प्रबोधन लेखमालिका : संध्याकर्म

‘आपल्या वैदिक धर्मात फार पूर्वीपासून चातुर्वर्ण्य हा भाग होता. ‘होता’ असे आज म्हणावे लागते; कारण आज चातुर्वर्ण्य जवळजवळ लुप्त झाला आहे. आज काही धर्मावर श्रद्धा असणारी ब्राह्मण मंडळी धर्म पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांची प्रशंसाच करायला हवी. या मंडळींना घराबाहेर पडल्यावर ब्राह्मणाचे आचार पाळणे फार कठीण असते. तो आचार पाळण्यासारखी परिस्थिती बाहेर मुळीच उपलब्ध नाही, तरीही ही आग्रही मंडळी स्वतःला त्रास (शारीरिक, मानसिक) करून घेऊन आचार पाळण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते १०० टक्के यशस्वी होतीलच, असे नाही. अशा व्यक्तींना साहाय्य करण्यापेक्षा त्यांच्या कर्मात कुठे छिद्र दिसते का ? हे शोधण्यात धन्यता मानणारी मंडळी पुष्कळ आहेत. ‘आपण धर्माचरण करू शकत नाही; पण जो धर्माचरण करण्याचा प्रयत्न करतो त्याला साहाय्य करावे’, ही वृत्तीसुद्धा आज लोप पावली आहे.

‘मुंज’ हा एक फार महत्त्वाचा संस्कार त्रैवर्णिकांसाठी (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) आहे. त्यामुळे ‘संध्या’ हा आचार त्यांना सुद्धा लागू आहे. आज मुंज करण्याची हौस आहे. त्याचे बाजारीकरण झाले आहे; पण त्यानंतर त्याचे आचार पाळण्याचे महत्त्व कुणालाच कळत नाही. मुंजीच्या दुसर्‍या दिवशीच जानवे खुंटीला टांगलेले दिसते. खुद्द ब्राह्मणांमध्येच आज हा आचार जवळजवळ लुप्त झाला आहे. संध्येचे महत्त्व फार मोठे आहे आणि संध्या केल्यास ब्राह्मणाला पुण्य मिळत नाही; पण न केल्यास पाप लागते. संध्या हा फार शास्त्रीय; परंतु सोपा विषय आहे. ब्राह्मणाच्या सर्व कर्मांचा पाया संध्या हा आहे. देवाची पूजा सुद्धा संध्या केल्याविना पूर्ण (आरंभच) होत नाही. आज आपण संध्येचा विषय ब्राह्मणांपुरताच पाहू.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. संध्या म्हणजे काय ? आणि तिचा उद्देश

श्री. श्रीनिवास गोटे

संध्या ही सूर्याची शास्त्रीय उपासना असून त्यामुळे ब्राह्मतेज वाढते. व्यवहारात आणि अध्यात्मात त्याचा नकळत लाभ संध्या करणार्‍याला मिळतो. ‘आपण कोणत्या तरी देवाचा जप करतो, काही ग्रंथ वाचतो, स्तोत्र म्हणतो मग संध्येचाच आग्रह का ?’, असा प्रश्न उभा रहातो. त्याला उत्तर असे की, ‘शरिराची (आध्यात्मिक) शुद्धी करून स्वतःचे शरीर अनुष्ठान किंवा तप यासाठी योग्य व्हावे. त्याचा स्वतःला आणि सर्व समाजाला लाभ मिळावा’, हा उद्देश आहे.संध्येत सूर्य आणि गायत्री यांची उपासना आहे. दोन्ही अत्यंत तेजस्वी स्वरूपे आहेत. गायत्री मंत्र लाभ देतो; पण त्यासाठी शरीर धारणाही सिद्ध करावी लागते. ते करण्याचा सारा विधी संध्येद्वारे होत असतो. इतर जप, स्तोत्र, धार्मिक ग्रंथांचे पारायण हे केले पाहिजेच. संध्येमुळे त्यांचे महत्त्व न्यून होत नाही. संध्या त्या उपासनेला पूरक आहे. द्विजाने (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य म्हणजे द्विज) नेहमी संध्या केली पाहिजे. संध्या करण्यावरच ब्राह्मण्य अवलंबून आहे.

२. संध्येचे महत्त्व आणि सामर्थ्य !

ज्याला संध्येविषयी आदर नाही, तो ब्राह्मण नव्हे. ‘आपत्तीकाळ नसतांनाही जो द्विज संध्या करत नाही, तो महापातक्यांचा राजा जाणावा’, असे नारद पुराणात म्हटले आहे. जो संध्योपासना न करता इतर अनुष्ठाने करतो, तो दुर्बुद्ध पंचपक्वान्नांचे भोजन लाथाडून भिक्षेसाठी भटकतो. संध्याहीन विप्र (विद्वान ब्राह्मण) नेहमी अशुचि (अपवित्र) असतो. त्याला कोणतेही श्रौतस्मार्त कर्म करण्याचा अधिकार रहात नाही. सुतकामध्ये सुद्धा संध्या केली पाहिजे. (सुतकामध्ये मनातल्या मनात, पुटपुटत संध्या करण्यास शास्त्र मान्यता आहे.) सार हेच की, ब्राह्मणांनी आता तरी स्वधर्म कर्मतत्पर व्हावे. नोकरीसाठी किंवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी चिकाटीने जितके कष्ट केले जातात, तितके किंबहुना त्यापेक्षा अधिक कष्ट करून गायत्रीचे अनुष्ठान करावे, म्हणजे अधिक सुखाने जगता येईल. संध्योपासना व्यवस्थित करणार्‍याला सर्व पापांपासून मुक्त करण्याचे सामर्थ्य गायत्रीत आहे.

