अमेरिकेची नौका भारतात येत होती !
मुंबई – येमेनच्या हुती बंडखोरांनी लाल समुद्रात अमेरिका आणि ब्रिटन यांच्या प्रत्येकी एका व्यापारी नौकावर ड्रोनद्वारे आक्रमण केले. यांतील अमेरिकेची नौका भारतात येणार होती. ब्रिटनच्या ‘युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ने दिलेल्या माहितीनुसार ६ फेब्रुवारीच्या रात्री लाल समुद्रात अमेरिकी नौका ‘स्टार नासिया’ यावर, तर त्याच दिवशी सकाळी ‘मॉर्निंग टाईड’ या ब्रिटीश नौकेवर आक्रमण करण्यात आले. यात नौकांची हानी झाली; मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही.
१. हुती बंडखोर लाल समुद्रातील नौकांना सतत लक्ष्य करत आहेत. अमेरिका आणि ब्रिटन याविरोधात कारवाई करत आहेत. ११ जानेवारीपासून अमेरिकेने येमेनमधील हुती बंडखोरांच्या स्थानांना १० वेळा लक्ष्य केले आहे.
२. हुती बंडखोरांच्या आक्रमणांमुळे लाल समुद्रातून जाणार्या २ सहस्र व्यापारी नौकांनी त्यांचा मार्ग पालटला आहे. जगातील सुमारे १५ टक्के वाहतूक या मार्गावरून होते. भारताचा ८० टक्के व्यापार सागरी मार्गाने होतो. त्याच वेळी, देशाला लागणारे ९० टक्के इंधनही सागरी मार्गाने येते. सागरी मार्गाने कुणी आक्रमण केल्यास भारताच्या व्यवसायावर परिणाम होईल. यामुळे पुरवठा साखळी बिघडेल.