संपादकीय : ब्रिटनमधील मंदिरे संकटात !

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सरकार असतांना हिंदूंसाठी खेदजनक वृत्त नुकतेच समोर आले. तेथे भारतीय पुरोहितांना व्हिसा नाकारला जात आहे. पुरोहितांअभावी तेथील ५०० पैकी ५० मंदिरे बंद करण्यात आली आहेत. ५० ही काही थोडीथोडकी संख्या नव्हे. आज विश्‍वभरात हिंदु आणि हिंदुत्व यांच्यासाठी सन्मानजनक वातावरण निर्माण झालेले असतांना ब्रिटनमधील घटना हिंदूंना नक्कीच व्यथित करते. हिंदूंसाठी हे मानहानीकारक आहे. पुरोहित नसल्याने मंदिरांमधील अनेक कामे ठप्प झाली आहेत. मंदिरांमध्ये होणारे कार्यक्रम, विवाहविधी या दृष्टीने पुरोहित नसणे हे अडचणीचे ठरत आहे. ‘ब्रिटन सरकारने ‘व्हिसा’ देण्याची प्रक्रिया वेगवान करणे अपेक्षित होते. ‘हिंदु असल्याने ऋषी सुनक यांना आमच्या समस्या समजतील’, असे वाटले होते; परंतु सरकार त्यात अपयशी ठरले आहे’, असे बर्मिंगहॅममधील लक्ष्मीनारायण मंदिराचे साहाय्यक पुजारी सुनील शर्मा म्हणाले. या घटनेविषयी सुनक सरकारने अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

मंदिरे म्हणजे प्रत्येक हिंदूच्या जिव्हाळ्याचा आणि धार्मिक भावभावनांचा विषय असतो. भारत हिंदूबहुल असल्याने येथे लक्षावधी मंदिरे आहेत; पण ब्रिटनसारख्या देशात ५०० मंदिरे असणे हेसुद्धा श्रद्धावान हिंदूंसाठी महत्त्वाचे आहे. असे असतांना त्यातील ५० मंदिरे बंद केली जाणे, हा हिंदूंवर झालेला मोठा आघातच आहे. यामुळे तेथील हिंदू संतप्त होऊन सुनक सरकारविषयी खेद व्यक्त  करत आहेत. ‘देवालयेच बंद होऊ लागली, तर हिंदूंनी जायचे कुठे ?’ याचे उत्तर सुनक सरकारने हिंदूंना द्यावे. ‘मंदिर म्हणजे भारतीय मूल्ये, संस्कृती आणि जगासमोरील योगदानाचे चित्रण करणारी महत्त्वाची खूण आहे’, असे विधान सुनक यांनीच मध्यंतरी केले होते. मग ही खूणच जर पुसली किंवा मिटवली जात असेल, तर त्याला काय म्हणावे ? मंदिरांच्या संदर्भात धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असणार्‍या सुनक यांच्याकडून हिंदूंना हे अपेक्षितच नाही. उलट अस्तित्वात असणार्‍या मंदिरांची जोपासना आणि संवर्धन करण्यासह आपल्या देशात आणखी मंदिरे वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या माध्यमातून धार्मिकता जोपासू पहाणे या दृष्टीनेही प्रयत्न करणे अपेक्षित होते; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तसे झालेच नाही. ब्रिटनमध्ये भारतीय हिंदूंची लोकसंख्या २० लाख आहे. ५० मंदिरांमध्ये जाणारे काही सहस्रावधी हिंदू असतील. आता त्यांनी जायचे कुठे ? या मंदिरांशी संबंधित असणार्‍यांनी उदरनिर्वाहाचे साधन कुठे शोधायचे ? आज ५० मंदिरे बंद केली, भविष्यात त्यात आणखीन वाढ झाली, तर पुढे तेथील हिंदूंचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते. या आणि अशा गंभीर परिणामांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. हे सर्व पहाता सरकारने पुरोहितांना व्हिसा मिळवून द्यायला हवा किंवा त्या मिळण्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर कराव्यात.

ब्रिटनमधील काही मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ती सहस्रो वर्षांपूर्वीची आहेत. त्यांचा शोध गेल्या काही वर्षांमध्ये लागलेला आहे. ब्रिटनमध्ये सहस्रो वर्षांपासून मंदिरसंस्कृती अस्तित्वात असल्याचेच हे द्योतक आहे. हे लक्षात घेता मंदिररूपी वारसा जतन करणे आणि त्याचे संवर्धन करणे, हे ब्रिटीश सरकार अन् तेथील हिंदू या सर्वांचेच दायित्व आणि धर्मकर्तव्यही आहे. ते पार पाडणे कालसुसंगत ठरेल !

पंतप्रधानांची विधाने आणि वास्तव !

ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान होणे, हे हिंदू आणि हिंदु धर्म यांसाठी आशादायी होते. ते वर्ष २०२३ मध्ये नवी देहली येथे आल्यावर म्हणाले होते, ‘‘मला मी भारतीय वंशाचा आणि भारताशी विशेष नाते असल्याचा गर्व आहे. ‘गर्व असलेला हिंदू’चा अर्थ आहे की, भारत आणि भारतातील लोक यांच्याशी माझे संबंध नेहमीच रहातील.’’ भारतीय वंशाचा गर्व आहे, तर मंदिरांविषयीची संवेदनशीलता आणि आदर त्यांच्याकडून प्रतीत व्हायला हवा होता. भारतीय पुरोहितांना व्हिसा देऊन न्याय देणे क्रमप्राप्त होते; पण तसे न झाल्याने ‘सुनक या संदर्भात काही प्रमाणात अपयशी ठरले’, असे म्हणता येईल. पंतप्रधान होण्यापूर्वीही सुनक म्हणाले होते, ‘‘मी जनतेला काय हवे, ते देणार नाही, तर राष्ट्रहिताचे निर्णय घेईन.’’ राष्ट्रहितामध्ये धर्महित सामावलेले असतेच. त्यामुळे त्यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन कृतीशील व्हायला हवे. ‘मला मी ब्रिटीश असण् यासह हिंदु असण् याचा अभिमान आहे. माझे कुटुंबीय हवन, पूजा आणि आरती करतात. मी रामायण, भगवद्गीता आणि हनुमानचालिसा वाचतो. सोन्याची श्री गणेशमूर्ती माझ् या कार्यालयातील पटलावर असते. श्री गणेश मला कोणतीही कृती करण् यापूर्वी ऐकण् याची आणि चिंतन करण् याची शिकवण देतो’, ही विधानेही सुनक यांचीच ! ब्रिटनमधील मंदिरांची सद्यःस्थिती पहाता सुनक यांच्या विधानांशी काही अंशी विसंगती दिसून येते, जी हिंदूंना अपेक्षित नव्हती. ते पंतप्रधान झाल्यावर ब्रिटनमध्ये हिंदुत्वाचा मोठ्या प्रमाणात उद्घोष करण्यात आला होता. हिंदूंनाही तेथे सुरक्षित आणि चांगल्या भवितव्याची दिशा सापडली होती; पण आता मंदिरांवरील बंदीमुळे याला काही अंशी गालबोट लागले आहे.

२० लाख हिंदूंचा हुंकार हवा !

सद्यःस्थितीत भारत असो किंवा विदेश, पृथ्वीतलावर कुठेही ‘हिंदु’ म्हटले की, एकतर तो दुर्लक्षित असतो किंवा त्याचा द्वेष केला जातो. त्यामुळे हिंदूंना दिलासा मिळत नाही. अशा स्थितीत मंदिरे बंद होऊ लागली, तर ती हिंदूंसाठी धार्मिक दडपशाहीच ठरेल. ब्रिटनमधील हिंदूंनी ही दडपशाही सहन न करता याविरोधात आवाज उठवायला हवा. संघटित होऊन पुरोहितांना व्हिसा देण्याची आणि मंदिरे तातडीने चालू करण्याची मागणी सरकारकडे करायला हवी. ब्रिटनमधील २० लाख हिंदूंचा हुंकार या ५० मंदिरांच्या अस्तित्वासाठी घुमला पाहिजे. केवळ ब्रिटनच नव्हे, तर हिंदूबहुल भारतातील हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच केंद्र सरकार यांनीही ब्रिटनमधील घटनेची नोंद घेऊन मंदिरे चालू होण्यासाठी ब्रिटन सरकारचा पाठपुरावा घ्यायला हवा. मंदिररक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणात राबवून ब्रिटन सरकारचा निषेधही करायला हवा. तसे झाल्यास सरकारही मंदिरे बंद करण्याचा विचार पुन्हा करणार नाही आणि बंद करण्यात आलेली मंदिरे पुन्हा चालू होतील.

अयोध्या येथे श्री रामललाचा ५०० वर्षे चाललेला संघर्ष वर्ष २०२४ मध्ये संपला आणि श्री रामललाची मूर्ती मंदिरात विराजमान झाली. तिची नित्योपासना, पूजा यांनाही आरंभ झाला. वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरातील व्यास तळघरात ३१ वर्षांपासून बंदी घातलेल्या पूजेला प्रारंभ झाला. हे भारतात घडत असतांना ब्रिटनमध्ये मंदिरे बंद करावी लागणे, हा हिंदु धर्माचा करण्यात आलेला अवमानच होय. ‘सुनक सरकारने वेळीच जागे होऊन हिंदूंच्या धर्मभावना जपण्यासाठी भारतीय पुरोहितांच्या व्हिसा प्रक्रियेसाठी गतीमान व्हावे’, हीच विश्‍वभरातील हिंदूंची अपेक्षा आहे !

भारतात श्रीरामलला ५०० वर्षांनंतर मंदिरात विराजमान झाले असतांना ब्रिटनमध्ये ५० मंदिरे बंद होणे, ही घटना हिंदूंना व्यथित करणारी !