संपादकीय : भंगलेले अमेरिकी स्वप्न !

अमेरिकेत मागील २ मासांत भारतीय वंशाच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. यात पर्ड्यू विद्यापिठामध्ये शिकणारे वरुण चिडा, नील आचार्य आणि समीर कामत यांचाही समावेश आहे. वरुण चिडा याची निर्घृण हत्या करण्यात आली, तर नील आचार्य याचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला आहे. समीर कामत याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत वर्ष २०१८ पासून ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक कारणे, पुरेसे वैद्यकीय साहाय्य उपलब्ध न होणे, तसेच अपघात या कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. त्याही पुढे जाऊन भारतीय विद्यार्थ्यांवर होणारी वर्णद्वेषी आक्रमणे हे कळीचे सूत्र आहे. काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या वरुण राज पूचा याचेच उदाहरण पहा. तो व्यायामशाळेत व्यायाम करत असतांना त्याच्यावर आक्रमण करण्यात आले. त्याची हत्या करणार्‍याने ‘मला तो विचित्र वाटायचा; म्हणून त्याची हत्या केली’, असे कारण सांगितले. अमेरिकेतील लोकांमधील ही वर्णद्वेषी मनोवृत्ती तेथील भारतियांच्या मुळावर उठली आहे. मागील २ वर्षांत अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या भारतियांवर होणार्‍या वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील बहुतांश विद्यापिठांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी ‘आमच्यावर शारीरिक आक्रमणे होऊ शकतात’, असे सांगितले आहे. यावरून या समस्येची भयावहता लक्षात येते. उच्चशिक्षण आणि स्वतःचा उत्कर्ष साधण्यासाठी अमेरिकेची वाट धरणार्‍या भारतियांची संख्या मोठी आहे. या घटनांमुळे त्यांचे ‘अमेरिकी स्वप्न’ (अमेरिकन ड्रीम) भंग पावले आहे. ‘अमेरिकन ड्रीम’ ही संकल्पना वर्ष १९३१ मध्ये जेम्स ट्रुसलो ॲडम्स यांनी त्यांच्या ‘एपिक ऑफ अमेरिका’ या पुस्तकात मांडली होती. ‘ज्या भूमीमध्ये वास्तव्य केल्याने प्रत्येकाचे जीवन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण होईल’, असे स्वप्न पाहून त्याची पूर्तता करणे’, असा या संकल्पनेचा ढोबळ अर्थ! प्रथम ही संकल्पना केवळ अमेरिकी लोकांपुरती मर्यादित होती. नंतर त्याची भुरळ जगातील विविध देशांच्या लोकांना पडली. हेच स्वप्न उराशी बाळगून २० व्या शतकापासून भारतातील अनेक तरुण अमेरिकेत गेले; मात्र त्यांच्या हाती काय लागले ? अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या सर्वसाधारण भारतियाचे वार्षिक उत्पन्न १ लाख अमेरिकन डॉलर (८ कोटी ३२ लाख रुपये) एवढे आहे. अमेरिकेतील अग्रमानांकित ६० आस्थापनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय आहेत. अमेरिकेच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये भारतियांचा हातभार मोलाचा आहे. तेथील भारतियांना पैसा आणि प्रतिष्ठा सर्व काही मिळत आहे; मात्र आत्मसन्मानाचे काय ? अमेरिकेतील कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेली उच्चपदस्थ व्यक्ती निदान एकदा तरी वर्णद्वेषी आक्रमणाला सामोरे गेलेली असते. हे आक्रमण भलेही शारीरिक नसेल; मात्र शाब्दिक छळ हा झालेलाच असतो. आत्मसन्मान पायदळी तुडवणारे अमेरिकी स्वप्न पाहून काय उपयोग ?

संस्कृतीशून्य अमेरिकी समाज !

