अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
अयोध्या १९ जानेवारी (वार्ता.) – अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांच्या चालू असलेल्या सिद्धतेची पहाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९ जानेवारी या दिवशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वेळी मुख्मंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिर आणि मंदिर परिसरात चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला, तसेच राहिलेली कामे तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश दिला. या वेळी मुख्यमंत्र्यांसमवेत अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सौजन्य इंडिया टूडे
श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता अंतिम टप्प्यात
अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा यांची सिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त अवघी अयोध्यानगरी सजली असून भाविकांमध्ये विलक्षण उत्साह आहे.
१. या सोहळ्यानिमित्त मंदिराच्या परिसरातील भिंती झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवण्यात आल्या आहेत. यासाठी अनेक टेम्पोभरून फुले आण्यात आली आहेत. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच फुलांच्या माळांनी सजलेल्या भिंती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही सर्व फुले अयोध्येतील ‘न्यू साकेत प्लॉवर डेकोरेटर्स’ने पुरवली आहेत.
२. भाविकांना ऊन आणि पाऊस यांचा त्रास होऊ नये, यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य मंदिरापर्यंत कायमस्वरूपी शेड बांधण्यात आली आहे. याच शेडखाली भाविकांना बसण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
३. या शेडखाली छोट्या आकरातील शोभेचे नक्षीदार खांब उभारण्यात आले असून त्याच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील सर्व रस्ते आणि पदपथ धूवून स्वच्छ करण्यात येत असून हे काम २० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
४. २० जानेवारीनंतर मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. यासह इतरही डागडुजीच्या किरकोळ कामांवर अंतिम हात फिरवण्यात येत आहे.