वर्ष १९९० मध्ये १२५ कारसेवकांना आश्रय देणार्‍या श्रीमती ओम भारती यांना उद्घाटनाचे निमंत्रण !

कारसेवकांचे बलीदान कधीही विसरणार नाही ! – ओम भारती

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी ८ सहस्र मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात श्रीमती ओम भारती यांचाही समावेश आहे. वर्ष १९९० मध्ये राज्यात मुलायम सिंह यांचे सरकार असतांना अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर गोळीबार करण्यात आला होता. त्या वेळी १२५ कारसेवकांना घरात आश्रय देऊन त्यांचे रक्षण ओम भारती यांनी केले होते. त्या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल हेही त्यांच्या घरी आश्रयाला होते. तेव्हा झालेल्या गोळीबारात कोलकाता येथील कोठारी बंधू हे हुतात्मा झाले होते. तेही ओम भारती यांच्या घरी थांबले होते.

सौजन्य : न्यूज नेशन 

श्रीमती ओम भारती यांनी सांगितले की, २ नोव्हेंबर १९९० या दिवशी तत्कालीन मुलायम सिंह सरकारने पोलिसांना कारसेवकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. आपल्या राजकीय स्वार्थापोटी मुख्यमंत्र्यांनी गोळीबाराचा आदेश दिला. आता श्रीराममंदिराचे उद्घाटन होत आहे. त्याचा आनंद आणि समाधान आहे; पण माझ्या कारसेवकांचे बलीदान, त्यांनी सांडलेले रक्त अन् त्यांना सहन करावे लागलेले दु:ख मी कधीही विसरू शकणार नाही. कोठारी बंधू माझ्याच घरी लपले होते. गोळीबारापासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी त्यांनी आमच्या घरात आश्रय घेतला होता. घरातून बाहेर पडताच त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. श्रीराममंदिरासाठी ते हुतात्मा झाले. त्या वेळी काँग्रेसने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्यांनी कोणतेच साहाय्य केले नाही. त्या वेळचे मुख्यमंत्री त्यांच्या मुसलमान मतदारांना खूश करत होते. त्यासाठीच त्यांनी कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले.