कलात्मकतेच्या (तोफेच्या) तोंडी संस्कृती-संस्कार ?

२ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्रात चालू असलेल्या अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षेत दाखवत असलेल्या प्रसंगात रामायण, रामलीला यांतील थोडे लिखाण आणि प्रभु श्रीराम, सीतामाई, हनुमान, लक्ष्मण या व्यक्तीरेखा वापरून व्यासपिठाच्या मागे कलाकारांकडून विडंबनात्मक उपहास, अश्लील भाषा आणि आक्षेपार्ह वर्तन या माध्यमातून दाखवण्यात आले. त्या वेळी जमलेल्या प्रेक्षकांमधून प्रसंग चालू असतांना हुल्लडबाजी दिसून आली आणि या सगळ्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संतापजनक प्रतिक्रिया देत प्रसंग थांबवले. याप्रसंगी झालेल्या वादावादीत आणि हाणामारीत दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांना मार बसला. ललित कलाचे विभागप्रमुख आणि ३ परीक्षक त्या वेळी तिथे उपस्थित होते. विभाग प्रमुखांनी या प्रकाराचे जाहीर समर्थन करत आक्षेप घेणार्‍या विद्यार्थ्यांना तीव्र विरोध दर्शवला. यातून विभागप्रमुखही रामायण आणि त्यातील देवीदेवतांच्या विंडबनात्मक उपहासात सामील होते, असे दिसून येते. यानंतर प्रविष्ट (दाखल) केलेल्या प्रथमदर्शी अहवालाच्या नंतर ललित कलाचे विभागप्रमुख आणि प्रसंगातील सहभागी ५ विद्यार्थी (संहिता लेखक, दिग्दर्शक, व्यक्तीरेखा साकारणारे नट) अशा ६ जणांना अटक झाली. नंतर त्यांना प्रत्येकी ५० सहस्र रुपये आणि आठवड्यातून २ वेळा पोलीस ठाण्यात उपस्थित रहाण्याच्या अटीवर जामीन मिळाला. विद्यापिठाने घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यासाठी ७ जणांची ‘सत्यशोधन समिती’ गठित केलेली आहे. त्या समितीची पहिली बैठक ७ फेब्रुवारीला पार पडली.

१. ललित केंद्रात सादर केलेले नाटक आणि विद्यार्थी यांच्या बाजूने प्राध्यापकांचे मत

ललित कला केंद्राने सादर केलेल्या नाटकातील एक प्रसंग

या सगळ्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंनी सर्वत्र धुरळा उडाला. काही प्राध्यापकांनी विभागप्रमुखांच्या अटकेचा तीव्र निषेध नोंदवला. त्यांचे म्हणणे असे, ‘अशी कारवाई आवारात करण्यास विद्यापिठाने नकार द्यावयास हवा होता. हे आमच्या ‘सेवा सुरक्षा नियमावली’च्या विरुद्ध आहे. अशा चुका लहान मुलांकडून घडल्या, तरी त्यांना क्षमा करावयास हवे. त्या प्रसंगात काही आक्षेप घेण्यासारखे असले, तरी ते पूर्ण पाहून मगच त्यावर आक्षेप नोंदवायला हवा होता.’ अशा प्रतिक्रिया प्राध्यापकांनी व्यक्त केल्या. ‘मुळात जर अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षा होती, तर केवळ विभागाच्या विद्यार्थ्यांनाच बोलवावे. इतर प्रेक्षकांना बोलावण्याची आवश्यकता नाही’, असे ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विजय गोखले, तसेच अभिनेता अन् दिग्दर्शक श्री. मिलींद शिंत्रे यांनी मत व्यक्त केले. बरे ज्यांनी संहितेमध्ये ‘भ’ आणि ‘म’ यावरून शिव्या सीतेची व्यक्तीरेखा करणार्‍या अभिनेत्याच्या तोंडी घातल्या, ज्या दिग्दर्शकाने सीतेच्या वेषातील अभिनेत्याच्या तोंडात सिगारेट अन् लक्ष्मणाच्या वेषातील अभिनेत्याने ती लायटरने लावणे, अशी ती लहान लहान मुले नक्कीच नाहीत.

