उच्च न्यायालयाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘सी.आर्.झेड्.’ यांना कारवाई करण्याचे आदेश
(‘सी.आर्.झेड्.’ म्हणजे समुद्रकिनारपट्टी नियमन विभाग प्राधिकरण)
पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) : पेडणे तालुक्यात गिरकारवाडो, हरमल येथे २५० अनधिकृत बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि समुद्रकिनारपट्टी नियमन विभाग प्राधिकरण (‘सी.आर्.झेड्.’) यांना संबंधित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
(सौजन्य : Prudent Media Goa)
समुद्रकिनारपट्टी नियमन विभाग प्राधिकरणाने (सी.आर्.झेड्.) गिरकारवाडो, हरमल येथे २१७ अनधिकृत बांधकामे असल्याचे, तर हरमल पंचायतीने या ठिकाणी २१७ अनधिकृत बांधकामांबरोबरच अतिरिक्त ३३ हंगामी तत्त्वावर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी या दिवशी ‘सी.आर्.झेड्.’ला २१७ अनधिकृत बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळालाही बांधकाम व्यावसायिकांकडे व्यवसायासंबंधी अनुमती नसल्यास ३३ अनधिकृत बांधकामांना टाळे ठोकण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने माजी सरपंच तथा गिरकारवाडो विभागाचे विद्यमान पंचसदस्य बर्नार्ड फर्नांडिस आणि त्यांचे कुटुंबीय यांना त्यांनी उभारलेली सर्व बांधकामे आणि ती बांधकामे कोणत्या कारणास्तव उभारली यासंबंधी माहिती देण्याचा आदेश दिला आहे. पंचायत संचालकांनी गिरकारवाडो विभागाचे पंचसदस्य बर्नार्ड फर्नांडिस याला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून त्यांची पंचसदस्य पदावरून उचलबांगडी का करू नये ? अशी विचारणा केली आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणी पंचसदस्य बर्नार्ड फर्नांडिस यांचे उत्तर आल्यावर २६ फेब्रुवारी या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.