संपादकीय : रामराज्याचा उत्साहात प्रारंभ !

कोट्यवधी भारतियांचे श्रद्धास्थान, तसेच राष्ट्रीय अस्मितेचा, आदर्शाचा, स्वाभिमानाचा आणि आस्थेचा विषय असलेल्या अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला २२ जानेवारीला भावपूर्ण आणि मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून नव्हे, तर कित्येक शतकांपासून ज्या क्षणाची समस्त हिंदूंना प्रतीक्षा होती, जो क्षण डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी हिंदु जनमानस आतुर होते, तो क्षण आज अवतरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे देशवासियांनी हा ऐतिहासिक दिवस दीपावलीसारखा साजरा केला; कारण राष्ट्रीय अवमानाची आणि गुलामीची चिन्हे पार नष्ट करून स्वाभिमानाचे अन् आत्मगौरवाचे मंदिर समस्त भारतियांसाठी खुले झाले आहे. श्रीरामजन्मभूमीवर आज उभे राहिलेले श्रीराममंदिर आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हे हिंदूंच्या विजयाचे प्रतीक अन् हा विजय हिंदूंच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे; कारण त्यामागे लढ्याची, संघर्षाची, बलीदानाची व्यापक पार्श्वभूमी आहे. श्रीरामजन्मभूमीसाठी बलीदान देणार्‍या लक्षावधी धर्मविरांची आणि मातृभूमीवरील कलंक मिटवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा होम करणार्‍यांची शतकांपासूनची वेदना शमली आहे. अयोध्येत केवळ श्री रामललाचीच प्राणप्रतिष्ठा झाली नसून या प्राचीन ‘राष्ट्रमंदिरा’चीही नव्याने पुनर्बांधणी झाली आहे. श्रीरामचंद्रांकडून त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन सामर्थ्यशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा नव्या भारताचीच आज प्राणप्रतिष्ठा झाली आहे. यातून आजपासून रामराज्याचा प्रारंभ झाला आहे.

बालस्वरूपातील श्री रामललाची मोहक मूर्ती

भारतात जेवढे सण साजरे करतांना सर्वांना आनंद होत असतो, तसा आनंद या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून सर्व भारतियांनी अनुभवला आहे. श्री रामलला केवळ अयोध्येतच प्रकट होणार नसून ते स्वतःसमवेत समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येत आहेत. त्यामुळे आजच्या लोकार्पणदिनी केवळ भावभक्तीचाच सुगंध आसमंतात दरवळला नसून व्यापार आणि अर्थकारण यांच्या स्वरूपात श्री महालक्ष्मीदेवीचीही कृपा झाली आहे. अयोध्येतील विकासकामे अन् भव्य प्रकल्प यांमुळे भारताच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक आणि अनुकूल परिणाम होणार असल्याचा अहवाल विविध राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिला आहे. त्यामुळे श्री रामललाचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा ही देशात पुन्हा चैतन्य, उल्हास अन् आनंद घेऊन आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मनामनांत ‘श्रीराम ज्योत’ प्रज्वलित करून राष्ट्रदीप नव्याने उजळवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

विरोधकांचे वर्तन रावणासारखे का ?

