शहरातील मेट्रोच्या कामांमुळे होणार्‍या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार !

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांची माहिती

पुणे – शहरात चालू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती, तसेच शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. येथील शिवसेना भवन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्याचा वाहतूक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.

मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्या ठिकाणी असलेला राडारोडा, धूळ त्वरित हटवावी, मेट्रोने नेमलेल्या ‘वॉर्डन’ची (वॉर्डन म्हणजे विशिष्ट जागा अथवा वस्तूसाठी नेमलेली व्यक्ती, जी तेथील नियम, कायदे यांचे पालन केले जात आहे ना हे पहाते.) संख्या वाढवावी, स्थानिक प्रशासनाने वाहतूककोंडी होणार्‍या ठिकाणांची माहिती घेऊन त्यांचा समावेश वाहतूककोंडी होणार्‍या भागांच्या सूचीत करावा, आदी मागण्या करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

९ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असून ८ आणि ९ फेब्रुवारी या दिवशी शहरात रुग्णसेवा, ज्येष्ठांचा सत्कार इत्यादी विविध उपक्रम घेतले जाणार आहेत, असेही डॉ. गोर्‍हे यांनी सांगितले.