हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
हडपसर (जिल्हा पुणे), २९ जानेवारी (वार्ता.) – या देशाचा प्राण असलेल्या सनातन धर्माच्या मुळावर अनेक जण उठले आहेत. आपल्यासमोर ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’ हा प्रश्न नसून ‘इस्लामी राष्ट्र कि हिंदु राष्ट्र’, हा प्रश्न आहे. याचे कारण आपल्या देशात उघडपणे आतंकवादाचे समर्थन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर आक्रमण केले. या घटनेचा निषेध करत इस्रायलच्या समर्थनाची आणि जिहादी आतंकवादाच्या विरोधात भूमिका घेतली; पण अलिगड मुस्लिम विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी मात्र हमासच्या आतंकवाद्यांची पाठराखण करत मोर्चे काढले. त्यामुळे या आतंकवाद समर्थकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे सरकारकडे मागणी करायला हवी. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय हा निश्चित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. पराग गोखले यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हडपसर येथील श्री राधाकृष्ण मंदिरात २८ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.
या सभेचा प्रारंभ शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांनी झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी समितीचे श्री. पवन इंगळे यांनी सांगितले. या वेळी श्रीकृष्णाच्या साक्षीने हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार हडपसर येथील धर्मप्रेमींनी केला. ११० हून अधिक धर्मप्रेमी महिला आणि पुरुष सभेला उपस्थित होते.
श्री. पराग गोखले पुढे म्हणाले की, केवळ जिहादी आतंकवाद हे आपल्यापुढचे संकट नाही, तर बॉलीवूड जिहाद, ‘अर्बन नक्षलवाद’ हेही तितकेच गंभीर आणि व्यापक आहे. आम्हा हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही. याचे कारण जेव्हा रावण जन्माला येतो, तेव्हा रामही जन्माला येतो. जेव्हा कंस जन्म घेतो, तेव्हा श्रीकृष्णही अवतार घेतो, जेव्हा औरंगजेब जन्माला येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही जन्माला येतात. आपल्याला केवळ चांगल्या-वाईटाच्या लढाईत सत्प्रवृत्तींच्या पाठीशी अर्थात् धर्माच्या बाजूने उभे रहायचे आहे. त्यासाठी सनातन धर्मियांनी हिंदु राष्ट्राची मागणी केली पाहिजे. या वेळी त्यांनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहितेची आवश्यकता का आहे ? याविषयीही मार्गदर्शन केले.
विशेष सहकार्य !
हडपसर शाखेतील सर्वश्री पवन इंगळे, शुभम डोणवाडे, शिवराज डोणवाडे, पराग वंडकर, सचिन घुले, देव बुर्हाडे, रवींद्र पुजारी आदी सदस्यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार ८ दिवसांपासून वैयक्तिक स्तरावर आणि सामूहिक स्तरावर उत्साहाने केला. या व्यतिरिक्त सभेच्या आयोजनाची सेवाही त्यांनी तळमळीने केली. श्री राधाकृष्ण मंदिराचे विश्वस्त यांच्या सहकार्याने मंदिर उपलब्ध झाले.