राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे अपात्रता प्रकरण
मुंबई – अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटाने याला आव्हान दिलेले नाही. त्यामुळे दोन्ही गटांचे संख्याबळ स्पष्ट होते. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधीमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. विधीमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण ?, हे मी ठरवू शकत नाही. विधीमंडळ पक्षात बहुमत कुणाचे आहे, हा निकष यासाठी महत्त्वाचा आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
सौजन्य एबीपी माझा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ५ याचिकांवर निर्णय दिला. शरद पवार गटाकडून ३, तर अजित पवार गटाकडून २ याचिका सादर करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचे नेतृत्व आणि पक्षाचा विधीमंडळ गट यावरून यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.