अभिव्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर अभिव्यक्तीचा स्वैराचार ?

हिंदूंनी संघटितपणे लढा दिल्यास देशात परकियांनी बळकावलेली मंदिरे पुन्हा मिळवण्यास वेळ लागणार नाही !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने २ फेब्रुवारी २०२४ या दिवशी रात्री ‘जब वुई मेट’ या नाटकाच्या सादरीकरणात ‘रामलीला’, ‘रामायण’ यांतील काही संदर्भ, रामायणातील पात्रे, त्यांची नावे आणि वेशभूषा हे वापरून नाटकाच्या व्यासपिठाच्या मागे ते कलाकार कसे वागतात, याचे चित्रीकरण दाखवले. त्या वेळी असलेल्या कलाकारांनी आक्षेपार्ह वर्तन आणि अश्लील भाषा वापरली. त्यावर ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ने (‘अभाविप’ने) आक्षेप घेतला.

या आक्षेपावर ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’वर घाला आहे’, असे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर एक सुजाण नागरिक, भारतीय संस्कृतीची समर्थक, अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाची अधिसभा सदस्य या नात्याने काही प्रश्न उपस्थित करता येतील. या माध्यमातून पुढच्या पिढ्यांना कोणती आणि काय दिशा द्यायची ? आणि कशाचे समर्थन करावयाचे ? याचा समाजात सर्वंकष विचार होण्यासाठी काही सूत्रांचा ऊहापोह या लेखात केला आहे.

१. अभिव्यक्तीस्वातंत्र्यात स्वैराचार अपेक्षित नाही !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या व्याख्येत मत मुक्तपणे मांडण्याचा अधिकार दिला असला, तरी या मुक्तपणाला काही बंधनेही समाजव्यवस्था म्हणून घातली आहेत. या बंधनांत प्रामुख्याने जाहीर टीका, मानहानी, अश्लीलता, पोर्नोग्राफी, देशद्रोह, चिथावणी, द्वेषयुक्त भाषण, गोपनीय लिखाण, प्रतिष्ठेस धक्का आदी गोष्टींचा समावेश आहे; म्हणून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यात स्वैराचार अपेक्षित नाही’, हे उघड आहे. ललित कला केंद्राच्या वतीने जी नाटके सादर केली गेली, त्यात स्वैराचार दिसतो आहे ना कि स्वातंत्र्य ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ ललित कला केंद्र

२. नाटकावर आक्षेप घेण्यामागची कारणे आणि उपस्थित होणारे प्रश्न

‘जब वुई मेट’ या नाटकाच्या काही भागांतील चित्रफितीत सीतामातेचा वेष परिधान केलेल्या स्त्रीच्या तोंडी असभ्य भाषा आणि तिचे असभ्य वर्तन दाखवले आहे. अन्य पात्रांच्या तोंडी असलेले संवादही उपहास आणि विनोद दर्शवणारे होते. त्यात ‘राम भागा, राम भागा’ अशा आशयाचे गीतही होते. आता प्रत्यक्षात नाटकात राम पळून जात नसून ‘रामलीले’त रामाची भूमिका करणारा मुलगा वैतागून पळून जातो, असा प्रसंग आहे; पण यावर आक्षेप घेण्यामागे काही कारणे आहेत.

अ. केंद्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा किंवा अंतर्गत सरावाला वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निमंत्रण कशासाठी ?

आ. प्रात्यक्षिक परीक्षेला वा सरावाला येताना विद्यार्थी बॅट, काठ्यांसह कसे काय येतात ?

इ. विद्यापिठासारख्या उच्च शिक्षण संस्थेच्या प्रतिष्ठेचा विचार करता अश्लील भाषा, असभ्य वर्तन आणि देवीदेवतांच्या वेशभूषेत चुकीचे वर्तन दाखवणे हे कोणत्या ‘ॲकेडमिक्स’मध्ये बसते ?

ई. ‘रिॲलिटी शो’च्या नावाखाली व्यासपिठाच्या मागे कलाकार काय करत आहे ? हे दाखवतांना मर्यादा पाळणार कि कुणी अमली पदार्थ घेत आहे ? अन्य अश्लील वर्तन करत असतील, तर तेही दाखवणार का ?

३. जाणीवपूर्वक आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यामागे समाजविघातक शक्तींचा प्रभाव

यात मुद्दे असे आहेत की, आपण सादर करत असलेली संहिता ही प्रश्न उपस्थित करणारी आणि आक्षेपार्ह आहे, याची कल्पना संबंधितांना होती. म्हणूनच ते लाठ्या, काठ्या, क्रिकेट बॅट्स आदीच्या सिद्धतेने आले होते. हिंदु धर्मियांमध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान या व्यक्तीरेखा आदर्श म्हणून डोळ्यांसमोर असतात. त्यांच्या वेशभूषेत जाणीवपूर्वक आक्षेपार्ह गोष्टी दाखवून त्यांचा अवमान करण्याचे शिक्षण हे विद्यापिठात नाही, तर बाहेरच्या समाजविघातक शक्तींच्या प्रभावाखाली घडवून आणले जाते. अगदी कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ‘सेन्सॉर बोर्डा’च्या (चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या) निकषांतून त्याला पार व्हावे लागते. मग सीतामातेची व्यक्तीरेखा साकारणार्‍या विद्यार्थ्याच्या तोंडी अश्लील शिव्या, असभ्य वर्तन, सिगारेट ओढतांना (स्मोकिंग) दाखवून इतकीही आचारसंहिता पाळू नये, म्हणजे कमाल आहे ? हे सर्व विभागप्रमुखांच्या संमतीनेच झाल्याचे उघड आहे. त्यामुळे माननीय कुलगुरु नियमाप्रमाणे कारवाई करतीलच; पण एक समाज म्हणून पुढील गोष्टींचा विचार करू शकतो का ?

