अयोध्यानगरीत श्रीरामजन्मभूमीमध्ये प्रभु श्रीरामाच्या मंदिरासह अन्यही काही मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयीसुविधांचे कामही युद्धपातळीवर चालू आहे. याविषयी भाविकांमध्ये कुतूहल आहे आणि उत्सुकताही आहे. ‘अलकेमि स्टोन्स मॅट्रिक्स प्रा. लि.’ (Alchemy Stones Matrix Pvt. Ltd.) या आस्थापनाद्वारे श्रीरामजन्मभूमी परिसरातील मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि विविध इमारतींचे बांधकाम होत आहे. गुजरात येथे उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ या जगातील सर्वांत मोठ्या पुतळ्याची निर्मिती याच आस्थापनाकडून करण्यात आली आहे. या आस्थापनाचे प्रकल्प अधिकारी (प्रोजेक्ट मॅनेजर) श्री. आदित्य चौधरी यांनी श्रीरामजन्मभूमी परिसरातील बांधकामाविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ला विशेष मुलाखत दिली. ही माहिती या लेखाद्वारे जाणून घेऊया !
१. श्रीरामजन्मभूमी परिसरातील मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि विकासकामे !
श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी प्रभु श्रीरामाच्या मुख्य मंदिरासह अन्य ८ मंदिरे आहेत. येत्या काळात या सर्वच मंदिरांचा जीर्णाेद्धार केला जाणार आहे. या व्यतिरिक्त मुख्य मंदिराच्या दक्षिणेला असलेल्या कुबेर टिळाव नावाच्या छोट्या टेकडीवरील शिवाच्या मंदिराचाही जीर्णाेद्धार केला जाणार आहे. या मंदिरामध्ये ५०० वर्षापूर्वीचे शिवलिंग आहे. ते न हालवता मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला आहे. याच टेकडीवर जटायूची मूर्ती उभारण्यात आली असून या ठिकाणी जटायूची कथाही देण्यात आली आहे.
२. सर्व मंदिरांच्या निर्मितीसाठी ‘ग्रॅनाईट’ दगडाचा उपयोग !
श्रीरामाचे मुख्य मंदिर आणि आजूबाजूची सर्व मंदिरे बांधण्यासाठी ‘ग्रॅनाईट’ दगडाचा उपयोग करण्यात आला आहे. राजस्थानमधील बन्सी पहाडपूर येथून हे दगड आणण्यात आलेले आहेत. दर्शनार्थींसाठी सुविधा केंद्र बांधण्यासाठीही याच दगडाचा उपयोग करण्यात आला आहे. या दगडांचे वैशिष्ट्य, म्हणजे या दगडांना सहस्रावधी वर्षे काहीही होत नाही. हे दगड पूर्णपणे नैसर्गिक आहेत. या दगडांवर ऊन, पाऊस आणि थंडी यांचा काहीही परिणाम होत नाही. या दगडांवर कोणत्याही तापमानाचा प्रभाव पडत नाही, तसेच त्यांचा रंगही पालटत नाही. मुख्य मंदिराचे बांधकाम वगळता अन्य मंदिरांच्या बांधकामांसाठी आतापर्यंत १० मोठे ट्रक अशा प्रकारचे दगड आणण्यात आले आहेत. अद्याप काम चालू आहे.
३. मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी विविध सुविधा !
श्रीरामजन्मभूमीच्या परिसरात मुख्य मंदिरासह भाविकांच्या सोयीसुविधांसाठी ८ इमारती असतील. यांतील काही इमारतींची निर्मिती झाली असून काहींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यामध्ये दर्शनार्थी सुविधा केंद्र, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, अग्नीशमन यंत्रणा, प्रतीक्षालय, प्रसादवाटप केंद्र आदी इमारतींचा समावेश आहे. मंदिराच्या ‘फेज १’चे काम वर्ष २०२४ अखेरपर्यंत पूर्ण होईल.
४. ५ सहस्र ‘लॉकर’ची व्यवस्था आणि प्रतीक्षालय
दर्शनार्थींसाठी सुविधा केंद्रामध्ये भाविकांना भ्रमणभाष, पैशांचे पाकिट, महिलांच्या पर्स यांसह दर्शनार्थींसमवेत असलेले साहित्य ठेवण्यासाठी ५ सहस्र ‘लॉकर’ सिद्ध करण्यात येत आहेत. भाविकांसाठी ३ प्रतीक्षालयांचीही (वेटिंग रूम) निर्मिती करण्यात येत आहे. दर्शन घेऊन आलेले भाविक येथे विश्रांती घेऊ शकतील. एकाच वेळी अधिकाधिक २ सहस्र भाविक थांबू शकतील, अशी या प्रतीक्षालयांची क्षमता असेल. दर्शन घेऊन येईपर्यंत भाविक त्यांचे साहित्य या इमारतीमध्ये ठेवू शकतात आणि दर्शन घेऊन आल्यानंतर विश्रांतीही घेऊ शकतात. या ठिकाणी भाविकांसाठी छोट्या रुग्णालयाची सुविधाही ठेवण्यात आली आहे.
५. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी स्वतंत्र इमारत !
मंदिर परिसरातील झाडांसाठी जे पाणी वापरण्यात येणार आहे. त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया झाल्यानंतरच ते झाडांसाठी वापरले जाणार आहे. ही इमारत अद्याप बांधून झालेली नाही. येत्या ३-४ मासांत या इमारतीचे काम पूर्ण होईल.
६. प्रत्येक दर्शनार्थी आणि साहित्य यांचे ‘स्कॅनिंग’ (यंत्राद्वारे पडताळणी) होणार !
इमारतीमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक आणि त्यांचे साहित्य यांचे ‘स्कॅनिंग’ केले जात आहे. स्कॅनिंग करण्यासाठी ८ ते ९ ‘काऊंटर’ असतील. त्यामध्ये १८ मशीन्स असतील. मंदिरात येणारे प्रत्येक भाविक आणि त्यांचे साहित्य यांचे स्कॅनिंग हे यंत्रांद्वारे केले जाईल. या ठिकाणी प्रथम भाविकांचे स्कॅनिंग झाल्यानंतर पुढे भ्रमणभाष, कॅमेरा यांचीही पडताळणी करण्यासाठी पुन्हा वेगळ्या प्रकारचे ‘स्कॅनिंग’ केले जाईल.
७. श्रीरामजन्मभूमी ‘कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) होणार !
वाराणसी येथे भगवान काशीविश्वनाथ मंदिराच्या परिसरात भव्य सुसज्ज मार्ग करण्यात आला आहे. त्याप्रमाणे अयोध्या येथेही भव्य ‘कॉरिडोर’ची निर्मिती केली जाणार आहे. मंदिराच्या मध्यभागी बगीचा असेल. या बगीच्यात विविध लक्षवेधी फुलझाडे असतील. या बगीच्याची निर्मिती करणार्या आस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी अयोध्या येथे आले असून लवकर या कामाला प्रारंभ होईल.
८. मंदिराच्या परिसरात अन्यही कार्यालये !
मंदिराच्या उत्तरेला श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कार्यालय, तर दक्षिणेकडे मंदिरातील पुजार्यांसाठी इमारत आहे. या दोन्ही ठिकाणी त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या मागील बाजूस स्वच्छतागृहे आणि शौचालये यांची निर्मिती करण्यात येत आहे. बालकांच्या स्तनपानासाठी २ स्वतंत्र खोल्या आहेत. अग्नीशमन यंत्रणेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात पंतप्रधानांसाठी स्वतंत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. यासमवेत अतीमहनीय व्यक्तींसाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’. (३१.१.२०२४)