इस्रायल-हमास युद्धात येमेनच्या ‘हुती’ या आतंकवादी संघटनेने उडी घेतली आहे. लाल समुद्रातून (रेड सी) इस्रायलकडे जाणार्या सर्व जहाजांवर आक्रमण करण्याची चेतावणी या संघटनेने दिली आहे. हुतींचे लाल समुद्र किनार्याच्या मोठ्या भागावर नियंत्रण आहे. तिथूनच ते जहाजांवर आक्रमणे करतात. हुती आतंकवादी लेबनॉनच्या सशस्त्र शिया समूह ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेकडून प्रेरणा घेतात. त्यामुळे ‘हुती’ नेमके कोण आहेत ? ते या लेखाद्वारे देत आहोत.
१. हुती आतंकवादी संघटनेची माहिती
हुती ही येमेनमधील आतंकवादी संघटना असून त्यांना इराणचा पाठिंबा आहे. हुती हा येमेनच्या अल्पसंख्यांक शिया ‘झैदी’ समुदायाचा एक शस्त्रधारी गट आहे. या संघटनेचे नाव संस्थापक हुसैन अल हुती यांच्या नावावरून पडले. ते स्वतःला ‘अन्सार अल्लाह, म्हणजे ईश्वराचे सोबती’, असेही म्हणतात. १९९० च्या दशकात येमेनचे तत्कालीन राष्ट्रपती अली अब्दुल्लाह सालेह यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी या गटाची स्थापना केली होती. हुती बंडखोरांनी गेल्या २ मासांत लाल समुद्रामध्ये अनेक व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आक्रमणानंतर इस्रायलने गाझा पट्टीवर प्रत्युत्तर म्हणून आक्रमणे चालू केली. तेव्हा हुती आतंकवाद्यांनीही इस्रायलकडे जाणार्या जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांच्याद्वारे आक्रमण करण्यास प्रारंभ केला.
संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार हुती आतंकवादी संघटनेत लहान मुलांचीही भरती करण्यात आली होती. त्यांच्यापैकी १ सहस्र ५०० जणांचा वर्ष २०२० मध्ये झालेल्या युद्धात मृत्यू झाला आणि त्याच्या पुढच्या वर्षी आणखी शेकडो मुले मारली गेली.
२. हुतीला इराणकडून पाठिंबा आणि हुतीने केलेली आक्रमणे
अमेरिकेतील ‘रिसर्च इन्स्टिट्यूट कॉम्बॅटिंग टेररिझम सेंटर’च्या माहितीनुसार वर्ष २०१४ पासून ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेद्वारेच हुतींना मोठ्या प्रमाणावर लष्करी साहाय्य आणि प्रशिक्षण दिले जात आहे. हुतीचा इराण हा त्यांचा सहकारी असल्याचा दावाही केला जातो; कारण दोघांचा शत्रू एकच म्हणजे सौदी अरेबिया आहे. इराण हुती आतंकवाद्यांना शस्त्रे देत असल्याची शंका व्यक्त केली जाते.
अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या मते इराणने हुती आतंकवाद्यांना आंतरखंडीय क्षेपणास्त्रे (बॅलेस्टिक मिसाईल) पुरवली होती. त्याचा वापर वर्ष २०१७ मध्ये सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर आक्रमणासाठी करण्यात आला होता. ती क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आली होती. हुती आतंकवाद्यांनी सौदी अरेबियावर कमी पल्ल्याची सहस्रो क्षेपणास्त्रे डागली आहेत, तसेच त्यांनी संयुक्त अमिरातीलाही लक्ष्य केले आहे. अशा प्रकारच्या शस्त्रांचा पुरवठा, म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी लावलेल्या शस्त्रांवरील निर्बंधांचे उल्लंघन असून इराणने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
‘युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीस’चे हिशाम अल-ओमेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार या आक्रमणांमुळे त्यांना सौदी अरेबियाशी चालू असलेल्या शांतता चर्चेत त्यांची बाजू भक्कम करण्यासाठी त्यांना साहाय्य झाले. ते लाल समुद्रातील अरुंद सागरी मार्ग बंद करू शकतात, हे दाखवून त्यांनी सौदी अरेबियावर सवलती देण्यासाठी दबाव वाढवला आहे.
(साभार : विविध संकेतस्थळे)