प्रेमाच्या उच्च आदर्शांचा गळा घोटणारा ‘व्हॅलेंटाईन डे’ !

आज देश-विदेशात अनेक ठिकाणी कथित ‘व्हॅलेंटाईन डे’, म्हणजे ‘प्रेमदिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने…

१. पाश्चात्त्यांची परंपरा ! 

पाश्चात्त्य सभ्यतेत पूर्वीच्या काळी विवाहासारख्या कोणत्याही संस्थेचे विशेष महत्त्व नव्हते आणि आजही नाही. तेथे स्त्री-पुरुष पशूसमान एकत्रित येतात, आपल्या वासनेची तृप्ती करतात आणि या माध्यमातून तेथे अपत्य जन्माला घालण्याची प्रक्रिया चालत आली आहे, हीच तेथील परंपरा अन् सभ्यता आहे. तेथे असा कुणी पुरुष किंवा महिला मिळणे शक्य नाही, ज्याचा केवळ एकच विवाह झाला असेल, ज्याचा आपल्या संपूर्ण जीवनात एकच पुरुष किंवा एकाच स्त्रीशी संबंध राहिला असेल आणि हीसुद्धा त्यांची शतकापासूनची पुरातन परंपरा आहे.

श्री. रमेश शिंदे

२. भारत आणि पाश्चात्त्य देश येथील ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे स्वरूप !

भारतात आजच्या निधर्मी असलेल्या आधुनिक वर्गामध्ये बुद्धीभ्रष्ट झाल्यामुळे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे) काही दशकांपासून प्रचलित आहे. यात लोक-लज्जेच्या सर्व मर्यादा ओलांडून स्त्री-पुरुष व्यभिचार करतात. त्या संबंधांना पती-पत्नीचा संबंध सांगितले जाते; परंतु पाश्चात्त्यांमध्ये ही म्लेंच्छ परंपरा त्यांच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग झाली आहे. आजही अमेरिकेतील २४ ते ३५ टक्के वयाचे ७० टक्के युवा अविवाहित आहेत; कारण ते अविवाहितच राहू इच्छितात. युरोपचेही अधिकांश युवा विवाह करू इच्छित नाहीत. एवढेच नव्हे, तर आता ते अपत्यालाही जन्म देऊ इच्छित नाहीत.

३. स्त्रियांना अतिशय तुच्छ समजणारे पाश्चात्त्यांचे विचार !

पाश्चात्त्यांसाठी स्त्री ही केवळ एक भोगवस्तू आहे. तेथे स्त्री आणि पुरुष दोघांचेही अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध असतात. त्यामुळेच ते स्वतःला विवाहबंधनात बांधून घेऊ इच्छित नाहीत. तेथे ‘एकपत्नीव्रता’सारखा कोणताही धर्म नाही. तेथील महान म्हणवल्या जाणार्‍या दार्शनिकांचे म्हणणे आहे की, स्त्रियांमध्ये आत्माच नसतो. स्त्री तर पटल आणि आसंदी (टेबल-खुर्ची) समान असते; म्हणून जेव्हा जुन्या वस्तूंमुळे मन उबते, तर नवीन वस्तू घेऊन येतो, त्याप्रमाणे स्त्रीशी व्यवहार करावा.

४. पाश्चात्त्यांच्या दृष्टीने विवाह म्हणजे भोग आधारित करार !

आजही विवाहाविना पती-पत्नी समान रहाणार्‍या जोडप्याला हिंदु समाजात हीन दृष्टीने पाहिले जाते. आज अनेक हिंदू काही ठाऊक नसतांनाही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करत आहेत. दूरचित्रवाणी, वाहिन्या, वर्तमानपत्रे या कुसंस्कारांना प्रसारित करतांना आगीत तेल ओतण्याचे कार्य करतात. ही विकृत महामारी मोठ्या महानगरांसहच आता लहान लहान शहरांतही पसरत आहे. पाश्चात्त्यांमध्ये भारतासारखे विवाहरूपी संस्कार मानण्याची परंपरा नाही. तेथे विवाहाला अधिकांशत: भोग आधारित करार मानला जातो. त्यामुळे तेथे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वार्थाची पूर्तता होत नाही, तर त्याचा परिणाम घटस्फोट, म्हणजे विवाह विच्छेदनात होतो. ही वास्तविकता भारतीय समाजात पोचवण्याची आवश्यकता आहे. सामूहिक स्तरावर याविषयी जागृती निर्माण करून अशा कुप्रथांना बंद करण्याची आवश्यकता आहे.