येथे ‘भारत राष्ट्र समिती’च्या नेत्या आणि तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी सांगितलेल्या एका प्रसंगाचा मुद्दामहून उल्लेख करावासा वाटतो. के. कविता या संगणक अभियंता आहेत. त्यांनी बराच काळ अमेरिकेत वास्तव्य केले होते. काही काळाने त्या अमेरिकेतून भारतात परतल्या. याविषयी त्यांना एका मुलाखतीत विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘‘मी इतकी वर्षे अमेरिकेत राहिले; मात्र त्यांना माझे नावही कधी व्यवस्थित उच्चारता यायचे नाही. ‘कॅविटा’ असे काही तरी ते उच्चारत असत. हे मला खटकले. मी माझ्या पतीशी याविषयी चर्चा केली असता, त्यांचेही हेच मत झाले आणि आम्ही भारतात परतलो.’’ के. कविता अमेरिकेतून भारतात परतण्यामागील १-२ कारणांमागील हे एक प्रमुख कारण. त्यांनी विनोदी ढंगाने ही माहिती दिली; मात्र यात गर्भित अर्थ दडला आहे. भारतासारख्या विविधता आणि उच्च दर्जाची संस्कृती लाभलेल्या देशातून जेव्हा एखादी व्यक्ती अमेरिकेसारख्या देशात स्वतःची पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला ते किती कठीण जात असेल, हे येथे लक्षात येते. ‘अमेरिकेत तुम्ही जा, फिरून या; मात्र तो देश रहाण्यालायक नाही’, असे स्पष्ट मतही के. कविता यांनी त्यांच्या मुलाखतीत मांडले होते. भारतावर होणार्‍या वर्णद्वेषी आक्रमणांचा पाढा वाचता, के. कविता यांचे मत निश्चितच अचूक आहे.

अमेरिकी समाज स्वतःला पुढारलेला, व्यक्तीस्वातंत्र्याला प्राधान्य देणारा आणि त्याही पुढे जाऊन स्वतःला मानवतावादी समजतो; मात्र ही बिरूदे किती फोल आहेत, याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अमेरिकेत कृष्णवर्णियांवर होणारे अत्याचार आणि वर्णद्वेषी आक्रमणे सर्वश्रुत आहेत. त्यामुळे कृष्णवर्णीय समाज, तसे ‘सावळे’ (ब्राऊन) संबोधले जाणारे भारतीय यांनी केलेली प्रगती तेथील गोर्‍यांना खुपते. ‘भारतियांमुळे आम्हाला आमच्या नोकर्‍या गमवाव्या लागतात’, असा मतप्रवाह गोर्‍या अमेरिकी समाजामध्ये निर्माण झाला आहे. वर्णद्वेषी मनोवृत्तीविषयी अमेरिकेतही बोलले किंवा लिहिले जाते. याविषयी चर्चासत्रेही होतात; मात्र त्यांचा समाजावर सकारात्मक परिणाम पहायला मिळत नाही. ‘आम्ही सर्वश्रेष्ठ’, या अहंकारातून बनलेली ही मनोवृत्ती पालटण्यास तेथील समाजधुरिणांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील !

‘भारतीय स्वप्न’ पहाण्याची वेळ !

वर्णद्वेष किंवा अपमानास्पद वागणूक केवळ अमेरिकेतील भारतियांना मिळते, असे नाही, तर जगभरातील भारतियांना ही समस्या भेडसावत आहे. एवढेच कशाला ? ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही वर्णद्वेषी छळातून सुटलेले नाहीत. सुनक यांनी ब्रिटीश मुलांप्रमाणे इंग्रजीचे उच्चार करावेत, यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी विशेष वर्ग चालू केले होते. थोडक्यात ‘चांगला’ ब्रिटीश होण्यासाठी सुनक यांना कष्ट घ्यावे लागले ! स्वतःचे आणि स्वतःच्या मुलांचे कथित उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी विदेशात जाण्यास इच्छुक असणार्‍यांनी या सर्व घटनांचा गांभीर्याने अभ्यास करणे आवश्यक आहे.

‘स्वतःच्या आयुष्याला आकार कसा द्यायचा ?’ किंवा ‘माझा उत्कर्ष कशामध्ये आहे ?’, याचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतियाला आहे. त्यामुळे कुणाला ‘अमेरिकेत जाऊन माझे भले होणार’, असे वाटत असेल, तर त्याला कोण रोखणार ? असे असले, तरी ‘पैसा महत्त्वाचा कि आत्मसन्मान ?’, ‘अपमान कि स्वाभिमान ?’, यांची निवड भारतियांनी करायची आहे. ‘भारतात चांगले भविष्य नाही’, असे म्हणण्याचे दिवस कधीच निघून गेले आहेत. सध्या अमेरिकेतील भीषण सामाजिक स्थिती पहाता अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या केवळ भारतियांचेच नव्हे, तर तेथील अमेरिकी लोकांचेही ‘अमेरिकी स्वप्न’ भंग पावले आहे. त्यामुळे भारतियांनी ‘अमेरिकी स्वप्न’ पहाण्याच्या फंदात न पडता ‘भारतीय स्वप्न’ पाहून स्वप्नपूर्तीचा आनंद घेण्यातच त्यांचे हित दडले आहे !

विदेशात जाऊन वर्णद्वेषी आक्रमणे सहन करण्याऐवजी भारतात राहून स्वतःचा उत्कर्ष साधण्यातच भारतियांचे हित आहे !