Hemant Soren Arrest : मी शिबू सोरेन यांचा मुलगा असल्याने मला अटकेची चिंता नाही ! – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे अटकेपूर्वीचे वक्तव्य

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन

रांची (झारखंड) – ३१ जानेवारी या दिवशी सायंकाळी उशिरा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पदाचे त्यागपत्र दिले. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) त्यांना अटक केली. मुख्यमंत्री पदावर असतांना अटक झालेले सोरेन हे झारखंडचे तिसरे, तर भारतातील सातवे मुख्यमंत्री आहेत. अटकेपूर्वी सोरेन यांनी स्वत:चा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात ते म्हणत आहेत की, ईडी आज मला अटक करील; पण मला काळजी नाही. मी शिबू सोरेन यांचा मुलगा आहे.

ते पुढे म्हणाले की, दिवसभर चौकशी केल्यानंतर माझ्याशी संबंध नसलेल्या लोकांकडून मला अटक करण्याचा निर्णय घेतला. ईडीकडे अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असा दावा त्यांनी व्हिडिओ संदेशात केला आहे. ‘देहलीतील माझ्या निवासस्थानावर जाणीवपूर्वक धाड घालून माझी प्रतिमा डागाळण्याचाही प्रयत्न झाला. गरीब आणि आदिवासी यांच्यावर अत्याचार करणार्‍यांच्या विरोधात आता उभे रहायचे आहे’, असे ते म्हणाले. या शोषणाविरुद्ध आपल्याला नवा लढा द्यावा लागणार आहे.

भूमी घोट्याळाशी संबंधित प्रकरणात हात असल्याने अटक !

भूमी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. फौजदारी प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या अटकेसाठी विधानसभा अध्यक्षांची अनुमती आवश्यक असते. ही प्रक्रिया टाळण्यासाठी ईडीने प्रथम सोरेन यांना कह्यात घेतले आणि नंतर राज्यपालांकडे नेले. सोरेन यांनी त्यागपत्र दिल्यानंतरच त्यांना अटक करता आली.

मुख्यमंत्री पदावर असतांना अटक झालेली ही आहेत नावे !

  • जे. जयललिता, तमिळनाडू
  • लालूप्रसाद यादव, बिहार
  • चंद्राबाबू नायडू, आंध्रप्रदेश
  • ओम प्रकाश चौटाला, हरियाणा
  • मधु कोडा, झारखंड
  • शिबू सोरेन, झारखंड