भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सामाजिक माध्यमावरून आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण
पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सामाजिक माध्यमावरून आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याच्या प्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करण्याविषयी भाजपचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वागळे यांनी जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण होणारे वक्तव्य करून अडवाणी, मोदी यांच्यासह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही अवमान केल्याचा आरोप देवधर यांनी तक्रारीत केला आहे. ‘एका दंगेखोराने दुसर्या दंगेखोराला दिलेला पुरस्कार’ अशा स्वरूपाचे लिखाण वागळे यांनी केले होते.
वागळे यांनी सामाजिक माध्यम ‘एक्स’वर म्हटले आहे की, माझ्याविरुद्ध भाजपचे नेते सुनील देवधर यांनी पुणे पोलिसांत तक्रार केली आहे. देशात अघोषित आणीबाणी आहे. (इतरांचा अवमान करणारे विकृत वक्तव्य करायचे आणि लोकशाही पद्धतीने कुणी त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर थयथयाट करायचा, ही वागळे यांची खोड आहे ! – संपादक) माझ्या वक्तव्याविषयी मी ठाम आहे. मला अटक झाली तरी ‘निर्भय बनो’ आंदोलनाविषयी ९ फेब्रुवारीला सभा होणारच.