सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘समस्त विश्वाला प्रकाश, ऊर्जा अन् चैतन्य प्रदान करणारी देवता म्हणजे सूर्यनारायण ! हिंदु धर्मात सूर्याेपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘आरोग्यं भास्करात्  इच्छेत् ।’, म्हणजे सूर्याकडून आरोग्याची इच्छा करावी, म्हणजेच ‘सूर्योपासना करून आरोग्य मिळवावे’, असे सुवचन आहे. हिंदूंचा दिवस सूर्योदयापासून चालू होतो आणि संपतोही सूर्यास्तानंतरच; म्हणून आपल्या भारतवर्षातील ऋषिमुनी, सिद्ध महात्मे अन् संत यांनी सूर्योपासनेचा दंडक घालून दिलेला आहे. सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन प्रतिदिन नमस्कार केल्याने व्यक्तीचे आरोग्य उत्तम रहाते. ‘सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत आध्यात्मिक त्रास असलेली १ व्यक्ती आणि आध्यात्मिक त्रास नसलेली १ व्यक्ती यांनी सूर्याेदय अन् सूर्यास्त या वेळी सूर्याला अर्घ्य दिल्याचा त्यांच्यावर झालेला परिणाम पुढे दिला आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१ अ. सूर्याला अर्घ्य दिल्याचा आध्यात्मिक त्रास असलेली आणि आध्यात्मिक त्रास नसलेली व्यक्ती यांच्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : सूर्याला अर्घ्य दिल्याने दोघांतील  नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

टीप – सूर्याेदयापेक्षा (उगवत्या सूर्यापेक्षा) सूर्यास्ताला (मावळतीला) सूर्याचे तेज थोडे न्यून (कमी) होते, त्यामुळे सूर्याेदयापेक्षा सूर्यास्ताला अर्घ्य दिल्यावर व्यक्तीतील सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ थोडी अल्प (कमी) आहे.

२. निष्कर्ष

‘सूर्याला अर्घ्य दिल्याने व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होतो’, हे या वैज्ञानिक चाचणीतून सिद्ध झाले.

सौ. मधुरा कर्वे

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. सूर्याला अर्घ्य दिल्याने चाचणीतील व्यक्तींना पुष्कळ चैतन्य मिळणे : सूर्यामध्ये प्रचंड तेज आणि ऊर्जा आहे. सूर्याच्या तेजोमय किरणांमुळे वायूमंडल शुद्ध अन् पवित्र बनते. सूर्याची उपासना केल्याने उपासकाला सूर्याचे चैतन्य मिळते. चाचणीतील व्यक्तींनी सूर्याेदय आणि सूर्यास्त यांच्या वेळी सूर्यदेवाला भावपूर्ण अर्घ्य दिल्याने त्यांना सूर्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मिळाले. यामुळे दोघांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाली. यातून ‘हिंदु धर्मात सूर्यनारायण आणि सूर्याेपासना यांना अनन्यसाधारण महत्त्व का दिले आहे’, ते लक्षात येते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.२.२०२४)

इ-मेल : [email protected]

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.