भारतीय सैन्यावर टीका करणार्‍या ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध !

पुणे – येथील ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवामध्ये ‘प्रभास चंद्रा’ लिखित आणि दिग्दर्शित ‘आय एम नॉट द रिव्हर झेलम’ या चित्रपटामध्ये भारतीय सैन्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असल्याचा आरोप करत ‘समस्त हिंदु बांधव सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटास विरोध केला. चित्रपटाचा नामफलक फाडून, घोषणाबाजी करत याचा निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांमध्ये रवींद्र पडवळ, ऋतुजा माने, अनिरुद्ध लष्करे  यांचा सहभाग होता.

चित्रपटाचे स्क्रिनिंग होत असतांनाच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणा देत प्रवेशद्वारासमोर गोंधळ घातला. आंदोलकांपैकी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काहींनी आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. काश्मीरमधील हिंसाचारावर आधारित चित्रपटामध्ये भारतीय सैन्यावर टीका केली आहे, असा आरोप होत आहे. चित्रपटामध्ये आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतीय सैन्य दलावर आक्षेप घेणारा चित्रपट आम्ही पुणे जिल्ह्यात प्रदर्शित होऊ देणार नाही. वेळप्रसंगी कठोरातील कठोर आंदोलन घेण्यासाठी आम्ही सिद्ध राहू. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी दशेत राष्ट्राभिमान जागृत राहणे. हे आम्ही आमचे प्रथम कर्तव्य समजतो. हे असे लघुचित्रपट प्रदर्शित करण्याआधी ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे, हे लक्षात ठेवावे..! – श्री. ऋषिकेश कामथे, गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य