दक्षिण आफ्रिकेतील अविकसित अशा ५५ राष्ट्रांना ‘जी २०’चे सभासदत्व देऊन ‘ग्लोबल साऊथ’चा नारा देत नरेंद्र मोदींनी पुष्कळ मोठा ‘मास्टर स्ट्रोक’ मारलेला आहे. (‘ग्लोबल साऊथ’ हा मुख्यतः आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडांमध्ये पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात स्थित देशांचा समूह आहे, येथे आर्थिक विकास होत आहे.)

८. भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी सामान्य जनतेलाही माहिती होणे

काँग्रेसी काळामध्ये ‘अकसाई चीन’चा प्रदेश बळकवणार्‍या बलाढ्य चीनची पावले आता भारतीय भूमीकडे वळतांना अडखळू लागली आहेत. काही आर्थिक तज्ञ सोडले, तर अर्थव्यवस्थेविषयी भारतातील सर्वसामान्य काय सुशिक्षित वर्गातील जनताही अनभिज्ञ होती; पण आज अगदी खेडेगावातही मोठ्या प्रमाणावर ‘डिजिटलायझेशन’चा वापर केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही ठाऊक झाले आहे की, भारताची अर्थव्यवस्था आता  ५ व्या स्थानी असून लवकरच ती जगात ३ र्‍या स्थानी विराजमान होईल, हे केवळ नरेंद्र मोदींमुळे शक्य झाले.

९. अवकाश संशोधनातील झेप !

अवकाश संशोधनामध्येही भारताने पुष्कळ जोमाने प्रगती केली असून पूर्वी आमच्या प्रक्षेपक अग्नीबाणाने आकाशात झेप घेतली की, २-५ मिनिटांमध्ये तो खाली बंगालच्या उपसागरामध्ये चिरनिद्रा घ्यायचा. आता तर आम्ही परदेशातील राष्ट्रांचे उपग्रहही आमच्या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडत आहोत. त्यासमवेतच कुठल्याही विकसित राष्ट्राने विचार केला नाही, असा चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा विक्रम ही भारतीय वैज्ञानिकांनी करून दाखवला.

या पुढील टोक, म्हणजे आमच्या या सृष्टीचा संपूर्ण ऊर्जास्रोत असलेल्या सूर्यदेवतेच्या अभ्यास करण्यासाठी आमचे सूर्ययान ‘आदित्य एल् एल् १’ हे आता सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समान असलेल्या ‘लग्रांज पॉईंट १’ येथे सध्या कार्यरत आहे.

 १०. इस्लामी राष्ट्रांत हिंदु मंदिराची निर्मिती होणे

५०० वर्षांनी अयोध्येमध्ये भव्य दिव्य श्रीराममंदिराची निर्मिती झालीच; पण आज संयुक्त अरब अमिरातीमध्येही पुष्कळ मोठ्या अशा स्वामीनारायण मंदिराचे लोकार्पण झाले. या पुढील काळात इतर खंडांमध्येही भारतीय संस्कृती परंपरेनुसार मंदिराची निर्मिती होत आहे; हा पण भारतियांसाठी गौरवाचा क्षण आहे.

११. सप्तखंडातील राष्ट्रांसमवेत मोदी यांचे एक वेगळेच रसायन !

युरोप, अमेरिका, आशिया, आफ्रिका, अरबस्तान, तर पूर्वेकडील ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, जपान यांसारख्या पृथ्वीच्या सप्तखंडातील वेगवेगळी राष्ट्रे आणि त्या राष्ट्रांचे प्रमुख यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वेगळेच संबंध विकसित केले आहे आणि त्याचा पुष्कळ मोठा लाभ भारताला होत आहे. प्रत्येक राष्ट्रप्रमुखांसमवेत मोदी यांचे संबंध कसे सौहार्दाचे आहेत, हे ‘जी २०’मधील वेगवेगळ्या देशांतून आलेल्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करतांना त्यांना संपूर्ण जगाने दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून बघितले आहे.

१२. जगाच्या नेतृत्वाची पोकळी मोदी भरून काढतील !

‘राजा कालस्य कारणम् ।।’ (राजा हाच काळाला कारणीभूत असतो.), या श्लोकाप्रमाणे आज जगभरामध्ये बघितले, तर सर्व जगाला सर्वसमावेशक सर्वांना समवेत घेऊन चालणार्‍या स्वच्छ, चारित्र्यसंपन्न, खंबीर, कणखर, सखोल चिंतन-मनन आणि निर्णयक्षमता असलेल्या नेत्याची पुष्कळच कमतरता जाणवते; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघितल्यानंतर ही जागतिक नेतृत्वाची कमतरता ते सुजाण नेतृत्वाने भरून काढू शकतात.

देशोदेशींच्या सत्ताधिशांसमवेत असलेले नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक संवाद, स्नेहसंबंध यांमुळे ते जगभरातील सत्ताधिशांशी केव्हाही संवाद साधू शकतात आणि अनेक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय जटील प्रश्न मुत्सद्देगिरीच्या गुंतागुंतीमध्ये न अडकता सोडवू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यासमवेतच भारताने दिलेल्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण जग हे कुटुंब आहे) किंवा ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’चा घोष हा सर्व जगासाठी आश्वासक ठरू शकतो. कधी नव्हे, ते जगाचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी आज भारताला अमृत काळात प्राप्त झाली आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारत नक्कीच ‘विश्वगुरु’ होईल अन् जगाला रामराज्याच्या दिशेने घेऊन जातील, अशी आशा वाटते !

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे (पू).