ललित केंद्रातील केंद्रप्रमुखासह ६ जणांना जामीन संमत !

पुणे विद्यापिठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे प्रकरण !

पुणे – येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात केलेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखावण्यात आल्या होत्या. सरकारी अधिवक्त्यांनी केलेली पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळत ६ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकरणी आता विद्यापिठाच्या ‘ललित कला केंद्रप्रमुखा’सह अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.के. दुगाावकर यांनी जामीन संमत केला आहे. केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले अशी जामीन संमत झालेल्यांची नावे आहेत.


विद्यापिठातील विभागप्रमुख आणि दोषी विद्यार्थी यांवर कारवाई करा ! – प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना शहरप्रमुख

प्रभु श्रीराम आणि सीतामाई यांची अपकीर्ती करणार्‍या ‘ललित कला केंद्रा’चे विभागप्रमुख प्रवीण भोळे, आक्षेपार्ह नाटक लिहिणारे आणि सादर करणारे विद्यार्थी अन् ललित कला केंद्राचे मारहाण करणारे विद्यार्थी यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. त्याचसमवेत सर्व दोषींना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे.


‘नाट्या’विषयी पुणे विद्यापिठाची दिलगिरी; सत्यशोधन समिती गठित !

विद्यार्थी जे सादर करत होते, तो त्या विभागाच्या परीक्षेचा प्रायोगिक भाग होता आणि हा प्रकार प्रहसनाचा असल्याचे विद्यापिठाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच झालेल्या प्रकाराविषयी त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. या प्रकरणी विद्यापिठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात विहित नियमानुसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्टीकरण विद्यापिठाने निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.