सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाहनांच्या गतीवर नियंत्रण रहाण्यासाठी रस्त्यांवर जागोजागी गतिरोधक बसवण्यात येतात; मात्र बेशिस्त वाहनचालक, नियमांचे पालन न करणे, वेगाने गाडी चालवणे, मद्यपान करून गाडी चालवणे, तसेच रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेली खडी, महामार्गाचे कठडे तोडून अनधिकृतपणे रस्ते करणे, सेवारस्त्याच्या दुरुस्तीकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष आदी गोष्टींमुळे कित्येक निष्पाप लोकांचे मृत्यू होत आहेत. अनेक भागांत रात्रीच्या वेळी आणि दिवसाही गतिरोधकांमुळे अपघात होऊन मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जातात. सातारा येथे एकाच मासात ३५ हून अधिक जणांचे मृत्यू झाल्याचे समजते. काही ठिकाणी गतिरोधकांवर पांढरे पट्टेही रंगवण्यात आलेले नसतात. काही ठिकाणी ‘रम्बलिंग स्ट्रीप’ (कंपनपट्टी किंवा छोट्या गतीरोधकांची रांग) असतात; परंतु त्या इतक्या मोठ्या असतात की, त्यामुळेही अपघात होतात.
वाहतूक नियंत्रण शाखेचे काम केवळ दंडात्मक कारवाई करणे एवढेच नसून वाहतुकीला शिस्त लावणे आणि वाहतुकीसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पहाणे, हेही आहे; परंतु दुर्दैवाने तसे घडतांना दिसत नाही. राष्ट्रीय महामार्गावरही हीच स्थिती पहायला मिळते. वर्ष १९८८ मध्ये भारतीय ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ची स्थापना झाली. राष्ट्रीय महामार्गांचा विकास करणे, देखभाल-दुरुस्ती करणे आणि महामार्ग व्यवस्थापन पहाणे यांसाठी केंद्रीय प्राधिकरण अस्तित्वात अाले. रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडून जिल्हा प्रशासनासमवेत केवळ बैठकींचा फार्स केला जातो. कागदावर केलेले नियोजन प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे बैठकांमधून कोणतेही फलित समोर येत नाही, ही शोकांतिका आहे.
वेळकाढूपणा करतांना निर्णय घेण्यास विलंब झाल्याने अपघातांची मालिका नित्याचीच होऊन बसली आहे. सातारा येथे या विरोधात मोठी जागृती करण्यात आली; परंतु जनतेने केलेली रस्ता बंद आंदोलने, निषेध मोर्चे यांचीही नोंद प्राधिकरणाकडून घेतली गेली नाही, हे मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल.
वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासमवेत वाहतुकीसाठी चांगले रस्ते आणि वातावरण निर्माण करण्याचे दायित्व असलेल्या यंत्रणेकडून अपघातास निमंत्रण देणार्या गतिरोधकांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वेळच्या वेळी न केलेली गतिरोधकांची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी संबंधित यंत्रणेची नागरिकांप्रती असलेली असंवेदनशीलता दर्शवते. जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घेणे आवश्यक आहे, तसेच महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाविषयीही कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा.