|
पुणे – कोकण किनारपट्टी सुंदर आहे. या भागात लवकरच नौदलाचे एक ‘युनिट’ स्थापन करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन नौदलप्रमुख हरिकुमार यांनी केले. लोणावळा येथील ‘आय.एन्.एस्. शिवाजी’ येथे झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पहिल्यांदाच ‘नौदल दिन’ साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या निमित्ताने नौदलप्रमुखांनी दोनवेळा त्या भागाला भेट दिली. सागरी चाचेगिरी, मालदीवमध्ये असलेले सैन्य परत बोलावणे, तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ यांतर्गत विकसित करण्यात येत असलेले तंत्रज्ञान अशा सूत्रांवरही त्यांनी या वेळी भाष्य केले.
नौदलप्रमुख पुढे म्हणाले की…,
१. वर्ष २००८ पासून सागरी चाचेगिरीच्या विरोधात कारवाई चालू आहे. त्यासाठी एक जहाज सतत तैनात करण्यात आले आहे. चाचेगिरीचा सामना करण्यासाठी आतापर्यंत १०६ जहाजे तैनात केली आहेत. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हिंद महासागरातील चाचेगिरी रोखण्यासाठी नौदल आक्रमक पद्धतीने काम करत आहे.
२. चाचेगिरीची आक्रमणे सोमालियाच्या किनार्यापासून अनुमाने २ सहस्र कि.मी.वर झाली आहेत. या वर्षाच्या आरंभीला अचानक जहाजांवर आक्रमणे वाढल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे चाचेगिरी रोखण्यावर भर देण्यात येत आहे. चाचेगिरी रोखण्यासाठीचा कायदा असलेल्या जगातील काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यामुळे चाचेगिरी रोखण्यास साहाय्य होत आहे.
३. युद्धनौकांसह अनुमाने १० चिनी जहाजे हिंद महासागरात आहेत; मात्र तेथील देशांच्या सागरी हितासाठी त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
४. मालदीवने भारतीय सैन्य मागे घेतले. भारताचे मालदीवशी चांगले संबंध आहेत. मालदीवचे अनेक कर्मचारी ‘आय.एन्.एस्. शिवाजी’सह भारतातील प्रशिक्षण आस्थापनांमध्ये अभ्यास करत आहेत; मात्र सरकारच्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्यात येईल.
५. ‘आय.एन्.एस्. शिवाजी’ ही पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका येत्या काही मासांत कार्यान्वित होईल. तिसर्या विमानवाहू युद्धनौकेच्या संमतीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा चालू आहे. वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भरता साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी खासगी उद्योगांसह अनेक प्रकल्प चालू करण्यात आले आहेत. त्याद्वारे नौदलाकडे नसलेले तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे.