ललित कला केंद्राचे नाटक, हिंसाचार आणि आम्ही (हिंदु धर्मीय) !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘ललित कला केंद्र’ नावाचा एक नाट्यप्रशिक्षण विभाग आहे. येथे नाटक शिकवले जाते. नाटक शिकण्यासाठी आलेल्यांची तिथे प्रवेश परीक्षा होते, म्हणजे तिथे निवडून विद्यार्थी घेतले जातात. काही वर्षांपूर्वी ललित केंद्राच्या प्रवेश परीक्षेची एक प्रश्नपत्रिका आमच्या हाती आली होती. त्यात असे काही प्रश्न होते –

  • नाटक चालू होण्यापूर्वी किती घंटा होतात ?
  • सुरेखा पुणेकर या कोण आहेत ?
  • सध्या उपराष्ट्रपती कोण आहे ?
  • सानिया मिर्झा कोणता खेळ खेळते ?
  • अमुक एक रंगमंदिर कुठे आहे ?
  • यातील कोणते नाटक संतोष पवार यांनी दिग्दर्शित केले आहे ?
  • अमुक नाटकाचा लेखक कोण आहे ?
  • नाटकाचे प्रयोग कुठे होतात – रंगमंदिर कि मंगल कार्यालयात ?
  • नाटकापूर्वी काय जाळतात ?

असे आणि या दर्जाचे साधारण २० प्रश्न होते. असे विद्वत्तापूर्ण प्रश्न बघून आम्ही दीपलोच. हे प्रश्न विचारणारे लोक महान असणार, अशी आमची खात्रीच पटली. एवढ्या अवघड प्रश्नांची उत्तरे देणारे कलाकार, ३ वर्षांच्या प्रशिक्षणानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कला समाजाला आमरण पुरवणार, याविषयी आम्हाला शंकाच राहिली नाही. (?)

ललित कला केंद्राने सादर केलेल्या नाटकातील एक प्रसंग

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

१. नाटिकेत काय दाखवले ? आणि पुढे काय घडले ?

अशा या ललित केंद्रामध्ये नुकतेच एक नाटक झाले. त्याचे कथानक आणि सादरीकरण साधारण असे होते. (असे कानावर आले.)

‘एका खेड्यातील लोक रामलीला सादर करणार असतात. त्यात अभिनय करण्यासाठी स्त्रिया मिळत नसतात; म्हणून सीतेची भूमिका पुरुषच करतो. आता कलाकारांनी रंगमंचाचे २ भाग केले होते. एका भागात व्यासपीठ आणि दुसर्‍या भागात ‘ग्रीनरूम’ (व्यासपिठाची मागची बाजू). कशामुळे तरी नाटकातील राम पळून जातो. यावरून ‘नाटकात काही राम नाही’, असा अर्थ लगेच काढू नये. तो राम पळून गेल्यानंतर ‘राम भागा भागा रे, राम भागा भागा’, असे एक गाणे कोरस (समूह) गाऊ लागतो. त्यासह झांजा वगैरेही वाजतात. ‘ग्रीनरूम’मध्ये सीतेची भूमिका करणारा नट बसलेला असतो. तो बिड्या पितो. त्याला ती बिडी रावण किंवा लक्ष्मणाची भूमिका करणारा कलावंत पेटवून देतो. मग सीतेची भूमिका करणारा कलावंत एक अश्लाघ्य शिवी देतो. आईच्या संभोगाविषयी आणखी काही शिव्या देतो म्हणे. आता खेडेगावातील कलाकार म्हणल्यावर शिव्या आणि बिड्या आल्याच, म्हणजे असे ललित कला केंद्रात शिकवले गेले असावे अन् तेथे शिकवलेले योग्यच असणार.’

