पारंपरिक भारतीय शिक्षणपद्धतीचे महत्त्व !

श्री. अनिल दत्तात्रेय साखरे

१. प्राचीन भारतीय शिक्षणाचा उद्देश

शिक्षणाकडे बघण्याचा आमच्या प्राचीन ऋषिमुनींचा दृष्टीकोन विद्यार्थ्यांना केवळ पोटार्थी शिक्षण नव्हे, तर ते व्यक्तीला जीवनात उपयोगी पडले पाहिजे. ‘शिक्षणामुळे भौतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनामध्ये व्यक्ती, उत्कर्ष करत पुढे गेली पाहिजे’, असा होता. त्यामुळे पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्येचे पालन करत १४ विद्या आणि ६४ कला यांपैकी काहींचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असे.

२. पाठांतराने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढे !

घोकंपट्टी किंवा पाठांतर हा एक प्रकार आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये होता. यामध्ये विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या तर्‍हेची सुभाषिते, वेद-उपनिषदे यांतील श्लोक, स्तोत्रे किंवा पाढे पाठ करून घेतले जात. आता विद्यार्थी ज्यांना ‘टेबल’ म्हणतात, असे ‘बे एके बे’पासून ‘पावकी निमकी’पर्यंतचे पाढे, पुन्हा पुन्हा घोकंपट्टी करून म्हणून घेतले जात असत. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती चांगली वाढत असे. बुद्धीचा, मेधाशक्तीचा विकास चांगला होत असे आणि व्यावहारिक जीवनामध्ये असे विद्यार्थी आघाडीवर रहात.

३. उठाबशा काढण्याची शिक्षा आरोग्यदृष्ट्याही लाभदायी

पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना शिक्षा देतांना कानाला हात धरून उठाबशा काढायला लावत. आताच्या नवीन विकसित झालेल्या  विज्ञानाने असे दाखवून दिले आहे की, आपल्या मेंदूच्या बर्‍याचशा नसा आणि काही संवेदनशील बिंदू कानाच्या ठिकाणी आहेत. ते दाबल्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यासाठी चांगल्या प्रकारे साहाय्य होते.

४. भारतीय वंशांचे लोक पारंपरिक शिक्षणाने विश्वभरात उच्चपदस्थ स्थानावर !

आज जे काही मोठमोठे आय.ए.एस्., आय.पी.एस्. किंवा देश-विदेशातील मोठमोठ्या आस्थापनांमध्ये उच्च अधिकारी, संचालक मंडळामध्ये काम करणारे विविध आस्थापनांचे ‘सीईओ’ (मुख्य कार्यकारी अधिकारी), हे सर्व भारतीय वंशाचे आहेत. या पारंपरिक शिक्षणाच्या माध्यमातूनच शिक्षण घेऊन हे सर्व उच्च विद्याविभूषित मंडळी पुढे गेली आहेत.

५. ‘डिजिटल बोर्ड’मुळे शिक्षकांनी संवाद साधत शिकवण्याची पद्धत बंद पडल्याने कृत्रिमपणे शिक्षण घेतलेले विद्यार्थी बाहेर पडणे

परक्यांच्या नादाला लागून आमच्या शाळा, महाविद्यालये यांमध्ये  ‘डिजिटल बोर्ड’ (आधुनिक तंत्रज्ञान असलेली साधने) सिद्ध केले जात आहेत. मुले घरच्या घरीही त्याद्वारे शिक्षण घेत आहेत. मुलांच्या हातातील वही-पेन्सिल जाऊन ‘टॅबलेट’, ‘लॅपटॉप’ (भम्रणसंगणक) आणि भ्रमणभाष आले. त्यामुळे मुलांची बुद्धीमत्ता आणि त्यांची मूलभूत क्षमता, प्रगल्भता विकसित होण्याच्या दृष्टीने पुष्कळच मोठी हानी होत आहे.

हसत-खेळत, मस्ती करत वर्गात बसलेले विद्यार्थी त्यांच्यासमोरील मंचकावर फळ्यासमोर हातामध्ये खडू घेऊन, मानवी भावभावनांसह त्यांचा विषय विद्यार्थ्यांशी संवाद करत शिकवणारे शिक्षक हा प्रकारच आधुनिक शिक्षणाने बाद केला आणि शिक्षकाच्या जागी एक मोठा पांढरा शुभ्र ‘डिजिटल बोर्ड’ विद्यार्थ्यांसमोर आला. शिक्षण देतांना हा ‘डिजिटल बोर्ड’ शिक्षकांप्रमाणे विषयानुरूप भावभावना व्यक्त करत नाही कि विद्यार्थ्यांनाही त्यांच्या शंका विचारण्याची सोय नाही. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांना प्रत्यक्ष शंका विचारून विषय समजून घेत असत. या पद्धतीने या ‘डिजिटल बोर्डा’शी संवाद साधता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची रुक्षता, शिष्टता आणि समूह जीवनाविषयी उदासीनता निर्माण होत आहे. कारखान्यामधून जसे रूप, रस, गंध विहीन असे उत्पादन बाहेर पडते, त्याप्रमाणे शाळा-महाविद्यालयातून हातामध्ये पदवी घेतलेले, एक चालते फिरते ‘उत्पादन’ कृत्रिमपणे बाहेर पडत आहे.

६. स्वीडनने डिजिटल शिक्षणपद्धतीचे धोके ओळखून चालू केली पारंपरिक शिक्षणपद्धत !

खरे तर यावर शिक्षण क्षेत्रातील मंडळींनी शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करून योग्य ते पालट करायला हवेत; पण ‘यद ‘साहेब’ उक्तम्, तत् प्रमाणम्’ म्हणजे ‘जे जे पश्चिमेचे (साहेबाचे) ते ते सर्व चांगले (प्रमाण)’ ही आमच्या लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे तरुण पिढीची, विद्यार्थ्यांची पुष्कळ मोठी हानी होत आहे. त्या दृष्टीने स्वीडनमधील शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी या ‘डिजिटल’ शिक्षणपद्धतीचा सखोल अभ्यास करून, त्यातील धोके ओळखले. त्यामुळे मुलांच्या एकंदरीतच शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक वाढीसाठी स्वीडनमध्ये आता ‘डिजिटल शिक्षणा’कडून अगदी शिशूवर्गापासूनच विद्यार्थ्यांना हातामध्ये वही-पेन्सिल देऊन पारंपरिक शिक्षण देण्याचे योजले आहे; ज्यातून विद्यार्थ्यांच्या मूलभूत क्षमताचा विकास होणे अपेक्षित आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून भारतियांनी स्वतःची पारंपरिक शिक्षणपद्धत जपायला हवी.

– श्री. अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे पूर्व.