भारताला तोडण्याच्या गोष्टी कुणी करू नयेत ! – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांच्या दक्षिण भारताला स्वतंत्र देश घोषित करण्याच्या वक्तव्याचे प्रकरण 

डावीकडून गृहमंत्री परमेश्‍वर आणि डी.के. सुरेश

बेंगळुरू – आपला भारत हा भव्य भारत आहे. कुणीही तो तोडण्याच्या गोष्टी करू नयेत. हा देश एकत्र ठेवण्यासाठी सहस्रो लोकांनी प्राणार्पण केले आहे. शेकडो वर्षे लढा दिला आहे. अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांनी देश स्वतंत्र आणि अखंडित रहावा म्हणून लढा दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने देशात एकोपा रहाण्यासाठी बोलले पाहिजे. ते सोडून विभाजनाची भाषा बोलणे योग्य नाही. खासदार डी.के. सुरेश कोणत्या अर्थाने असे म्हणाले, ते समजत नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे गृहमंत्री तथा काँग्रेसचे नेते जी. परमेश्‍वर यांनी केले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांनी दक्षिण भारताला भारतापासून वेगळे करणारे देशद्रोही वक्तव्य केले होते. त्यावर परमेश्‍वर यांनी वरील विधान केले.

परमेश्‍वर पुढे म्हणाले की, पाकिस्तानचे विभाजन झाले, तेव्हा आपण कुणी जन्माला आलो नव्हतो; परंतु त्याचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. आपला देश ‘एक राष्ट्र, एक देश’ म्हणूनच राहिला पाहिजे.

संपादकीय भूमिका 

डी.के. सुरेश यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याचे धाडस परमेश्‍वर यांनी दाखवले, तरच त्यांच्या बोलण्याला अर्थ राहील. अन्यथा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ अथवा ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’, असाच हा प्रकार असल्याचे म्हणता येईल !