भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असतांना खासगी संस्थेसाठी देणग्या वसूल केल्या ! – अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ता

राजभवनाकडे नोंद नसल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप !

डावीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अनिल गलगली

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल असतांना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थांसाठी त्यांनी देणग्यांची वसुली केली आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

सौजन्य अनिल गलगली 

अनिल गलगली म्हणाले की,

१. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या परिवार प्रबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल असतांना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थांसाठी वसूल केलेल्या देणग्यांची माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही.

२. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल असतांना त्यांनी त्यांच्या संबंधित असलेल्या सरस्वती शिशु मंदिर, पिठोरगड, विवेकानंद विद्या मंदिर इंटर महाविद्यालय, पिठोरगड आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी, नैनिताल या शैक्षणिक संस्थांसाठी राज्यातील उद्योगपती, विकासक आणि अन्य लोक यांच्याकडून घेतलेल्या देणग्यांची सविस्तर माहिती मागितली होती.

अनिल गलगली यांनी राजभवनाने नाकारलेल्या आदेशाच्या विरोधात प्रथम अपील प्रविष्ट केले आहे. ते म्हणाले, ‘‘कोश्यारी यांनी राज्यपाल असतांना खासगी संस्थेसाठी देणग्या वसूल केल्या असून त्यांनी तशी माहिती राज्य सरकार आणि राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालय यांच्याकडे देणे आवश्यक होते; मात्र राज्यपालांनी गुपचूप घेतलेल्या देणग्यांची माहिती लपवली आहे. तशी माहिती न दिल्यास राज्यपालांचे परिवार प्रबंधक यांनी त्यांच्याकडे लेखी पत्र पाठवून माहिती मागवत ती अभिलेखावर जतन केली पाहिजे. याविषयी राज्यशासनाने चौकशी करावी.’’ गलगली यांनी अशी मागणी विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्यासहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.