रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रीरामनामसंकीर्तन फेरी, हिंदु राष्ट्रासाठी प्रतिज्ञा यांसह विविध उपक्रम !
पनवेल – प्रभु श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श बंधू, तसेच आदर्श शत्रू होते. त्यांचे गुण स्वतःमध्ये आणून अंतःकरणात रामराज्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी केले. अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खोपोली येथील तुकसई गावात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
व्याख्यानाच्या शेवटी सर्वांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रतिज्ञा केली. या प्रसंगी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अभिषेक, सामूहिक श्रीरामरक्षास्तोत्र पठण, नामजप, दिंडी सोहळा, हरिपाठ, तसेच जागर, भजन इ. कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आले होते.
पेण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीराम पालखी आणि दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुलांसह हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली.
अष्टमी, रोहा येथील श्रीराममंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. राजेंद्र पावसकर यांनी प्रवचन घेतले. त्यानंतर आरती करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात उरण, अलिबाग, कोलाड, खोपोली, कामोठे, पनवेल, महाड या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून श्रीराम नामसंकीर्तन, हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रतिज्ञा आदी राबवण्यात आलेल्या उपक्रमांना हिंदूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नवीन पनवेल येथे नामसंकीर्तन फेरी !नवीन पनवेल येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने नामसंकीर्तन फेरी काढण्यात आली. फेरीचा आरंभ श्री अंबामाता मंदिर येथून करण्यात आला. अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि कार्यकर्ते यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन श्री. भैरव सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शीतल चव्हाण यांच्या नेतृत्वात स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. फेरीची सांगता श्री अंबामाता मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर आणि श्री. सागर चोपदार यांच्या मार्गदर्शनाने झाली. क्षणचित्रे १. फेरीमध्ये घोषवाक्य लिहिलेले फलक उपस्थितांनी हातात घेतले होते. २. भगव्या झेंड्यांमुळे वातावरण भगवे झाले होते. ३. ‘जय श्रीराम’च्या घोषणांमुळे परिसर राममय झाला होता. |