देहली विकास प्राधिकरणाने केली कारवाई
नवी देहली – मेहरौली भागात असलेल्या संजय वनमधील अनेक अवैध धार्मिक वास्तू पाडण्यात आल्या आहेत. देहली विकास प्राधिकरणाने (‘डीडीए’ने) येथील अतिक्रमणाच्या विरोधात बुलडोझर चालवून कारवाई चालू केली आहे. संजय वनमधील सुमारे ६०० वर्षे जुनी अखुंदजी मशीद पाडण्यात आल्यानंतर आता बाबा हाजी रोजबिह याची कबर पाडल्याची माहिती समोर आली आहे. हाजी रोजबिह याने भारतात इस्लामचा प्रसार केला होता.
१. ‘डीडीए’च्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, ‘रिज मॅनेजमेंट बोर्ड’ ने उच्च न्यायालयाने रिज जंगल (पर्वतांची रांग) सर्व प्रकारच्या अतिक्रमणांपासून मुक्त असावे, यासाठी एक अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीने संजय वनातील अनेक बेकायदेशीर बांधकामे हटवण्याची सूचना केली होती.
२. ‘राष्ट्रीय हरित लवादा’ला (एन्.जी.टी.ला) सादर केलेल्या अहवालात या अतिक्रमणांमध्ये अनेक बहुमजली इमारती आणि फार्महाऊस यांचा समावेश असल्याचे म्हटले होते.
३. ही अतिक्रमणे रिज जंगलात अतिशय आतपर्यंत पसरली आहेत. न्यायालयाने अनेक वेळा आदेश देऊनही संबंधित अधिकार्यांनी या बेकायदेशीर वास्तू हटवण्यासाठी काहीही केले नाही. (या अतिक्रमणे हटवण्याविषयीच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्या अधिकार्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, तरच अतिक्रमणांवर आळा बसेल ! – संपादक)
४. प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक राणा सफवी यांनी ‘डीडीए’च्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणले की, संजय वनमधील धार्मिक वास्तूंना ‘अतिक्रमण’ म्हणणे चुकीचे आहे.