फोंडा (गोवा) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
१०.२.२०२४ या दिवशी फोंडा (गोवा) येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. २१.२.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांची मुलगी सौ. सीमा सामंत यांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे
१ अ. ‘माझी आई श्रीमती दमयंती वालावलकर हिला त्रास होत असेल, तरी ती तो त्रास सहन करत असे. ती मला तिची सेवा करण्यासाठी शांत राहून पूर्णपणे सहकार्य करत असे.
१ आ. ती काही खात-पित नसतांनाही तिच्या चेहर्यावर चैतन्य जाणवत होते.
१ इ. गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : मी आईची सेवा करत असतांना ‘ती सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात आहे’, असे मला वाटायचे. आई स्वतःच्या गळ्यातील गुरुदेवांचे पदक हातात धरून ठेवत असे. ‘ती सतत शरणागतभावात आहे’, असे मला जाणवत असे.
१ ई. मी आईच्या जवळ बसून नामजप करत असे. तेव्हा माझा नामजप एका लयीत आणि भावपूर्ण होत असे.
१ उ. आई सतत ‘देवा, देवा’, असा धावा करत होती. तेव्हा ‘आता तिला मायेतून मुक्त व्हायचे आहे’, असे मला वाटायचे.
२. मृत्यूच्या वेळी कसलाही त्रास न होणे
आईच्या निधनापूर्वी २ दिवस माझे यजमान श्री. महादेव गोविंद सामंत यांना संतांचा सत्संग लाभला. तेव्हा संतांना आईची स्थिती समजली. त्यांच्या कृपेने आईला मृत्यूच्या वेळी कसलाच त्रास झाला नाही. ती झोपेतच शांतपणे गेली.
३. निधनानंतर
निधनानंतर आईच्या चेहर्यावर पुष्कळ चैतन्य आणि शांतता असल्याचे मला जाणवत होते.
‘आईची सेवा करतांना गुरुदेवांनी केलेल्या अपार कृपेबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सीमा सामंत ((कै.) श्रीमती दमयंती वालावलकर यांची मुलगी), फोंडा, गोवा. (१७.२.२०२४)
श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर यांची त्यांची नात सौ. उमा कदम यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. समंजस
‘माझ्या आजीला काही नातेवाइकांमुळे त्रास झाला होता; परंतु आजी आजपर्यंत त्यांच्याविषयी कधीच काही बोलली नाही. आजीला त्यांच्याविषयीही प्रेम आणि आपुलकी वाटते.
२. मायेची ओढ नसणे
मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकदा मला आजीचा भ्रमणभाष आला. ती माझी आठवण काढून रडत होती. त्यानंतर आजी कधीच माझ्याशी रडून बोलली नाही. माझ्या विवाहानंतर मी आणि माझे यजमान (श्री. सुनील कदम) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहात आहोत. आम्ही घरी गेल्यावरही आजी माझ्याशी मायेतील विषयांवर बोलत नाही. पूर्वी आजी दूरचित्रवाणीवर मालिका बघत असे; मात्र मागील ८ मासांपासून तिचे मालिका बघणे बंद झाले आहे.
३. परिस्थिती स्वीकारणे
माझे आई-वडील (सौ. सीमा सामंत आणि श्री. महादेव सामंत) गोवा येथे स्थलांतरित झाले. आजीलाही त्यांच्या समवेत गोवा येथे यावे लागले. त्या वेळी आजीने काही प्रश्न न विचारता परिस्थिती स्वीकारली.
४. आजी नियमित पहाटे ४ वाजता उठून घरातील सर्व कामे पूर्ण करत असे.
५. तिला देवतांच्या श्लोकांचे उच्चार व्यवस्थित करता येत नाहीत; मात्र ती सर्व श्लोक भावपूर्ण म्हणते.
६. गुरूंप्रती भाव
एक दिवस ‘आजी अकस्मात् ग्लानी येऊन पडली’, असे मला आईकडून समजले. त्यानंतर साधक श्री. विजय लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७१ वर्षे) यांच्या हातून आजी थोडे पाणी प्यायली आणि ती शुद्धीवर आली. काही वेळाने आईने आजीला विचारले, ‘‘गुरुदेव कुठे आहेत ?’’ तेव्हा आजी लोटलीकर काकांकडे बोट दाखवत होती. ‘काकांच्या माध्यमातून गुरुदेवांनी आजीला वाचवले आणि तेच काकांच्या माध्यमातून आले’, हे आजीने जाणले होते’, असे मला वाटले.’
– सौ. उमा सुनील कदम (श्रीमती वालावलकर आजींची नात, मुलीची मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.११.२०२३)
श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर रुग्णाईत असतांना सौ. उमा कदम यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !
‘आजी रुग्णाईत झाल्यावर मी तिला पहाण्यासाठी फोंडा, गोवा येथे गेले होते. त्या ४ दिवसांत मला आजीची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. आजीची सेवा करतांना आनंद जाणवणे
आजीचे अंग पुसणे, तिला भरवणे आणि उठून बसवणे, तिला अत्तर-कापूर लावणे, असे सर्व करत असतांना मला आतून पुष्कळ आनंद वाटत होता. त्या वेळी माझ्या मनाची एक वेगळीच स्थिती होती. आजीचा स्पर्श मला लहान बाळाप्रमाणे जाणवत असे.
२. ‘आजीला कशाचेच काही वाटत नसणे आणि ‘ती वेगळ्या स्थितीत आहे’, असे जाणवणे
आजीला पहाण्यासाठी आमचे काही नातेवाईक घरी आले होते. ‘त्यांना पाहून आजी काहीतरी प्रतिसाद देईल’, असे मला वाटले; मात्र ‘आजी एका वेगळ्याच स्थितीत आहे’, असे मला जाणवत होते. ती २० ते २५ दिवसांपासून काहीच बोलली नव्हती. तेव्हा मला ‘ती का बोलत नसेल ?’, असा प्रश्न न पडता ‘ती वेगळ्याच स्थितीत आहे. तिला आता कशाचेच काही वाटत नाही’, असे मला वाटायचे.
३. एकदा मी आजीकडे पहात असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) घरी आले आहेत. ते प्रेमाने आजीची विचारपूस करत आहेत आणि ती त्यांच्या चरणांकडे पहात आहे.’
– सौ. उमा सुनील कदम (४.११.२०२३)
|