नाशिक – खर्चासाठी पैसे देत नाही, या कारणावरून पत्नीने तिच्या साथीदारासह बोलावून पतीला बिअर पाजून त्याचा गळा दाबण्याचा आणि तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला अन् त्यानंतर त्याला थेट गळ्याला विषारी सापाचा दंश घडवून आणला. (समाजातीलविकृती ! – संपादक) या दोन्ही गोष्टीतून वाचून तिच्या पतीने बाहेर येऊन लोकांना साहाय्य मागितले. त्याच्या मित्रांनी मध्यरात्री एक वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले आणि तात्काळ उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.
पती बाहेर पडल्यावर पत्नीने पोलीस ठाण्यात येऊन ‘आमच्या घरात आक्रमण झाले’, असा दावा केला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ‘गुन्हा नोंदवतो’, एवढेच सांगितले. तितक्यात जिल्हा रुग्णालयातून एका व्यक्तीला बळजबरीने सर्पदंश केल्याचा भ्रमणभाष आला. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांचे पथक तपासासाठी पोचले. त्यांनी विशाल यांचा जबाब नोंदवल्यानंतर या क्रूर घटनेची उकल झाली.
यानंतर पत्नीसह त्याच्या साथीदाराविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.