अपूर्ण रस्त्यांची सूची करण्याची महापालिकेची क्षेत्रीय कार्यालयांना सूचना !
पुणे – विकास आराखड्यातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यास महापालिकेकडून प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार अपूर्ण रस्त्यांची सूची करण्याची सूचना क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात आली आहे. विकास आराखड्यात कोणते रस्ते आहेत, याची माहिती घोषित केली जाणार आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीचा, तसेच वर्ष १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३७ गावांचा विकास आराखडा संमत झालेला आहे. या आराखड्यामध्ये अस्तित्वातील रस्त्यांसह नव्याने अनेक रस्त्यांची आखणी करण्यात आलेली आहे. बहुतांश जुन्या रस्त्यांच्या दुतर्फा पूर्वीपासूनच बांधकामे अस्तित्वात आहेत; मात्र विकास आराखड्यातील त्याठिकाणची संभाव्य रस्ता रुंदी लक्षात न घेता भूमी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे भविष्यात ही बांधकामे जमीनदोस्त करावी लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी बोलतांना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले की, विकास आराखड्यातील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत; मात्र त्याची माहिती नसल्याने भूमीविक्रीचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे या रस्त्यांची सूची सिद्ध करण्याची सूचना करण्यात आली असून ती सूची क्षेत्रीय कार्यालयामध्येही प्रसिद्ध केली जाणार आहे. या रस्त्यावर अतिक्रमणे किंवा बांधकामे होऊ नयेत, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात ही सूची सिद्ध होईल. त्यानंतर ती महापालिकेच्या संकेतस्थळावरही घोषित केली जाईल.