वर्ष १५२८ ते ६ डिसेंबर १९९२ या जवळपास ४५० वर्षांच्या कालावधीत ४०० हून अधिक लढाया हिंदु समाजाने वेगवेगळ्या आक्रमकांशी लढल्या आहेत. अयोध्येचे मंदिर हे हिंदु समाजाला पूजाअर्चा करायला खुले करण्यासाठी मोठा न्यायालयीन संघर्ष करावा लागला. आता अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आनंदाने साजरा होत असतांना गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी यांवर टीका केली आहे. या सोहळ्यातून आनंद घेण्याऐवजी विरोधक श्रीरामाची अवहेलना करून एकप्रकारे श्रीरामाचा द्वेषच करत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘श्रीराम मांसाहारी होते’, असे वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. दुसरीकडे सनातन धर्माचा द्वेष करणार्‍या तमिळनाडूच्या द्रमुक सरकारने श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. जळगाव येथील एका सोहळ्यात साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ‘अनेक रामायणांमध्ये राम वेगळा आहे. वाल्मीकीचा राम कशामुळे खरा म्हणायचा ? वाल्मीकि हा शृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसे आवडले, तसे रामायण वाल्मीकि यांनी लिहिले आहे. एका रामायणात तर सीता ही रामाला ‘अक्कल नाही’, अशा शिव्या देते’, असे त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. यापूर्वी काँग्रेसने केंद्रात सत्ता असतांना ‘राम हे काल्पनिक पात्र’ असे सर्वाेच्च न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. २२ जानेवारीला श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठादिनी दिलेली सुटी रहित करण्याविषयी विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रविष्ट केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली आहे. ‘धार्मिक गोष्टींसाठी सुटीची घोषणा हा निर्णय मनमानी असू शकत नाही. सुटीचा निर्णय धर्मनिरपेक्षक तत्त्वांशी सुसंगत आहे. राज्यात विविध धर्मांचे पालन केले जाते. राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि प्रसिद्धी यांपोटी ही जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आल्याचे दिसत आहे. ही याचिका प्रविष्ट करतांना करतांना मूलभूत तत्त्वांचा विचार केला नाही’, असे उच्च न्यायालयाने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना खडेबोल सुनावले आहेत. यावरून ‘आजपासून रामराज्याला प्रारंभ झाल्यानंतर विरोधकांच्या कृत्यांना लगाम घालण्यासही प्रारंभ झाला आहे’, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. ‘श्रीरामजन्मभूमी, मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशीचे बाबा विश्वनाथ मंदिर ही जिहादी मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली ३ स्थाने हिंदूंना परत मिळावीत, तेथे भव्य मंदिरे उभी रहावीत’, अशी हिंदूंची स्वाभाविक मागणी आहे. ही मागणी करतांना हिंदूंनी आजच्या मुसलमान समाजाविषयी कोणताही आकस अथवा द्वेष कधीच दाखवला नाही. उलट त्यांच्याशी संवाद साधून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र वारंवार वामपंथी, काँग्रेसी, ढोंगी आणि पुरोगामी नेतेमंडळींनी हिंदूंच्या भावनांकडे तिरस्कारयुक्त दृष्टीने पाहिले. कारसेवकांवर गोळीबार करण्याचे, त्यांना कारागृहात डांबण्याचे कार्य त्यांनी तत्परतेने केले. वरील सर्व उदाहरणे पहाता काँग्रेसी, पुरोमागी, साम्यवादी अशा विरोधकांनी केवळ द्वेषभावनेतून अयोध्येतील श्रीराममंदिर आणि श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना सोहळा यांना विरोध करून रावणासारखे वर्तन केले आहे. ‘श्रीरामासमवेत द्वेष भावनेतून वागून त्याच्याशी युद्ध करू नको. श्रीरामांना शरण जा’, असे अनेकांनी रावणाला सांगूनही केवळ अहंकारामुळे त्याने स्वतःचा विनाश करून घेतला. अहंकारी रावणाचा श्रीरामाने वध केला. त्यामुळे विरोधकांनी द्वेषभावनेतून विरोध करण्याऐवजी या सोहळ्याचा आनंद घ्यावा, अन्यथा पुढे रावणासारखी त्यांची अवस्था होईल. मुसलमानांना खुश करण्यासाठी अयोध्येत गेलेल्या कारसेवकांवर अत्याचार करणारे उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायमसिंह यादव यांना उत्तरप्रदेशच्या जनतेने सत्तेवरून खाली खेचले. त्याप्रमाणे या सोहळ्याला विरोध करणार्‍या लोकप्रतिनिधींना पुढील निवडणुकीत हिंदू कायमचे घरी बसवतील. ज्या दिवशी मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिर मुसलमान आक्रमकांच्या तावडीतून सुटेल, तो दिवस हिंदूंच्या दिग्विजयाचा दिन असेल. या विजयाचा पाया आज रचला गेला आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे !

श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा ही सामर्थ्यशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण अशा नव्या भारताची प्राणप्रतिष्ठा !