‘स्क्रीन’ पहाण्याची वेळ ठरवा !

भ्रमणभाषचा ‘स्क्रीन’ पहाण्याची वाढत असलेली वेळ, ही एक गंभीर समस्या झाली आहे. याचा परिणाम सर्वांच्या सर्वांगीण विकासावर तर होतच आहे; पण विशेषकरून मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर याचा अधिक परिणाम होत आहे. भ्रमणभाष किंवा संगणक यांचा स्क्रीन पहाण्याप्रमाणेच दूरचित्रवाहिनीच्या संदर्भातही हे लागू होते. सततच्या भ्रमणभाष किंवा तत्सम उपकरणांच्या वापरामुळे डोकेदुखी, डोळ्यांचे आजार, झोप व्यवस्थित न येणे, ‘स्क्रीन’च्या तीव्र निळ्या प्रकाशाने डोळ्यांमधील ‘मेलोटिन’ हे द्रव्य न्यून होते. याची परिणती झोप न्यून होणे, नैराश्य, चिडचिड, अस्वस्थता, अतीरागीटपणा यांसारख्या मानसिक समस्या निर्माण होतात. सतत ‘स्क्रीन’ पहाण्याने एक प्रकारचे नकारात्मक आवरण देहाभोवती निर्माण होते आणि कालांतराने पुढे संबंधित व्यक्तीकडून गंभीर गुन्हे झाल्याची उदाहरणेही मोठ्या प्रमाणात आढळतात. भ्रमणभाषसाठी, त्यावर खेळ खेळण्यासाठी पालकांची हत्या करण्यापर्यंतही काही मुलांची मजल गेली आहे.

भ्रमणभाष अधिक वेळ पहाण्याचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेता आता आपल्याला पालटत्या वर्तमानानुसार ‘स्क्रीन’ची वेळ मर्यादित करण्याची सवय रुजवायची आवश्यकता आहे. शाळा-महाविद्यालये यांतूनही याविषयी सतत प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी स्वतःपासून आरंभ करणे आवश्यक आहे. मुलांसाठी त्यांचे आदर्श म्हणजे त्यांचे आई-वडील असतात. पालकांनी त्यांचा ‘स्क्रीन वेळ’ न्यून करण्याची आवश्यकता आहे. बर्‍याचदा अगदी लहान मुलांनी शांत रहावे अथवा जेवण करावे म्हणून त्यांच्या हातात भ्रमणभाष दिला जातो. मुलांना त्यामध्ये गुंतवून पालक स्वतःच काम करत रहातात, म्हणजे मुलांना ‘स्क्रीन’चे व्यसन लावण्यास पालक हेच अप्रत्यक्षपणे उत्तरदायी ठरतात. मुले ऐकत नसतील, तर शिक्षापद्धत अवलंबावी. ‘स्क्रीनच्या वेळे’विषयी एक नियमावलीही करू शकतो; उदा. गृहपाठ झाल्यावर थोडा वेळ दूरचित्रवाहिनी पहाणे. जेवणाच्या वेळी भ्रमणभाष वापरू नये, जेणेकरून हा वेळ मुलांना देता येईल आणि साधन यंत्रांपासून (गॅझेट) काही वेळ तरी मुक्तता मिळवून आयुष्यातील आनंद अनुभवता येईल, तसेच नातेसंबंधही वृद्धींगत करता येतील !

– श्री. जयेश बोरसे, पुणे