२. प्रायोगिक नाटक बसवले जात असतांना मार्गदर्शकासह अन्य सहभागींची भूमिका

समजा असे गृहित धरले की, ती मुले निरागस (इनोसंट) आहेत; पण अशा प्रकारच्या ‘परफॉर्मिंग आर्ट्स’च्या (प्रायोगिक कलेच्या) सादरीकरणाच्या आधी एक साचेबद्ध प्रक्रिया अंगिकारली जाते. त्यात या मुलांना एक ‘मेन्टॉर’ (मार्गदर्शक) दिलेला असतो. या मार्गदर्शकाने त्या मुलांना प्रायोगिक कलेमधील विडंबन आणि विकृती, विनोद अन् उपहास, तसेच नैतिक आणि अनैतिकता यांच्यातील भेद स्पष्ट करून सांगणे आवश्यक आहे. जे इथे झालेले दिसत नाही. ‘साधारणपणे ‘ॲकॅडमिक’ (शैक्षणिक) विषयांची परीक्षा आणि अशा प्रायोगिक कलेची परीक्षा यांतील भेद नीट समजून घ्यावयास हवा. ‘ॲकॅडमिक्स’च्या विषयांमध्ये ‘विषय अथवा सामुग्री (कंटेंट)’ ठरलेला असतो. विद्यार्थी अभ्यास करून परीक्षा देतात आणि त्यांना गुण दिले जातात. यात प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर प्राध्यापक मुलांना मार्गदर्शन करत नसतात. प्रायोगिक कलेमध्ये बरोबर उलट प्रक्रिया आहे. प्रश्नपत्रिकारूपी प्रयोग माहिती असतो. तो बसवण्यासाठी मार्गदर्शक प्राध्यापकांचे साहाय्य घेणे अपेक्षित असते. त्यामुळे ‘लिखाण’ सादर करतांना तो अश्लील नसणे, त्यात आक्षेपार्ह भाषा, चुकीची देहबोली वापरली जाऊ न देणे, हे मार्गदर्शक, संहिता लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्या हातात असते’, असे मुद्दे रंगकर्मी श्री. विजय गोखले, अभिनेते अन् दिग्दर्शक श्री. मिलींद शिंत्रे यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले.

३. ललित कला केंद्राच्या नाटकातील प्रसंग म्हणजे जाणीवपूर्वक उकसवण्यासाठी केलेला प्रकार !

‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’च्या (‘एन्.एस्.डी.’च्या) शैक्षणिक परिषदेचे सदस्य विजय केंकरे यांनी ‘प्रसंग पूर्ण न पहाता अर्ध्यावरच थांबवण्ो’, यावर आक्षेप घेतला, तसेच त्यांनी ‘आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा कलेचा भाग आहे’, याचे समर्थन करतांना ‘संगीत वस्त्रहरण’, ‘सखाराम बाईंडर’ यांसारख्या नाटकांचा संदर्भ सांगितला. मला केंकरे यांना सांगावेसे वाटते, ‘एखादा गुन्हा घडतांना तो पूर्ण घडू द्यावा आणि मग त्या गुन्ह्याची चौकशी किंवा कारवाई करावी, असे अपेक्षित नसते. ललित कलातील प्रकार हा बहुसंख्य हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान जाणीवपूर्वक करण्याचा प्रकार होता. हे मी पुढील मुद्यांच्या माध्यमातून स्पष्ट करते.’ श्री. विजय गोखले यांनी स्पष्ट केले, ‘‘कलेच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीचा आतून प्रभाव दाखवणे अपेक्षित असते, ना की प्रत्यक्ष त्या गोष्टी दाखवणे.’’ ‘‘त्यासमवेत जेव्हा ‘ऑन स्टेज’ (प्रत्यक्ष व्यासपिठावर) आणि ‘बॅक स्टेज’ (व्यासपिठाच्या मागे) असे दोन्ही एकाच प्रयोगात दाखवत असतांना त्यातील भेद हा अतिशय स्पष्टपणे संवाद, प्रकाशयोजना आणि व्यक्तीरेखेच्या वागणुकीतील पालटाने दाखवता येतो’, असे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले. ‘वस्त्रहरण’ नाटकामध्ये जरी द्रौपदीची व्यक्तीरेखा करणारा व्यासपिठावर सिगारेट फुंकतांना दाखवला असला, तरी तो कोणत्याही अंगाने द्रौपदी वाटत नाही, तर व्यासपिठाच्या मागील बंड्याच वाटतो. शिंत्रे यांनी त्यांचे स्वत:चे ‘मोरुची मावशी’ या नाटकातील व्यक्तीरेखा साकारतांनाचा अनुभव सांगतांनाही हेच मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘हे सगळे स्पष्टपणे बसवणे, हे दिग्दर्शकाचे काम असते. ललित कलाच्या प्रकरणामध्ये जर दिग्दर्शक शिकाऊ आहे, असे जरी म्हटले, तरी मार्गदर्शक तेवढ्यासाठीच दिलेला असतो.’’ त्यामुळे ललित कला केंद्रातील तो प्रसंग हा जाणीवपूर्वक उकसवण्यासाठी केलेला प्रकार होता, हे दिसून येत आहे.

४. कलात्मकता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्या व्याख्या परस्पर संवादाने घासून घेण्याची तीव्र आवश्यकता !