५. मुलांकडून आई-वडिलांवर अन्याय !

आई-वडील मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट घेतात. त्यांच्या कल्याणासाठी अनेक प्रकारचा त्याग करतात; परंतु कथित प्रेमाच्या प्रभावात युवक-युवती आपल्या आई-वडिलांनी २०-२५ वर्षांपर्यंत केलेले प्रेम क्षणात विसरून जातात. हे कसले प्रेम आहे ? हा आई-वडील यांच्यावर केलेला अन्याय नव्हे का ? त्यांची इच्छा, अपेक्षा आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा यांच्याशी खेळण्यासारखे नाही का ? त्यांच्या सन्मानाला अपमानित करण्यासारखे नाही का ?

६. सध्याच्या पिढीकडून केला जाणारा व्यवहार विकृतच !

एखादा मुलगा किंवा मुलगी यांची मैत्री त्यांना संतुष्ट करू शकत नाही. ते अनेक मुले-मुली यांच्यावर प्रेम करतात. आपल्या अपेक्षांच्या कसोटीवर ते उतरतात कि नाही, हेसुद्धा निरखून पहातात. या विकृत व्यवहारात शोषणाचे षड्यंत्र आणि वासना भरलेल्या असतात, ते प्रेम कसे असू शकते ?

७. प्रेमाचा बाजारूपणा !

प्रेम केवळ शारीरिक नसते, तात्पुरते नसते. त्यामध्ये समर्पण असते ! प्रेम केवळ लौकिकच नाही, तर ते अलौकिक आणि अप्रतिम असते. प्रेम हे दोन हृदयांचे मीलन असते; परंतु आज बाजारूपणाच्या आंधळ्या शर्यतीत या हृदयात आपुलकी अनुभवण्याच्या ठिकाणी चॉकलेट, महागड्या भेटवस्तू, शुभेच्छापत्रे आणि फुलांचे गुच्छ यांना प्रेमस्वरूप करण्यात आले.

८. भारतातील विवाहाचे महत्त्व

भारतासारख्या देशात विवाहाला महत्त्वाचा संस्कार मानून त्यासाठी तिथी, मुहूर्त आणि नक्षत्र यांचे अध्ययनही महत्त्वाचे असते. अशा देशात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे, याला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणे नाही, तर काय म्हणणार ? एका अमेरिकन संशोधनानुसार जगात ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी न्यायालयात प्रविष्ट होणार्‍या घटस्फोटाच्या अर्जांमध्ये ४० टक्के एवढी वाढ होते.

९. भारतीय संस्कृती आणि विदेशी विकृती यांच्यातील भेद !

एक उदाहरण सांगतो. दोन भाऊ होते. एक भाऊ विदेशात रहात होता. एकदा विदेशात रहाणारा भाऊ गावी आला. लहान भाऊ आजारी वडिलांच्या सेवेत व्यस्त होता. तो रात्रंदिवस त्यांची सेवा-शुश्रूषा करत होता. विदेशात रहाणार्‍या भावाने वडिलांचे पाय चेपतांना स्वतःचे छायाचित्र काढले आणि ते फेसबुकवर ठेवले. एका पुत्राने सेवा केली आणि दुसर्‍याने प्रेमाचा केवळ दिखाऊपणा केला. भारतीय संस्कृती आणि विदेशी विकृती यांच्यात हाच भेद आहे. एक प्रत्यक्ष प्रेम करते आणि दुसरे प्रेम दिखाऊपणा करते.

१०. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीचे प्रेम आणि भारतीय संस्कृती !

भारतीय संस्कृतीमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ केवळ पाश्चात्त्य विकृतीचे बेढब रूपच दिसून येते. ते भारतीय परंपरागत शाश्वत प्रेमाच्या समोर टिकूच शकत नाही. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेम हे आत्म्याचे आत्म्याशी मीलन असते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीचे प्रेम हे केवळ शारीरिक सुखाचे साधन आहे. जे भारतीय परंपरागत संस्कृतीच्या अगदी प्रतिकूल आहे आणि भारतीय युवा पिढीला पथभ्रष्ट करण्याचे कुत्सित प्रयोजन आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ आत्मिक प्रेमापासून विमुख करून शारीरिक प्रेमाकडे आकर्षित करते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशीचे प्रेम मर्यादाहीन असते. भारतीय संस्कृतीत अशा प्रेमाला कोणतेही स्थान नाही.

