पुणे – भूतकाळात घडलेल्या चुका वर्तमान आणि भविष्यकाळामध्ये घडू नयेत, हे समजण्यासाठी इतिहास वाचावा लागतो; परंतु आपला महाराष्ट्र इतिहास जातीपातीच्या नजरेतून पहातो. त्यामुळेच येथील महापुरुष आपल्या रक्तात भिनण्याऐवजी जातीपातीचे राजकारण आपल्यामध्ये भिनले आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. राज ठाकरे यांनी सदाशिव पेठेतील ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’ला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते.
राज ठाकरे यांनी ‘मंडळा’ला पक्षाच्या वतीने २५ लाख रुपये देणगीचा धनादेश सुपुर्द केला. ‘भारत इतिहास संशोधन मंडळा’ने राज ठाकरे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पत्रांची प्रत, थोरले बाजीराव पेशवे यांचे चित्र आणि काही पुस्तके भेट म्हणून दिली.
वर्ष १९९२ ला बाबरी मशीद पाडली गेली, त्या वेळी शिवसेनेचे बाळा नांदगावकर कारसेवेसाठी गेले होते. त्यांनी येतांना बाबरीची ‘वीट’ सोबत आणली होती. या विटेवरही संशोधन व्हावे, त्या वेळच्या बांधकामांचा अभ्यास व्हावा, यासाठी राज ठाकरे यांनी ही वीट ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’कडे सुपुर्द केली आहे.