हे नाटक अनुमाने १५ ते २० मिनिटे झाले आणि काही लोकांना या दृश्यांचा राग आला अन् मग ते व्यक्त (रिॲक्ट) झाले. त्यांच्या व्यक्त होण्यामुळे अजून काही लोक आणखी व्यक्त झाले आणि हे प्रकार वाढत जाऊन तिथे गोंधळ झाला, शिवीगाळ झाली, मारामारी झाली अन् हे नाटक तिथेच बंद पडले. याखेरीज हे नाटक न आवडलेल्या लोकांना काही विद्यार्थ्यांनी मारहाण केली, अशी तक्रार पोलिसांकडे नोंदवली गेली आणि ४-५ विद्यार्थी अन् नाट्यविभागाचे शिक्षक प्रा. प्रवीण भोळे यांना अटक झाली. (पुढे या सर्वांना जामीन मिळाला.)

२. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली झाल्याची ओरड

या सर्व प्रकारावरून नाट्य वर्तुळात पुष्कळ तरंग उमटले. या वर्तुळाची त्रिज्या तशी लहान असल्याने फार काही लोकांपर्यंत ही घटना पोचली नाही; परंतु ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली झाली’, ‘कलेचा आवाज चेपला गेला’, असे वाटणार्‍या कलाकारांनी ही बातमी फैलावली आणि मग लोकशाही पद्धतीप्रमाणे सर्व लोक व्यक्त होऊ लागले. आमच्या मनात काही मुद्दे आणि शंका आल्या, त्या आम्ही काही पुरोभ्रमी लोकांना विचारल्या; पण त्यांनी उत्तर दिले नाही.

३. पुरोभ्रमी लोक या प्रश्नांची उत्तरे देतील का ?

पुरोभ्रमी लोकांना पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले होते –

अ. सदरहू नाटक सादर करण्यापूर्वी ‘सेन्सॉर’ (परिनिरीक्षण मंडळाकडे दाखवणे) केले जाते का ? जर नसेल, तर त्याचे उत्तरदायित्व कोण घेते ?

आ. ‘नाटक आवडले नाही, तर वेगळ्या पद्धतीने निषेध करायला हवा’, असे काही विचारवंतांनी नुकतेच सांगितले. आता ही निषेध करायची वेगळी पद्धत ललित कला केंद्रात शिकवली जाते कि जे.एन्.यू.मध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) ? नेमके काय करायचे प्रेक्षकांनी ? नाटक आवडले नाही, तर पांढरे वस्त्र आणि मेणबत्त्या घेऊन नटराजाच्या पायाशी उभे रहायचे का ?

इ. केवळ हिंदु धर्माविषयीच अभिव्यक्तीस्वातंत्र्य ! : अभिव्यक्तीस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, हे आपल्याला माहिती आहेच. हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदु देवतांची नग्न चित्रे काढली होती. भारतमातेचेही विवाद्य चित्र काढले होते.  हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त हिंदु देवतांविषयी असल्याचे हुसेनसारख्या ललित कलाकारांना माहिती होते. तशी योजनाच आहे कला क्षेत्रात ! अभिव्यक्तीस्वातंत्र्य इतर धर्म आणि धर्मीय यांविषयी नसते. हिंदु देवीदेवता, हिंदूंचे आदर्श यांना कसेही ठोकले, तरी चालते. आता ही सवलत जर का भोळ्याभाबड्या कलाकारांनी वापरली, तर कुणाच्या पोटात दुखायचे काय कारण आहे ? ही त्या कलाकारांची चूक कशी काय म्हणता येईल ?