३. धर्माचरणापासून दूर गेल्याने झालेला तोटा !

आज आमच्या देशाची दशा दयनीय आहे. ‘आमच्या हातून हा देश जातो कि काय ? आणि पुन्हा गुलामी येणार कि काय ?’, अशी स्थिती उत्पन्न झाली आहे. आमच्यामध्ये आज तेजच उरले नाही. खाणे, पिणे, मजा करणे, मी आणि माझे कुटुंब इतकेच माझे ध्येय झाले आहे. इतर धर्मीय अत्यंत निष्ठेने ते जेथे असतील, तेथे त्या वेळी स्वतःची प्रार्थना करतात. त्यांच्या निष्ठेची प्रशंसा करायला पाहिजे. ती मंडळी स्वधर्माच्या तत्त्वात शंका-कुशंका काढत नाहीत. आम्ही मात्र आमच्या धर्मतत्त्वात छिद्रे शोधून धर्मपालन न करण्यासाठी निमित्त शोधतो.मी एका अधिकारी व्यक्तीशी याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक ब्राह्मणाने प्रतिदिन संध्या केली, तर आजची हिंदु धर्माची दैन्यावस्था संपण्यास वेळ लागणार नाही.’’ तात्पर्य इतकेच की, आज आम्ही स्वतंत्र झालो असलो, तरी धर्माचरणापासून दूर होत चाललो आहोत. पारतंत्र्यात आम्ही आमचे धर्माचरण निष्ठेने करत होतो. देशाच्या पडत्या काळात ब्राह्मणांनी खंबीरपणे उभे राहून राष्ट्र सांभाळण्याचे काम निष्ठेने केले याविषयीचे विस्तृत विवरण ‘ब्राह्मण-एक राष्ट्रीय प्रश्न’, या पुस्तकात प.पू. अप्रबुद्ध यांनी केले आहे.

४. संध्या करण्यासाठी केवळ इच्छाशक्ती हवी !

आम्हाला संध्येसाठी वेळ नाही, हे कारण फार दुःखदायक आहे. मी एक सत्य गोष्ट सांगतो. एक ९ वर्षांचा मुलगा मुंज झाल्यावर संध्या करण्यास शिकू शकला नाही; पण त्याला संध्या करण्याची फार ओढ होती. संध्या न शिकण्याचे कारण, म्हणजे घरात कुणाला संध्या येत नव्हती आणि लहान गावात रहात असल्याने दुसरे कुणी शिकवायला मिळाले नाही. पुढे तो शिक्षणासाठी मोठ्या गावात गेला आणि ज्यांच्याकडे रहात होता, तेथे वैदिक आचार बर्‍यापैकी पाळत होते. तेथे त्याने संध्या शिकण्याची इच्छा प्रगट केली. त्याप्रमाणे त्याची संध्या चालू झाली. त्याची शाळेची बस सकाळी ७ वाजता येत असे. त्या वेळी तो संध्या आणि पूजा करून सिद्ध रहात असे. त्याचा हा क्रम तसाच चालू आहे. आज त्याला रामदासी परिवारात फार मानाचे स्थान आहे. ‘The busiest person has always time to spare’ (अर्थ : सर्वांत व्यस्त व्यक्तीकडे नेहमीच वेळ असतो.) ही उक्ती त्याने खरी केली. हे आपणही करू शकतो, केवळ इच्छाशक्ती पाहिजे. संध्या हे एक देशकार्य आहे, हे समजावे, मग त्यात सारे आले. आज आपण शरिराला फार लाडावून ठेवले आहे. त्याला आपल्याला हवे तसे वळवता येत नाही.

५. थोडक्यात संध्या कशी करावी ?

प्रवासात किंवा इतर परक्या जागी संध्या कशी करावी ? हा प्रश्न असतो. प.पू. अप्रबुद्ध यांनी त्यासाठी उपाय सांगितला. आपण प्रतिदिन अंघोळ करतोच. तेथे संध्येचा संकोच करून ओल्याने (हे फार उत्तम सोवळे आहे) श्रीकृष्णाची २४ नावे, प्राणायाम, अर्घ्य आणि जप करावा. इतक्यावरही जमत नसेल, तर हात-पाय धुवून एखादा कोपरा बघून मानसिक संध्या करावी. देवाला प्रार्थना करून क्षमा मागावी.जर करायचे म्हटले, तर मार्ग निघतो आणि परमात्मा तुम्हाला जवळ घेतो अन् कौतुक करतो. प्रखर धर्मनिष्ठा असल्याखेरीज हे होणे शक्य नाही. पुष्कळ मंडळींना कदाचित् हे वाचून संध्या करण्याची बुद्धी होईल. संध्या कशी करावी ? यासाठी बाजारात पुस्तके उपलब्ध आहेत. मला प.पू. अप्रबुद्ध यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात संध्या संकोच (थोडक्यात) करून सांगितली आहे. आचमन, २४ नावे, प्राणायाम, मार्जन, अधमर्षण, अर्घ्यप्रदान, आसनविधी, न्यास, गायत्री ध्यान, जप, दिशानमन, गुरुअर्घ्य आणि समापन, अशी ही १० मिनिटांची संध्या करता येते.

६. संध्या : एक देशकार्य !

मला असे वाटते की, अनेक वाचक संध्या करत असतीलच; पण जर करत नसतील, तर त्यांनी संध्या करण्यास अवश्य शिकावे. आरंभीस कुणा जाणकाराकडून उच्चार, क्रिया शिकून घ्याव्यात आणि पुढे नियमित संध्या करावी. हे एक देशकार्य आहे असे समजून निष्ठेने कार्य करावे आणि इतरांनाही उद्युक्त करावे.’

– श्री. श्रीनिवास गोटे, संपादक, त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, नागपूर.

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३)