निखिल वागळे यांचा पोलिसांविषयी अपशब्दाचा उपयोग !
मुंबई – ‘मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही ४८ घंट्यांत नाही. माहीम पोलीस ठाणे तर भंगारात विकले पाहिजे. आमेन (निश्चित)’, असे अपशब्द वापरून पुरोगामी पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांचा राग ‘एक्स’वर व्यक्त केला.
वागळे यांच्या पोस्टला उत्तर देतांना त्यांचे आरोप फेटाळत मुंबई पोलिसांनी म्हटले आहे, ‘‘आम्ही सखोल माहिती घेतली आहे. आपल्या तक्रारीवरून दि. २४/०१/२४ या दिवशी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून आपणास कळवण्यात आलेले आहे. अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या पोलीस कर्मचार्यांना आपण भेटण्यास नकार दिला. तक्रारीची प्रत पोलीस ठाणे येथून प्राप्त करून घेण्याविषयीही आपणास कळवण्यात आलेले आहे. व्यक्तीविशेषसाठी घरपोच प्रत पोचवण्याचे प्रावधान नाही. आपण शिक्षित आहात, संयमित भाषा वापरणे अपेक्षित आहे.’’
वागळे यांची आधीची पोस्ट
२३ जानेवारी या दिवशी वागळे यांनी तक्रारीच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, काही उपद्रवी व्यक्ती त्यांना त्रास देत आहेत. मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष पूर्णपणे निरुपयोगी आहे. अतिशय उद्धट आहे. उच्च अधिकारी गेल्या २ दिवसांपासून योग्य प्रतिसाद देत नाहीत. नागरिक, पत्रकार हतबल आहेत.
त्यावर मुंबई पोलिसांनी प्रत्युत्तर देत म्हटले होते, ‘‘प्रिय निखिल वागळे, तुम्हाला झालेल्या कोणत्याही गैरसोयीविषयी आम्ही दिलगीर आहोत. कृपया त्वरित कारवाईसाठी तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्याला या प्रकरणाची तक्रार करा. तुमची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की, तक्रार योग्यरित्या नोंदवली जाईल.’’