१० अ. भारतीय संस्कृतीतील प्रेम ! : आमची भारतीय संस्कृतीही चराचरांवर प्रेम करायला शिकवते. भारतीय संस्कृतीत ‘प्रेम’ हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शिवाला प्राप्त करण्यासाठी पार्वतीने कठोर तपस्या केली होती. राधेची भगवान कृष्णाप्रती भक्ती आणि प्रेम होते. कृष्णाप्रती मीरेची अनन्यभक्ती हेसुद्धा प्रेमाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. फाल्गुन मासात येणार्‍या होळीच्या उत्सवाला रंगासह प्रेमाचा उत्सव मानला जातो. प्रेम आमच्या संस्कृतीत मुरले आहे. प्रेम कधी अधिकार गाजवत नाही, ते तर नेहमी अधिकार देते. प्रेम नेहमी त्रास सहन करते, प्रेम कधीच आक्रमक नसते, ना कधी ते सूड घेते. प्रेम हे केवळ शरिराशी जोडलेले नसून ती आत्म्याशी जोडली गेलेली एक संवेदना आहे. प्रेम ही प्रदर्शनाची वस्तू नाही किंवा खेळणे नाही, ज्याला जे हवे, जे खरेदी केले, ते खेळावे आणि तोडून फेकून द्यावे. प्रेम पवित्र भावना आहे. त्याच्याशी खेळ करता कामा नये. प्रेम तर संपूर्ण विश्वास मागते, संपूर्ण स्वाधीनता आणि संपूर्ण दायित्व मागते. प्रेम पल्लवित होण्याची शक्ती त्याच्यातच असते. खरेखुरे प्रेम जीवनाला नवीन अर्थ प्रदान करते. हृदयाला हृदयातून, मनाला मनातून आणि आत्म्याला अंतरात्म्यातून जोडते.

भारतीय संस्कृती प्रेमाचे पावित्र्य, मनाची सुंदरता, मर्यादा, प्रतिष्ठा, इंद्रिय नियंत्रण, आत्मिक अनुराग आणि जन्म-जन्मांतराच्या नात्याला मान्यता असे मानते. भारतीय मान्यतेमध्ये विवाहपूर्वीच्या संबंधांना कदापि स्वीकारलेले नाही. प्रेमी युगुलांचे बागेत, कोपर्‍यात, एकांतात जाणे याला भारतीय संस्कृती कदापिही स्वीकारू शकत नाही.

१० इ. भारतीय संस्कृतीने दिलेले अलौकिक प्रेमच हवे ! : दिखाऊपणा करणार्‍या ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या दिवसाची आम्हाला मुळीच आवश्यकता नाही. आम्हाला भारतीय संस्कृतीने दिलेले अलौकिक प्रेमच संपूर्ण जगात वाटायचे आहे; कारण त्यातच जगाचे कल्याण आहे. ‘आजच्या अलौकिक प्रेमाच्या भावनेला ओळखून भारतीय संस्कृतीला अग्रेसर करण्याची प्रेरणा मिळावी’, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे.

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

भारतीय संस्कृतीचा अंगीकार करा !

या तुलनेत ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे क्षणभंगुर (लघुजीवी) आहे, ते एक-दिवसापुरते आहे, क्षणिक आहे, केवळ वरवरचा देखावा भरलेला आहे, संकुचित विचार व्यक्त करण्याचा केवळ संधीसाधूपणा आहे. प्रेम आणि अनुराग यांनी भरलेल्या स्नेहाच्या संक्रांतीत वाढलेले कोणतेही भारतीय हृदय प्रेमाच्या विरुद्ध जाऊ शकते का ? येथे तर प्रेमाची व्याख्या अलौकिक अनुभूती, समर्पण, भक्ती आणि श्रद्धा यांच्या रूपात ना केवळ ओळखली जाते, तर ते प्रेम प्रत्यक्ष अनुभवले जाते. त्यामुळे युवकांना माझे आवाहन आहे की, उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही पाश्चात्त्य विकृतीला आत्मसात् करायचे सोडून भारतीय संस्कृतीकडे परतावे आणि जीवनात आनंद प्राप्त करावा.

– श्री. रमेश शिंदे