४. …अशी मुलगी आधुनिक आणि मुक्त आहे, ही संकल्पनाच चुकीची !

आपण आपली मुले आणि तरुण यांच्यासमोर चांगले आदर्श ठेवतो. का ? तर त्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःचे भविष्य घडवावे. मग आपण एका दारुड्या, गांजा ओढणार्‍या व्यक्तीचे उदात्तीकरण करू कि एका सज्जन व्यक्तीरेखेचे ? मुळात सीतामाता ही भारतीय स्त्री जीवनाचा आदर्श आहे. सीतामातेचा संयम, सहनशीलता, तिची मर्यादा हे आदर्श आहेत. भारतीय संस्कृतीत द्रौपदी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांसारख्या स्त्रिया या आधुनिकता, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या आदर्श आहेत. एखादी मुलगी अश्लील भाषा वापरतांना, असभ्य वर्तन करतांना, घाणेरड्या शिव्या देतांना, सिगारेट फुंकताना दाखवणे, म्हणजे ती मुलगी आधुनिक आणि मुक्त आहे, ही संकल्पनाच चुकीची आहे.

५. रामायण, महाभारतातील व्यक्तीरेखा आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचे महत्त्व

आधुनिक काळात बी.आर्. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी पडद्याच्या मागे घडलेला कलाकारावरील हा किस्सा प्रेरणादायी आहे. महाभारत मालिकेत अर्जुनाची भूमिका फिरोज खान या कलाकाराने साकारली. त्यांनीच सांगितलेला किस्सा. ‘महाभारत’मध्ये काम करायला प्रारंभ केल्यावर या व्यक्तीरेखेभोवतीचे वलय आणि पवित्रता लक्षात आली. नंतर त्यांनी आपणहून सिगारेट सोडली, मद्यपान बंद केले, मांसाहारही सोडून दिला. ‘आपण शाकाहारी बनलो’, असे फिरोज खान यांनी सांगितले. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेला एवढी वर्षे झाली, तरी अजूनही श्रीरामाची व्यक्तीरेखा साकारणार्‍या अरुण गोविल यांना पहाताच लोक त्यांच्या पाया पडतात. यातून त्या कलाकारांना रामायण, महाभारतातील व्यक्तीरेखा आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचे महत्त्व अनुभवास येते अन् ते पटतेही.

६. विद्यार्थ्यांना चुकीची दिशा दाखवणार्‍यांचा एकमुखाने निषेध करावा !

असे असतांना मग ललित कला केंद्राच्या लोकांना अशा गोष्टी का दाखवाव्याशा वाटल्या नाही ? ज्या गोष्टी  आक्षेपार्ह  आहेत, त्या तशाच का दाखवाव्याशा वाटल्या ? त्यामुळे ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख आणि संबंधित विद्यार्थी यांच्या हेतूंवर शंका उपस्थित होते. आपल्याच युवकांना भविष्यात चांगली दिशा देणारे, त्यांना चांगले मार्गदर्शन  करणारे प्राध्यापक विद्यापिठात अपेक्षित आहेत ना कि समाजात दुही पसरवण्यास प्रोत्साहन देणारे, समाजाच्या  आदर्शांची  खिल्ली उडवणारे ?

त्यामुळे सगळ्यांनीच अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारे  विद्यार्थ्याना चुकीची दिशा दाखवणार्‍यांचा निषेधच केला पाहिजे.

एक समाज म्हणून आपण जेव्हा समग्रपणे विचार करतो, तेव्हा काही नियम, मर्यादा  अपेक्षित असतात. त्या नियमांचे उल्लंघन हे समाजाच्या  मर्यादाचे उल्लंघन असते, हे लक्षात ठेवावे. ललित कला केंद्राचे जे नाटक दाखवले, यातून अश्लीलता,  मर्यादा , हिंदूंच्या भावनांना धक्का पोचवणे, विद्यापिठाच्या प्रतिष्ठेस धक्का पोचवणे, अशा प्रकारच्या गोष्टी जाणीव पूर्वक  घडवलेल्या आहेत. याचाच  अर्थ  हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नसून ‘अभिव्यक्तीचा स्वैराचार आहे’, हे लक्षात घ्यावे. अशा मानसिकतांचा एकमुखाने निषेध करावा !

लेखिका : डॉ.  अपर्णा  लळिंगकर, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. (४.२.२०२४)

(डॉ. अपर्णा  लळिंगकर यांच्या फेसबुकवरून साभार)