महाराष्ट्रात गोसेवा आयोगाचे काम गतीमान करणार ! – राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील, पशूसंवर्धन मंत्री

मुंबई – गोसेवा आयोगाला आवश्यक असलेले एकूण १६ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या मनुष्यबळाच्या परिपूर्ततेनंतर लवकरच आयोगाचे प्रशासकीय कामकाज गतीमान होईल. राज्यात गोसेवा आयोगाचा कारभार गतीमान करण्यासाठी शासनस्तरावर आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राज्यशासनाच्या गोसंवर्धन गोवंश सेवा योजना निवड समितीची बैठक नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरील वक्तव्य केले.

ते म्हणाले, ‘‘पशूधनाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३’ अंतर्गत राज्यात महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाची कार्यपद्धत निश्चित करून गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आयोगासाठी एकूण १६ पैकी ८ नियमित आणि ८ पदे बाह्यस्रोताद्वारे नियुक्त करण्यासाठी १ कोटी २७ लाख ५८ सहस्र इतका व्यय करण्यासाठी मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.’’