ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अनुमती दिल्याचे प्रकरण
१५ फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये असलेल्या व्यास तळघरात पूजा चालू केल्याच्या प्रकरणी मुसलमान पक्षाने प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी ज्ञानवापी व्यवस्था समिती आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड यांच्या अधिवक्त्यांनी त्यांची बाजू मांडली. आता १५ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या वेळी हिंदु पक्ष बाजू मांडणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत पूजेच्या आदेशाला स्थगिती दिलेली नाही.
मुसलमान पक्षाने युक्तीवादात म्हटले की, व्यास तळघर कधीही हिंदूंच्या कह्यात नव्हते. तळघर कह्यात असल्याचा हिंदूंचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. बाबरी प्रकरणात निर्मोही आखाड्याच्या वतीने एका व्यक्तीने उभे राहून पूजा करण्याचा अधिकार मागितला होता; मात्र न्यायालयाने तो मान्य केला नाही. (या खटल्याचा निकाल शेवटी हिंदूंच्या बाजूने लागला होता, हे मुसलमान पक्ष सोयीस्कर विसरतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) ‘व्यास कुटुंबीय पूजा चालू करण्याची मागणी कोणत्या अधिकारात करत आहेत ?’, हे जिल्हा न्यायाधिशांनी विचारायला हवे होते. जिल्हा न्यायाधिशांनी त्यांच्या याचिकेवर निर्णय घेण्याऐवजी थेट पूजा करण्याचा आदेश दिला.