Goa CM : उद्योगांच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पालट करण्याची सरकारची सिद्धता !

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे वक्तव्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) : गोव्यात उद्योगांच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना कौशल्याचे शिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रमात आवश्यक ते पालट करण्याची सरकारची सिद्धता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

सांखळी येथे ‘इंडस्ट्री एकेडेमिआ कनेक्ट’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सध्या गोव्यात चालणारी फार्मा आस्थापने, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान आदी उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उद्योगांसाठी लागणार्‍या मनुष्यबळाच्या आवश्यकतेनुसार आम्ही अभ्यासक्रमात पालट करू.

सध्या गोव्यातील युवक जी.पी.एस्.सी. (गोवा सार्वजनिक सेवा आयोग), यु.पी.एस्.सी. (केंद्रीय सार्वजनिक सेवा आयोग) इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांकडे दुर्लक्ष करत आहेत. विद्यार्ध्यांनी या परीक्षांकडे लक्ष दिल्यास ते रोजगारक्षम होतील.’’