सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात ओबीसी एकत्र येणार ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

२० फेब्रुवारी या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे ‘ओबीसी’ आरक्षणासाठी सभा

विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही; परंतु सगेसोयर्‍यांच्या नावाने सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी अधिसूचना काढण्याचा राज्य सरकारचा निर्णय ओबीसींवर (अन्य मागसवर्गीय) अन्याय करणारा आहे. त्यास वाचा फोडण्यासाठी २० फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर येथे ओबीसींच्या सभेचे आयोजन केले आहे. ही अधिसूचना मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता काढली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी वडेट्टीवार यांनी मुंबईत बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, गृहमंत्री म्हणतात, भाजप आहे, तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणतात, स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. गृहमंत्री म्हणतात की, सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यामधील विसंवाद दिसून येतो. हे सरकारच ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत आहे.