अकोला – राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर १० सहस्र ४०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले आहेत. विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीत तुरीच्या दरात वाढ कायम आहे. येत्या काही दिवसांत तुरीचे दर आणखी वाढतील, अशी शक्यता बाजार समितीतील कृषी अभ्यासक म्हणत आहेत. यंदा तुरीचे उत्पादन अल्प झाले असून सर्वच बाजारात तुरीला चांगली मागणी आहे. कापूस आणि सोयाबीन यांना अपेक्षेनुसार भाव नसल्याने शेतकर्यांना तुरीकडून अपेक्षा होत्या. ज्या शेतकर्यांना कापूस आणि सोयाबीन यांना दर मिळाला नाही, त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. आगामी दिवसांत हे भाव सहजपणे ११ ते १२ सहस्रांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज आहे.