नवी मुंबई – राज्यशासनाने मराठा आरक्षण मोर्चाच्या वेळी सगेसोयरे यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना पारित केली आहे. त्या अधिसूचनेचे कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी येत्या १० फेब्रुवारीला होणार्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव संमतीसाठी ठेवण्यात येणार आहे. सर्व मराठा समाजाने आपापल्या क्षेत्रातील आमदारांना संपर्क करून निवेदने देऊन हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यास सांगावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी आगरी कोळी भवन येथे आयोजित आभार सभेमध्ये केले. हा प्रस्ताव संमत झाला, तर त्याचे कायद्यात रूपांतर होणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. ‘कायदा झाल्यावर त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तर मी थेट मंडल कमिशनला आव्हान देईल’, असेही जरांगे यांनी सांगितले आहे.