प्रसिद्ध अभिनेते अभिराम भडकमकर याविषयी म्हणतात, ‘‘अभिव्यक्ती हे बौद्धिक मूल्य आहे. विचारांच्या बैठकीचे ते अधिष्ठान आहे. त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यासह एक दायित्वही येते. नव्या पिढीला शिक्षणातून हे भान देणे जसे अभिप्रेत असते, तसे कलात्मकतेतील मूल्यभानही महत्त्वाचे असते याचे ज्ञान देणे ! देवीदेवतांना मनुष्य पातळीवर आणण्याची वैचारिक समृद्धी असलेल्या या समाजाने देवतांचे विडंबन हे प्रसंगातून अगदी निखळ थट्टाही सामावून घेतली आहे; पण ‘हाच समाज अतीसंवेदनशील होत चालला आहे’, असे म्हणतांना त्याची बीजे ठराविक, पक्षपाती अाणि असहिष्णु होत गेलेल्या आविष्कार स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आहेत का ? याचाही विचार व्हायला हवा. ललित केंद्रामध्ये उमटलेली प्रतिक्रिया हा या समाजाचा स्थायीभाव नसून तात्कालीक उद्वेग आहे. तो स्थायीभाव होऊ न देणे, हे आपणा सर्व रंगाकर्मींचेच उत्तरदायित्व आहे. प्रत्येक घटनेत भांडवल करण्याची संधी शोधणार्‍या कुठल्याही व्यक्ती आणि संस्था यांच्या हातात हा प्रश्न सोपवण्याचा मोह टाळून पुन्हा एकदा कलात्मकता, अविष्कार, मुक्त अवकाश आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्या व्याख्या परस्पर संवादाने घासून घेण्याची तीव्र आवश्यकता आहे.’’

५. समाजाने कलेच्या नावाखाली स्वैराचार स्वीकारू नये !

‘कलेच्या नावाखाली अशा प्रकारचा स्वैराचार समाजाने कधीच स्वीकारू नये’, असे माझे मत आहे. जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात पुण्यातील एका प्रथितयश शाळेत ७ वीच्या वर्गातील मुलांनी २ शिक्षक येण्याच्या मधल्या कालावधीत वर्गातीलच एका मुलाला बाकावर झोपवून त्याच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेत त्या वर्गातील ३-४ मुले जरी सहभागी असली, तरी बाकीचा वर्ग ते सगळे उभे राहून पहात होता. या मुलांच्या तोंडात अत्यंत अश्लील भाषा होती. आता हे सगळे प्रदर्शन करण्याची बुद्धी या मुलांना कुठून मिळाली ? ज्या मुलावर अत्याचाराचा प्रयत्न केला गेला, त्याच्या मानसिक अवस्थेचे, त्याच्यावर झालेल्या आघाताचे काय ? ज्या मुलांनी हा सगळा प्रकार पाहिला, त्यांच्या मनावर काय परिणाम झाला ? ज्या मुलांनी हे केले, त्यांची मानसिक परिस्थिती काय होती ? ‘आपण जे कृत्य करतो आहोत, ते चुकीचे आहे’, याची जाणीव त्यांना असेल का ? प्रश्न उपस्थित होतो की, त्या मुलांनी हे का केले असावे ?  हे असले प्रसंग अनेक शाळांमध्ये घडत आहेत; पण बाहेर येत नाहीत. त्या शाळेतील अत्याचारित मुलाच्या पालकांनी विषय लावून धरला आणि ‘सीसीटीव्ही फूटेज’ उपलब्ध झाले म्हणून ते प्रकरण बाहेर आले अन् संबंधित मुलांवर कारवाई झाली; पण मूळ प्रश्न तसाच आहे.

या अशा प्रकरणांच्या मुळाशी विद्यार्थी दशेत किंवा पौगंडावस्थेत विद्यार्थ्यांच्या हातात मिळालेले भ्रमणभाष, टीव्ही, ‘ओटीटी प्लॅॅटफॉर्म्स’ (‘ओटीटी म्हणजे ओव्हर दी टॉप.’ ॲपच्या माध्यमांतून चित्रपट, मालिका आदी कार्यक्रम पहाणे) आणि त्यात ते बघत असलेला ‘कंटेंट’ (सामुग्री) आहे. नाही तर असभ्य भाषा, अश्लील वर्तन आणि शिव्या हे या मुलांना घरी शिकवले गेले का ? इथे ‘कंटेंट’ कुठून येत आहे ? मनोरंजन क्षेत्राकडून ! मनोरंजन आणि कला यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवणार आणि ते जनता बघणार. या सगळ्यावर तारतम्याचाच अंकुश हवा, नाही तर कलात्मकतेच्या (तोफेच्या) तोंडी संस्कृती, संस्कार, मूल्यव्यवस्था दिल्यासारखे होईल आणि कालांतराने हे सगळे नष्ट होईल.

लेखिका : डॉ. अपर्णा लळिंगकर, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. (९.२.२०२४)

संपादकीय भूमिका 

मनोरंजन अन् कला यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवले जाते, त्यावर कठोर कायद्याचा अंकुश कधी येणार ?