ई. अश्लील शिवी देणे कोणत्या तत्त्वात बसते ? : ‘ललित केंद्राचे कलाकार हे अतिशय लहान असल्याने त्यांना त्यांनी दिलेल्या अश्लील शिवीचा अर्थ माहिती असणे शक्यच नाही’, असे एक माणूस आम्हाला म्हणाला. आम्हालाही ते पटले. म्हणून आम्ही त्या व्यक्तीला त्या शिवीचा अर्थ सांगितला आणि ती व्यक्ती आता त्या कलाकरांना हा अर्थ जाऊन सांगेल. तोपर्यंत आता सीतेची भूमिका करणार्‍या ‘निरागस’ (इनोसंट) नटाला हा अर्थ माहिती नाही, असे आपण गृहीत धरू; पण त्याने ‘ग्रीनरूम’मध्ये ती शिवी देऊ नये किंवा त्याने बिड्या पिऊ नयेत, हे तुम्ही कोण सांगणार ? बिड्या पिणे किंवा शिवी देणे, ही त्या कलाकारांची वैयक्तिक गोष्ट आहे. कलाकार कोणतेही व्यसन करू शकतात किंवा वाट्टेल त्या शिव्या देऊ शकतात. ‘जे.एन्.यू.’ आणि फिल्म इन्स्टिट्यूट (एफ्.टी.आय.)मधील बरेच विद्यार्थी गांजा, हेरॉईन, गर्द वगैरे घेतात. मग ‘ललित केंद्रवाल्यांनी ते करायचे नाही का ?’, असा प्रश्न विचारू शकतात.

उ. पुरोभ्रामींच्या दृष्टीने निषेधाची पद्धत कोणती ? : सीतेची भूमिका करणार्‍याने शिवीगाळ करणे आणि बिड्या पिणे यांमुळे लोकांच्या मनातील सीतेची प्रतिमा डागाळते. आता देवतांची प्रतिमा डागाळणे किंवा त्यांच्या मूर्ती तोडणे यात फारसा भेद नाही. प्रतिमा आणि मूर्ती यांचे भंजन हे काय हिंदूंना नवीन आहे का ? २२ जानेवारीला अयोध्यानगरीतील श्रीराममंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर ‘एफ्.टी.आय.’च्या विद्यार्थ्यांनी कसे सुवाच्य अक्षरात फलक लावले होते, ‘आम्ही बाबरी पाडल्याचा निषेध करतो.’ तसे फलक ललित केंद्राच्या नाटकाचा निषेध करणार्‍या प्रेक्षकांनी लावायला काय हरकत होती ? ‘आम्ही सीतेची भूमिका लिहिणार्‍या लेखकाचा, दिग्दर्शकाचा आणि कलावंताचा निषेध करतो !’, असा निषेध फलक करायचा; पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांनी वेगळ्या प्रकारे निषेध नोंदवला आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांकडून मार खाल्ला. आता खरे-खोटे आणि योग्य-अयोग्य न्यायालय ठरवेलच.

४. योग्य पद्धत कोणती ? ते पुरोभ्रमी कला अकादमी सांगेल !

ललित केंद्राच्या या प्रकरणानंतर ‘नाटक आणि हिंसा’ या विषयांवर अनेक चर्चा झाल्या. ‘कोणत्याही हिंसेला आमचे समर्थन नाहीच’, हे लक्षात आल्यानंतर काही पुरोभ्रमी विचारवंत सुखावले. हेच विचारवंत गेल्या ८०० वर्षांत इस्लामी आक्रमकांनी केलेल्या हिंसेकडे डोळेझाक करतात, हा विषय वेगळा. ‘हिंसा’ या शब्दावरून आठवले की, हे शाब्दिक आणि शारीरिक हिंसा करून अटकेत गेलेले ललित केंद्राचे विद्यार्थी काही मासांनंतर प्रशिक्षित होऊन बाहेर येणार. मग ते व्यावसायिक नाटक, चित्रपट, मालिका करू लागणार. त्यामुळे लक्षात ठेवा की, उर्वरित आयुष्यात प्रेक्षकांनी त्यांची कोणतीही कलाकृती अडवू नये वा उधळून लावू नये. ती आवडली नाही, तर योग्य पद्धतीने निषेध नोंदवावा. योग्य पद्धत कोणती ? ते पुरोभ्रमी कला अकादमीकडून कळेलच !

लेखक : मिलिंद शिंत्रे

(मिलिंद शिंत्रे यांच्या सामाजिक माध्यमावरून साभार)