मुंबई महानगरपालिकेची सहस्रो कोटी रुपयांची पाणीपट्टी थकित !

मुंबई – महानगरपालिकेत पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ३ सहस्र ३२० कोटी ०८ लाख रुपये झाली आहे. खासगी गृहसंकुलेच नव्हे, तर चक्क केंद्र सरकार, राज्य सरकार, म्हाडा, एम्.एम्.आर्.डी.ए., बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट आदींचाही समावेश आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी ५३४ कोटी ३० लाख रुपये पाणीपट्टी थकवली आहे. मुंबईमधील गृहनिर्माण सोसायट्यांनी १ सहस्र ८८५ कोटी २० लाख रुपये पाणीपट्टी भरलेली नाही.

महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करापोटी आतापर्यंत केवळ ६०५.१५ कोटी रुपये वसूल करता आले आहेत. चालू वर्षात मालमत्ता करापोटी मिळणार्‍या सुधारित ४ सहस्र ५०० कोटी रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठणेही पालिकेसाठी अवघड बनले आहे.

पाणीपट्टीची थकबाकी वाढू लागल्यामुळे भविष्यात जलविषयक कामांवर परिणाम होण्याची चिंता जल अभियंता विभागाला भेडसावू लागली आहे. महानगरपालिका प्रतिदिन ३ सहस्र ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. धरणातून जलवाहिन्यांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणे, लहान-मोठ्या जलवाहिन्यांच्या जाळ्यातून पाणी मुंबईकरांच्या घरापर्यंत पोचवणे यासाठी खर्च येतो.

अभियंता विभागातील प्रकल्प आणि जलवितरणाशी संबंधित कामांचा खर्च महापालिकेला असतो. थकबाकीची रक्कम वाढू लागल्याने निधीअभावी जल अभियंता विभागातील कामांवर परिणाम होण्याची चिंता भेडसावू लागली आहे. महापालिकेने सध्या मुंबई शहाराच्या सुशोभीकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले असून उत्पन्नाचा मुख्य स्रोत मात्र घटला आहे.

संपादकीय भूमिका 

  • एवढी पाणीपट्टी थकित राहीपर्यंत महापालिका प्रशासन शांत का ? यापूर्वीच त्यांच्यावर कडक कारवाई का झाली नाही ?
  • शासनच देयके थकवत असेल, तर सामान्यांना बोलण्याचा काय अधिकार ?