सापांच्या घातक विषाला निष्प्रभ करणारे ‘आय.आय.एस्.सी. बेंगळुरू’ने तयार केले कृत्रिम मानवी प्रतिपिंड (अँटीबॉडी) !

  • भारतात प्रतिवर्षी ५० लाख लोकांना होतो सर्पदंश !

  • १ लाख ३८ सहस्र जणांचा होतो मृत्यू !

बेंगळुरू – जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात प्रतिवर्षी ५० लाख लोकांना सर्पदंश होतो. त्यातील सरासरी १ लाख ३८ सहस्र लोक मरतात, तर अनुमाने ४ लाख लोकांना त्यांचे हातपाय कापावे लागतात. कोब्रा आणि किंग कोब्रा यांसारख्या अत्यंत विषारी सापांच्या चाव्यामुळे मृत्यू होतो, तर अल्प विषारी साप चावल्याने जीव वाचू शकतो. बेंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ (आय.आय.एस्.सी.) मधील शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम मानवी प्रतिपिंड (अँटीबॉडी) सिद्ध केले आहे, जे विविध प्रकारच्या सापांच्या घातक विषाला निष्प्रभ करू शकते. यामुळे भविष्यात सर्पदंशामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या अल्प होण्याची शक्यता आहे.

सौजन्य Adya

सर्वांत प्राणघातक साप म्हणजे कोब्रा, किंग कोब्रा, क्रेट आणि ब्लॅक मांबा इत्यादी आहेत. यांचे विष सर्वांत धोकादायक असते. ‘सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन’मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, आय.आय.एस्.सी.ने तयार केलेल्या ‘अँटीबॉडीज’चा प्रभाव सध्याच्या प्रस्थापि औषधांच्या तुलनेत अनुमाने १५ पटींहून अधिक आहे.

सापाचे विष निष्प्रभ करण्यासाठी हे प्रतिपिंड ‘एच्.आय.व्ही.’ किंवा ‘सीओआयव्हीडी-१९’च्या प्रतिपिंडाच्या धर्तीवर सिद्ध केले गेले आहे. सापाच्या विषावर उपचार करण्यासाठी ‘अँटीबॉडीज’ विकसित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. हे विविध प्रकारच्या सापांच्या विषापासून लोकांचे संरक्षण करू शकते.